योगसाधना ५४२, अंतरंग योग- १२७
- – डॉ. सीताकांत घाणेकर
आपली भारतीय संस्कृती अत्यंत पुरातन आहे. आपल्या अनेक ऋषी-महर्षींनी जीव-जगत-जगदीश यांचा सखोल अभ्यास करून मानवी जीवनाचे विविध पैलू विश्वापुढे, समाजासमोर आणले. ही संस्कृती भगवंताचे सर्वव्यापकत्व मानते. अखिल विश्वातील सर्व जडचेतन घटकांमध्ये परमात्म तत्त्व आहे, असे आपले हे थोर तत्त्ववेत्ते मानतात. त्यामुळे भारत देशात मानवतेला महत्त्व दिले जातेच, पण त्याचबरोबर ‘सर्वभूतहिते रजाः’ हा आदर्श मानला जातो.
यासंदर्भात परमपूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात ः
‘प्राणिमात्रांवर प्रेम (दया नव्हे) करणे हा आपला दृष्टिकोन आहे. प्राणिमात्रांत जर भगवान वसत असेल तर त्याच्यावर दया कशी होईल? भगवंतावर प्रेम करायचे किंवा त्याची पूजा करायची. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या हृदयात प्राणिमात्रांबद्दल आदर असला पाहिजे. भारतीय संस्कृती मानवाला समग्र सृष्टीवर आत्मौपम्य दृष्टीने प्रेम करायला शिकविते.’’
प्राणिमात्र म्हटले की विविध पशु-पक्षी डोळ्यांसमोर येतात. त्यांत घरात असणारे पाळीव, जंगलांत राहणारे हिंस्र प्राणी असतात. उंदरासारखे उपद्रवी प्राणीदेखील आहेत. तसेच सापासारखे विषारीसुद्धा आहेत. त्यांतील अनेक प्राणी उपयोगी आहेत. अशा प्राण्यांवर कदाचित प्रेम करणे सोपे, पण उपद्रवी, विषारी, हिंस्र प्राण्यांवर प्रेम करणे सामान्य माणसाला अत्यंत कठीण आहे. आपल्या ऋषींनी यावर एक सुंदर उपाय काढला. त्यांतील विविध पशुपक्ष्यांचा संबंध भगवंताकडेच लावला. त्यामुळे त्यांना प्रतिष्ठा लाभली.
उदा.
- मूषक (उंदीर) ः गणपतीचे वाहन
- सर्प ः शंकराच्या गळ्यात, गणपतीच्या कंबरेत
- कासव ः शिवाच्या मंदिरात पायरीवर
- मोर ः सरस्वती/कार्तीकेय यांचे वाहन
- मोरपीस ः श्रीकृष्णाच्या मुकुटात
- गरुड ः विष्णूचे वाहन
- हत्ती ः लक्ष्मीचे वाहन
- वाघ/सिंह ः श्रीदुर्गामातेचे वाहन
- नंदी ः शंकराचे वाहन
ही जनावरे, प्राणी, पक्षी कसेही असले तरी भगवंताच्या सान्निध्यात असल्यामुळे त्यांच्याबद्दल थोडी तरी प्रेमाची भावना निर्माण होण्याची शक्यता वाढते.
यांतील काहींच्या नैसर्गिक स्वभावामुळे समग्र प्राणिसृष्टीवर प्रेम करण्यात मर्यादा आपोआप पुढे येतात. त्यामुळे ऋषींनी या सर्वांच्या प्रतिनिधीरूपाने गायीवर प्रेम व तिचा आदर करण्यास सुचविले. त्याप्रमाणे गो-पूजा सुरू झाली.
शास्त्रकार म्हणतात-
गोभिर्विप्रैश्च वैदैश्च सतीभिः सत्यवादिभिः|
अलुब्धैः दानशूरैश्च सप्तभिर्धार्यते महीः॥
- गाय, ब्राह्मण, वेद, सती, सत्यवादी, निर्लोभी व दानवीर- या सात लोकांमुळे पृथ्वीचे धारण होते.
थोडा विचार केला की, लगेच लक्षात येते- गायीचा वाटा पृथ्वीच्या धारणेत फार मोठा आहे. आज गाय म्हणजे हिंदू धर्माचे प्रतीक मानतात. तिला पूजनीय म्हणतात. इतकेच नव्हे तर महंमदानेदेखील कुराणात गायीच्या निर्दोषतेचे व प्रसन्नतेचे वर्णन करून तिच्या पूजेचा आदेश दिला आहे.
गोमातेबद्दल अभ्यास केला की विविध गोष्टी समजतात-
१) गाय मानवाला आपले सर्वस्व देते.
२) गायीचे दूध पुष्टिदायक आहे. लहान मुलांना आईच्या दुधाबरोबर गायीचे दूध प्यायला देतात, कारण ते त्या वयात पचायला सोपे जाते.
३) गायीचे शेण एक अत्यंत उपयुक्त असे खत आहे. पूर्वी आणि आतादेखील अनेक खेड्यांत घरांच्या जमिनीवर शेण सारवतात.
संशोधनात म्हणे असे आढळून आले आहे की, भिंतींना शेण सारवले तर अणुकिरण घरात शिरत नाहीत. शेण सुकल्यानंतर त्याचा इंधनासाठी उपयोग आजही अनेक गावांत करतात.
४) गोमूत्र हे आयुर्वेदाप्रमाणे विविध रोगांवर उत्तम उपाय आहे.
इथे एक गोष्ट मुद्दाम नोंद करायला हवी की, पूर्वीच्या काळी जनावरे सबंध दिवस डोंगरावर चरत असत. त्यावेळी जंतुनाशके व रासायनिक द्रव्ये खत म्हणून वापरत नसत. तसेच गायीला कृत्रिम खाद्य देत नसत. त्यामुळे दूध, मूत्र, शेण यांमध्ये अनैसर्गिक प्रदूषण होण्याची शक्यता नसे. आजच्या जीवनात या सर्व गोष्टींचे पालन होत नाही, त्यामुळे या विषयावर थोडे संशोधन करून त्यांची शुद्धता तपासणे गरजेचे वाटते.
धार्मिक विधीतदेखील गोमूत्र तीर्थाप्रमाणे प्यायला व जागा शुद्ध करण्यासाठी वापरतात.
५) गोमातेचा पुत्र- बैल- तर अत्यंत उपयोगी आहे. तो नांगर चालवून शेत नांगरतो. तसेच बैलगाडी ओढून सामानाची व माणसाची ने-आण करतो. हल्लीच्या जमान्यात त्यासाठी बैलाचा उपयोग कमी होतो. कारण नांगराऐवजी ट्रॅक्टर आला व बैलगाडीऐवजी विविध वाहने आलीत.
थोड्या विचाराअंती गायीने मानव जातीवर केलेले अनेक उपकार सहज दृष्टिक्षेपात येतील. त्यासाठी मानवजातीने कृतज्ञ राहायला हवे; नाहीतर मानवता राहणार नाही. गोमातेच्या दुधाला तरी स्मरायला हवे.
भारतीय संस्कृती कुठल्याही गोष्टीकडे फक्त उपयुक्ततेच्या नजरेने बघत नाही. परंतु दूध न देणार्या गायीला कसाईखान्यात काहीजण पाठवतात. संस्कारांअभावी काही ठिकाणी तसे होत असेल. परंतु ही फार दुःखाची गोष्ट आहे.
आपल्यातील काही पुत्र विवाहानंतर मातापित्याला सांभाळत नाहीत. त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतात. इथे कृतज्ञतेऐवजी कृतघ्नतेचे दर्शन होते. आता अवश्य काही संयुक्तिक कारणांमुळे वृद्धाश्रमाचा उपयोग केला जातो हे समजू शकतो; पण प्रत्येक बाबतीत ते योग्य नाही. म्हणूनच भारतीय संस्कार प्रत्येकावर होणे आवश्यक आहे.
इथे एका प्रथेवर विचार करायला हवा- ती म्हणजे गो-ग्रास. पूर्वी अनेक घरांत गोशाळा होत्या. पूजेनंतर आधी देवाला नैवेद्य दाखवीत, तद्नंतर वैश्वदेव- अग्नीदेवाला अन्न अर्पण करीत. मग गायीसाठी एक पान राखून ठेवले जात असे. ते पान गोशाळेतील गायींना प्रेम-भावपूर्वक देत. मातृवात्सल्याने गायीच्या पाठीवर हात फिरवीत तिला पाणी पाजत. त्यानंतर कावळ्यासाठी एका पानावर अन्न अर्पण केले जाई. एवढे सर्व झाल्यावर मग कुटुंबीय अन्न ग्रहण करीत असत. बालपणी स्वतः या सर्व गोष्टी मी बघितल्या आहेत. किती भाव-भक्तीपूर्ण प्रथा होती ही! मनाला आनंद होत असे.
हल्ली गावांत फक्त काही पुरोहितांच्या घरात व थोड्या मंदिरांत हे दृश्य पाहायला मिळते. इथे गायीकडे स्वजनासारखा भाव होता. मुक्या गायीचे स्मरण व तिच्याद्वारे सर्व प्राणिसृष्टीचे स्मरण.
दुर्भाग्याने आज या गायी रस्त्यावर भटकताना दिसतात. रहदारीत त्यांचा अडथळा होतो. त्यामुळे वाहनचालकांकडून त्यांना शिव्या मिळतात. तसेच अनेकवेळा अपघात झाल्यामुळे गायी व वासरे मृत्युमुखी पडतात.
वेळोवेळी पंचायत व राज्यस्तरावर घोषणा केल्या जातात की, या भटक्या गायींना निवारा दिला जाईल. पण अजूनपर्यंत काही ठोस कृती दिसत नाही. समाधानाची गोष्ट एवढीच आहे की, काही स्वतंत्र संस्था स्वेच्छेने गोशाळा सुरू करतात व या प्राण्यांना आसरा देतात. आर्थिकदृष्ट्या त्यांना फार कष्ट सोसावे लागतात.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेकडो गायी बुडून मरण पावल्या. स्वयंसेवकांनी त्यावेळी अप्रतिम कार्य केले. हे खरे मानवतेचे दर्शन आहे. पुण्याचे कार्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना आपण गोरक्षक म्हणतो. त्यांची जयंती साजरी करतो. पण त्यांचे संस्कार- मातृभूमी प्रेम, गोमाताप्रेम आपण उचलत नाही. अपवाद अवश्य आहेत. योगसाधक नक्कीच या विषयावर चिंतन करतील.
(संदर्भ ः प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले- ‘संस्कृती पूजन’)