गोमेकॉत अन्य आजारांवरील उपचार लवकरच सुरू करणार : आरोग्यमंत्री

0
102

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गोमेकॉतील बंद ठेवण्यात आलेले अन्य आजारांवरील उपचार आता लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे काल आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने हे उपचार सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कोविड महामारीमुळे आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाल्याने अन्य आजारांवरील उपचार बंद ठेवण्यात आले होते व केवळ अत्यंत गंभीर अवस्थेतील रुग्णांवरच उपचार करण्यात येत होते. त्यामुळे अन्य प्रकारे आजारी पडलेल्या लोकांवर मागील बरेच महिने गोमेकॉत उपचार होऊ शकले नव्हते. मात्र, आता अनलॉक सुरू झालेले असून अन्य आजारांवरील उपचार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

स्वत:च्या घरी विलगीकरणात राहून उपचार घेणार्‍या ५० कोविड रुग्णांची प्रकृती बिघडू लागली असल्याचे आढळून आल्याने त्यांना इस्पितळात हलवून त्यांचे प्राण वाचवण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली. घरी विलगीकरणात राहणार्‍या कोविड रुग्णांवर आता एकूण १७ दिवसांपर्यंत बारीक लक्ष ठेवण्याचे काम डॉक्टर करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. घरी विलगीकरणात राहणार्‍या कोविड रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आता ११८ एम्‌बीबीएस् विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.
सध्या राज्यातील सर्व तिन्ही कोविड इस्पितळात खाटा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. स्वत:च्या घरी विलगीकरणात राहण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने इस्पितळांवरील ताण कमी झाला आहे. आतापर्यंत २२४०२ कोविड रुग्णांनी स्वत:च्या घरी विलगीकरणात राहणार्‍या पर्यायाचा फायदा घेतल्याचे ते म्हणाले.

एमबीबीएसचे वर्गही लवकरच
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण घेणारे गोमेकॉतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी परवानगी घेऊन त्यांचे वर्गही लवकरच सुरू करण्याचा विचार असल्याचे राणे यांनी सांगितले. सध्या त्यांचे वर्ग ऑनलाईन चालू आहेत.

शाळांसाठीची एस्‌ओपी ठरणार
आता सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून या शाळांसाठीची एसओपी गोमेकॉचे डिन शिवानंद बांदेकर यांच्या नेतृत्वाखालील समिती ठरवणार असल्याचे ते म्हणाले.