गोमेकॉत पहिल्यांदाच ‘आयव्हीएफ’द्वारे जन्मले बाळ

0
0

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये प्रथमच आयव्हीएफ उपचारामुळे एका मुलीचा जन्म झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काल जाहीर केली.

आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे सिझरिंगच्या माध्यमातून एका जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. गोमेकॉमध्ये वर्षापासून मोफत आयव्हीएफ उपचार पद्धत सुरू करण्यात आलेली आहे. या उपचार पद्धतीच्या माध्यमातून पहिल्या बाळाचा जन्म झाला आहे.
राज्यातील मुले नसलेल्या कुटुंबाला अपत्य प्राप्तीचा आनंद मिळवून देण्यासाठी आयव्हीएफ उपचार पध्दत कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आयव्हीएफ ही उपचार पध्दत खर्चिक असल्याने सामान्य कुटुंब या उपचार पद्धतीचा लाभ घेऊ शकत नाही.

गोमेकॉमध्ये आत्तापर्यंत या आयव्हीएफ उपचार पद्धतीसाठी अनेकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी काही जणांनी प्रत्यक्ष उपचार पद्धतीचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. या उपचार पद्धतीचा लाभ घेणाऱ्या अनेकांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आयव्हीएफद्वारे मुलीचा जन्म ही गोमेकॉसाठी एक महत्वपूर्ण घटना आहे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी म्हटले आहे.