गोमेकॉत ज्येष्ठ नागरिकांसाठी खास कक्ष

0
1

>> ओपीडी आणि इतर वैद्यकीय उपचारांसाठी मिळणार प्राधान्य

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळात (गोमेकॉ) 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ओपीडी आणि इतर वैद्यकीय उपचारांसाठी खास कक्ष सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिली.

गोमेकॉमध्ये ओपीडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खास कक्ष नसल्याने बरीच गैरसोय होत होती. ओपीडीसाठी सध्या सकाळी 8 वाजता टोकन क्रमांक दिले जातात. पूर्वी, सकाळी 7 वाजता टोकन क्रमांक दिले जात होते. इस्पितळात उपचारासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये रांगेत उपस्थित राहून टोकन क्रमांक घ्यावा लागत होता. रांगेत राहून टोकन क्रमांक न मिळाल्यास उपचार न घेता परत जावे लागत होते.

गोमेकॉमध्ये ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारी समस्या सोडविण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पुढाकार घेतला आहे. गोमेकॉमधील उपचारर्थ येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी प्रक्रियेदरम्यान भेडसावणारी आव्हाने कमी करण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत नोंदणीची सोय केली जाणार आहे. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुरळीत आणि त्रासमुक्त होईल. याव्यतिरिक्त, काउंटरवर साहाय्य उपलब्ध असेल. आवश्यक तपासण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या संबंधित ओपीडीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी एक जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) उपस्थित असेल.
या उपक्रमाचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी काउंटरवर येणाऱ्या अडचणी कमी करणे आणि गोमेकॉमध्ये त्यांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचा आहे, असेही विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.