गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग विभाग उभारण्यासाठीची तयारी सध्या जोरात सुरू असून काम सुरू झाल्यानंतर १४ महिन्यांत हा विभाग उभा करण्याचे लक्ष्य आरोग्य खात्याने ठेवले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी इमेलद्वारे काल दिली. ते सध्या इंग्लंडमध्ये आहेत.
ह्या विभागाच्या इमारत नकाशासाठीचे काम पूर्ण झालेले आहे. विभागासाठी हवे असलेले साहित्य आणण्यासाठीची तयारीही चालू आहे. ह्या विभागाची इमारत उभारण्याचे काम गोवा साधनसुविधा विकास महामंडळाकडे सोपवण्याचा विचार आहे. मात्र, त्याबाबत अजून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने आपणाकडे जबाबदारी सोपवल्यास १४ महिन्यांत इमारत उभी करण्याचे आश्वासन दिले असल्याचे राणे यांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय यंत्रसामग्री
खरेदीसाठी निधी मंजूर
गोवा वैद्यकीय महाविद्यालय तसेच इस्पितळासाठी आवश्यक ती सगळी वैद्यकीय अवजारे व उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकारने निधी मंजूर केलेला असून ही अवजारे खरेदी करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी माहिती दिली आहे. ही अवजारे व उपकरणे खरेदी करताना भारतीय वैद्यकीय मंडळाने जी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेली आहेत त्यांचे पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील आरोग्य सेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सर्व ते सहकार्य करीत असून त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच राज्यातील आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल घडून येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.