गोमेकॉतील विविध ओपीडी विभाग सुरू

0
162

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील विविध विभागाचे बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) कालपासून सुरू करण्यात आले आहेत. इस्पितळाच्या ओपीडी सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी ३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.
राज्याचा हरित विभागात समावेश करण्यात आल्यानंतर गोमेकॉच्या ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गोमेकॉच्या विविध विभागाच्या ओपीडी बंद करण्यात आल्या होत्या. गोमेकॉमध्ये आपत्कालीन विभाग सुरू ठेवण्यात आला होता. तसेच कोरोना रुग्णांची तपासणीसाठी खास आयझोलेशन विभाग सुरू करण्यात आला. या ठिकाणी गेल्या कित्येक दिवस या ठिकाणी केवळ कोरोना संशयितांवर उपचार केले जात आहेत.

गोमेकॉच्या ओपीडी बंद ठेवण्यात आल्याने आरोग्य तक्रार असलेल्या नागरिकांची गैरसोय होत होती. ओपीडी बंद करण्यात आल्याने नियोजित ऑपरेशन आदी पुढे ढकलावी लागली. मंगळवारपासून गोमेकॉच्या ओपीडी सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना सामाजिक अंतर राखण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच, इस्पितळाच्या ओपीडीमध्ये येणार्‍या नागरिकांची थर्मल गनने तपासणी केली जात होती. ओपीडीमध्ये येणार्‍यांना सॅनिटायझर्स उपलब्ध करण्यात आले. मास्कची सक्ती करण्यात आली होती, अशी माहिती डीन डॉ. बांदेकर यांनी दिली.

दरम्यान, राज्यातील जिल्हा, उपजिल्हा इस्पितळ, सामाजिक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.