गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये काही नशेबाज विद्यार्थ्यांपाशी गांजासारखा अमली पदार्थ सापडण्याची घटना अतिशय गंभीर आहे आणि सरकारने या विद्यार्थ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली त्यात काहीही गैर नाही. या गांजेकस विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी ‘गांजा हा कसा सौम्य अमली पदार्थ आहे, तो आरोग्याला अपायकारक कसा नाही’ वगैरे युक्तिवाद करीत जे पुढे येत आहेत, ते आपलेच हसे करून घेत आहेत. युवक कॉंग्रेसने सदर गैरप्रकाराचे समर्थन करीत काढलेले पत्रक सर्वस्वी हास्यास्पद आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे वैद्यकीय ज्ञान संपादन करण्यासाठी आहे; अंमलीपदार्थांच्या नशेत धुमाकूळ घालण्यासाठी नाही. ज्यांना नशेत मौजमजा करायची आहे त्यांच्यासाठी इतर ठिकाणे आहेत. गोमेकॉतील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या बहुमोल जागा त्यांनी वाया घालवू नयेत.
मुळातच गोमेकॉमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणार्यांसाठी मर्यादित जागा आहेत आणि राज्यातील हजारो विद्यार्थी तेथे वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यामधून ‘नीट’ परीक्षेत चमक दाखवणार्या मोजक्याच विद्यार्थ्यांना येथे ज्ञान संपादन करण्याची संधी लाभते. अशा वेळी या संधीचे सोने करून आपली वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल कारकीर्द घडविण्याऐवजी कोणी गांजाच्या नशेमध्ये दंग राहण्यात धन्यता मानत असेल तर अशा मंडळींना बाहेरची वाट दाखवणेच योग्य ठरेल. वैद्यकीय अभ्यासक्रम देणारे गोवा वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृह हे राज्य सरकारच्या अनुदानातून चालते. हा तुम्हा – आम्हा करदात्यांचा पैसा आहे. आपण कर भरत असतो ते त्या पैशातून सरकारने काही चांगल्या गोष्टी कराव्यात, राज्यात चांगल्या गुणवत्तेचे डॉक्टर निर्माण व्हावेत यासाठी. गांजेकस डॉक्टर घडविण्यासाठी नव्हे. उद्या ही नशेबाज मंडळी डॉक्टर होऊन बाहेर पडतील तेव्हा गांजा आणि अफूच्या धुंदीत शस्त्रक्रिया करणार काय?
गांजासह आणि नशेमध्ये रंगेहाथ पकडलेले विद्यार्थी हे वयाने लहान असतील, परंतु त्यांना गांजा हा अमली पदार्थ आहे आणि तो घातक आहे हे तरी नक्की ठाऊक असेल. हे न कळायला ही काही अगदीच दूधपिती बाळे नव्हेत. अमली पदार्थांचे दुष्परिणाम माहीत नसतील तर अशी मंडळी यथावकाश डॉक्टर झाल्यावर रुग्णांना काय सांगतील? या विद्यार्थ्यांच्या बचावासाठी काही हितसंबंधी पुढे सरसावले आहेत. गांजाची लागवड कायदेशीर करावी अशी मागणी बाबा रामदेव आदींनी केलेली आहे असा त्यांचा युक्तिवाद आहे. गांजाची लागवड कायदेशीर करा अशी मागणी होत असते हे खरे, परंतु केवळ वैद्यकीय वापरासाठी ती लागवड कायदेशीर केली जावी असा त्याचा मथितार्थ आहे. व्यसनी पिढ्या निर्माण करण्यासाठी नव्हे!
जाणूनबुजून गांजाचे सेवन करून वसतिगृहामध्ये एखाद्या मुलीसोबत जायला गोमेकॉचे वसतिगृह म्हणजे रंगमहाल नव्हे. शैक्षणिक संस्थांमध्ये शिस्त गरजेची असते आणि जो काही प्रकार गोमेकॉमध्ये पाहायला मिळाला ती बेशिस्तीची परमावधी आहे. सुरक्षा रक्षकाने या नशेतील विद्यार्थी – विद्यार्थिनींना हटकले. एकूण प्रकाराची वॉर्डनलाही वेळीच कल्पना दिली. असे असताना या विद्यार्थ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न का झाला? हे कोणी बड्या बापाचे बेटे असावेत, त्यामुळेच त्यांची कारकीर्द वाचवण्याचा सध्या जोरदार आटापिटा चालला आहे. त्यासाठी विरोधी पक्षालाही भरीस घातले जात आहे. या दबावाला सरकारने मुळीच भीक घालू नये. जनतेनेही तसा आग्रह धरायला हवा.
गोव्यातील शैक्षणिक संस्थांमधील एकूण परिस्थितीचा सरकारने आढावा घेणे जरूरी आहे. अनेक व्यावसायिक महाविद्यालयांमधून पूर्वी रॅगिंग चालायचे. त्यासंदर्भात कडक उपाययोजना झाल्या तेव्हापासून ते गैरप्रकार थांबले. नशेच्या बाबतीतही अशी कडक उपाययोजना झाली तरच हे गैरप्रकार थांबतील, अन्यथा हे लोण असेच फैलावत जाईल. रॅगिंगचे भीषण प्रकार व्हायचे तेव्हा ते विद्यार्थी आहेत, नासमज आहेत म्हणून त्यांच्या गैरकृत्यांवर पडदा ओढला गेला असता तर रॅगिंग सुरूच राहिले असते. काही विद्यार्थ्यांनी त्या छळाला कंटाळून तेव्हा आत्महत्याही केल्या. नशाबाज, गांजेकस विद्यार्थी इतर अभ्यासू विद्यार्थ्यांच्या जिवाला अपाय पोहोचवू शकतात त्याचे काय? त्यामुळे कोणी कितीही राजकीय दबाव आणला तरी याबाबत गोमेकॉ प्रशासनाने केलेल्या कारवाईवर ठाम राहावे. राज्यातील शैक्षणिक संस्था गांजा, अफू आणि अमली पदार्थांचे अड्डे बनवायचे नसतील, तर या घडीस संबंधित विद्यार्थ्यांवर कडक कारवाई गरजेचीच आहे.