गोमंतकीय लोकसंस्कृतीचा आनंदोत्सव ः शिगमो

0
16
  • डॉ. पांडुरंग फळदेसाई

गोव्याच्या सुगीच्या दिवसांचा आनंद हा शिगमो साजरा करून व्यक्त करतात. शेतीच्या हंगामात शेतकरी दिवसभर अंगमेहनतीच्या कामातून शेतात कष्ट उपसत असतो. मनासारखे पीकपाणी घरात आल्यावर तो आनंदित होतो. मनोमन समाधान पावतो. त्या समाधानाच्या निमित्ताने, त्या आनंदाप्रीत्यर्थ उत्सव साजरा केला जातो तो शिगमो. शिगमो म्हणजे गोमंतकीय लोकसंस्कृतीचा एक लोभस मानबिंदू होय. गोव्याच्या समस्त लोकसमूहाने तो अभिमानाने आजवर जपला आहे.

शिगमो हा आमच्या पिढीच्या हृदयाच्या कोपऱ्यात कायम घर करून राहिलेला उत्सव आहे. या उत्सवाने आमचे बालपण समृद्ध केले. कलात्मक परंपरेचा साक्षात्कार घडवितानाच कष्टमय बालपणाला आनंदाची झालर बहाल केली. सर्वांच्या सोबतीने आनंदाचा उत्सव कसा साजरा करायचा, याचे प्रत्यंतर या शिगम्याने आमच्या पिढीला शिकविले. शाळा-शिक्षणातील परीक्षांचा बोजा अलगदपणे बाजूला करून पारंपरिक तालवाद्ये, स्वरवाद्ये आणि गीतांच्या तालावर डोलण्याची, थिरकण्याची किमया शिगम्याने केली. त्या मधाळ स्मृती जागविताना आजचा शिगमा वृद्ध झाल्याचा भास मला कधीकधी होतो.

आज मी जेव्हा जेव्हा शिगमोत्सव आठवतो, तेव्हा माझ्या बालपणीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेचे शब्द माझ्या कानांत रुंजी घालू लागतात.
दिवस सुगीचे सुरू जाहले
ओला चारा, बैल माजले
शेतकरी-मन प्रफुल्ल झाले
छन्‌‍ खळ खळ छन्‌‍,
ढुम्‌‍ ढुम्‌‍ पट ढुम्‌‍
लेझिम चाले जोरात!
आपल्या कृषिप्रधान देशातील कोणत्याही प्रदेशात सुगीचे दिवस हे आनंदाचे, समाधानाचे असतात. महाराष्ट्रातील एखाद्या खेड्यात सुगीच्या दिवसांतला आनंद कसा लेझिमनृत्याने अभिव्यक्त केला जातो, त्याचे हे चित्र कवितेच्या रूपाने व्यक्त झाले आहे.
गोव्याच्या सुगीच्या दिवसांचा आनंद हा शिगमो साजरा करून व्यक्त करतात. शेतीच्या हंगामात शेतकरी दिवसभर अंगमेहनतीच्या कामातून शेतात कष्ट उपसत असतो. मनासारखे पीकपाणी घरात आल्यावर तो आनंदित होतो. मनोमन समाधान पावतो. त्या समाधानाच्या निमित्ताने, त्या आनंदाप्रीत्यर्थ उत्सव साजरा केला जातो तो शिगमो. सुगीअम्म या प्राचीन संज्ञेने बदल स्वीकारत आजच्या ‘शिगमो’चे रूप घेतले. फक्त पुरुष मंडळीचा असा हा शिगमो म्हणजे गोमंतकीय लोकसंस्कृतीचा एक लोभस मानबिंदू होय. गोव्याच्या समस्त लोकसमूहाने तो अभिमानाने आजवर जपला आहे.

गोव्याचा हा शिगमो तसे पाहू गेल्यास फाल्गुन शुद्ध नवमी ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत सलग दहा-बारा दिवस चालणारा उत्सव आहे. दक्षिण गोव्यातील बहुतेक गावांतून या लोकोत्सवाची सुरुवात नवमीच्या रात्री मांडावर जमून सामूहिकपणे घातलेल्या नमनाने होते. मांड हे निसर्गाशी नाते जोडून ठेवणारे पवित्र अंगण. त्याची मालकी संपूर्ण गावाची. इथे येणाऱ्या प्रत्येकाला मनीमानसी शुचिर्भूत होऊन यायचे असते. स्थानदैवते आणि ग्रामदैवतांचे स्मरणगान सामूहिक स्वरूपात करण्याचा विधी म्हणजे नमन. येथे येणाऱ्या पुरुष नर्तकाला, गायकाला अथवा वादकाला ‘गडी’ म्हणतात. नमनाचे गीत म्हणजे शिवड किंवा शिवर. त्याला जत अथवा वळ असेही म्हणतात. नमन चालू असताना काही गड्यांच्या अंगात येते. ते शुद्ध हरपतात. म्हणून अन्य सहकारी गडे त्यांना सावरतात. अनेक तास चाललेले हे नमन ऐकताना गावाच्या पंचक्रोशीतील देव-दैवतांची नामावली ध्यानात येते. तसेच शिगमोत्सवाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते प्रकर्षाने जाणवते. नमनाचा विधी संपताच एखाद्या लोकनृत्याचे सादरीकरण होऊन त्या दिवसाची समाप्ती होते.
दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण गावाची परिक्रमा हे लोकनर्तक करतात. प्रत्येक लोकनर्तक चमूला ‘मेळ’ असे संबोधतात. हे मेळ त्यांच्या संबंधित वाडा अथवा गाव किंवा जमातीच्या नावावरून ओळखले जातात. एखाद्या गावात परिक्रमा करणाऱ्या मेळांचा क्रमही परंपरेने ठरलेला असतो. त्याचे पालन इमानेइतबारे केले जाते. कारण त्याला गावाच्या मानपानाचे स्वरूप प्राप्त झालेले असते. त्यामुळे त्या परंपरेला छेद देण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही.

मेळ गावातल्या प्रत्येक घरासमोरील सारवलेल्या अंगणात आपली पारंपरिक लोकनृत्ये गायन-वादनाच्या साथसंगतीने करीत गावाची परिक्रमा ठराविक दिवसांत पूर्ण करतात. मेळातील सगळे गडे या शिगमोत्सवाच्या काळात सामूहिक भोजनाचा आस्वाद घेत असतात. काही गावांतून स्थानिक लोकही मेळाच्या भोजनाची व्यवस्था स्वखर्चाने करतात, तर कधी मेळातील सदस्य एकत्र येऊन भोजन तयार करतात. त्यासाठी लागणारा खर्च मेळाला प्रत्येक घरातून मिळालेल्या देणग्यांतून केला जातो. मेळाला देणगी म्हणून तांदूळ, नारळ, गूळ आणि रोख रक्कमही दिली जाते. त्यामुळे जेवणासाठी येणारा खर्च त्यातून सहजपणे करता येतो.
दक्षिण गोव्यातील गावांतून फिरणारे मेळ त्यांची रंगीबेरंगी वेशभूषा, अंगावरील फुलमाळा आणि सजवलेले शिरपेच यांवरून सहजपणे ओळखता येतात. त्यांच्या वादनातील पारंपरिक वाद्यांमध्ये घुमट, शामेळ, कांसाळे, झांज, ढोल, ताशा, सनई, सूर्त यांचा समावेश असतो. अर्थात ही वाद्ये गरजेप्रमाणे वापरली जातात. मेळांच्या लोकनृत्य सादरीकरणातही विविधता असते. काही आदिवासींचे मेळ चौरंग-ताळो, जत आणि थेंगयेंसाठी ओळखले जातात, तर काही ग्रामस्थांचे मेळ तोणयां मेळ, तालगडी, गोफ, मोरुलो, आरत अशा कलाप्रकारांबद्दल ओळखले जातात. या भागात विरामेळ हा स्थानिक लोकदैवताचे प्रतिनिधित्व करणारा युद्धनृत्यसदृश्य मेळ अग्रक्रमाने परिक्रमा करतो.

उत्तर गोव्यात बहुधा होळीपासून रंगपंचमीपर्यंत शिगमो साजरा केला जातो. होळीचा विधी हा संपूर्ण गावासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भाविकतेने आणि श्रद्धेने होळीपूजनाचा विधी पार पडल्यावर मेळ वा रोमट गावागावांतून फिरू लागते. मांडावरून प्रारंभ झालेले रोमट आपल्या ग्रामदैवताच्या भेटीसाठी वाजत-गाजत पदन्यास करत निघते. सोबतीला रणवाद्ये वाजत असतात. फोंडा तालुक्यातील प्रत्येक रोमटाला स्वतःची इलामत असते. त्यात कापडी तोरण, फुगे, अब्दागीर, गुढी आणि निशाणे असतात. मात्र उत्तर गोव्यातील गावांतून ही रोमटे निसर्गातील रानटी पानाफुलांनी अंग सजवतात, रंगांचाही वापर मोठ्या प्रमाणावर असतो. शिगम्याच्या मेळातून अथवा खेळ्यातून जत, सकारत, राधाकृष्ण नाच, लावणी, धोंगां असे विविध लोकअभिव्यक्तीचे प्रकार सादर केले जातात. शिगम्याच्या निमित्ताने काही गावांतून करवल्यांचे भ्रमण असते. त्या प्रकाराला ‘करावल्यो’ या नावाने संबोधले जाते. एकेकाळी गोव्यात प्रचलित असलेल्या सती प्रथेचे हे प्रातिनिधिक स्वरूपाचे कलात्मक दर्शन असावे. दोन लहान मुलांना लुगडे-चोळी नेसवून, गड्यांच्या खांद्यावर बसवून त्यांना दारोदार पोचवितात. त्या घरात त्यांची श्रद्धापूर्वक ओटी भरून मानपान केला जातो आणि पुढच्या घरात रवानगी केली जाते. शेवटच्या दिवशी होणारा समापनाचा विधी म्हणजे सतीचे प्रतिरूप असावे असे प्रकर्षाने जाणवते. सत्तरी भागातील सोकारत म्हणजे आरतीच्या भावनेने गायलेले शोकगीत. कारुण्याने ओतप्रोत असे हे गीत गायक आपल्या कल्पकतेच्या जोरावर आणि गायनकौशल्याने प्रसंग हुबेहूब उभा करून श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळवितो.

शिगम्याच्या निमित्ताने काही गावांतून आगळीवेगळी परंपरा चालत आलेली दिसते. रणमाल्यासारखे लोकनाट्य ग्रामदैवतासमोर सादर करण्यात येते. त्यात मूळ जत नावाच्या गानप्रकाराबरोबरच सोंगे आणि धोंगे यांचा नुसता सडा पडत असतो. मळकर्णे या केपे तालुक्यातील गावात शिगम्याच्या निमित्ताने ‘शेणीउजो’ हा प्रकार पाहायला मिळतो. होळीसाठी खांद्यावर वाहून आणलेली पोफळीची झाडे मंदिराच्या प्रांगणात उभी केली जातात आणि त्या खोडवजा झाडांवर चढण्याची खेळगड्यांची अहमहमिका सुरू होते. त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न म्हणजे शेणी-उजो. सुकलेल्या शेणाच्या गोवऱ्या पेटवून त्यांच्या ठिणग्या वर चढणाऱ्या गड्यांच्या अंगावर उडविल्या जातात. काही जण या प्रयत्नात अपयशी ठरतात, परंतु बहुतेक जण या अग्निवर्षावाला न जुमानता काम फत्ते करून जमलेल्या लोकांची शाबासकी मिळवितात.

सत्तरी तालुक्यातील शिगमोत्सवात दोन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतात. पहिली घोडेमोडणी आणि दुसरी चोर. सजवलेल्या नकली घोड्याची प्रतिकृती वापरून घोडेस्वार हातातील तलवार वेळावत गावच्या वेशीपर्यंत जातात. सोबतीला रणवाद्यांचा ताल आणि संपूर्ण गावातील लोकांची मिरवणूक असते. शिवाय सेवेकरीदेखील असतात. ही मिरवणूक गावच्या सीमेवरील विधी पूर्ण झाल्यावर परतात आणि ग्रामदैवताच्या स्थळी त्याचे समापन होते. याप्रसंगी कलात्मक युद्धनृत्याचे दर्शन होते. कुडणेसारख्या गावातील घोडेस्वार तलवार परजत परस्परांना भिडतात, तेव्हा तलवारीतून ठिणग्या उसळताना पाहिल्याचे मला आठवते.

सत्तरी तालुक्यात ‘चोर’ या नावाने झरमे आणि करंझोळ या गावांत होणारा विधी फारच वैशिष्ट्यपूर्ण असतो. जिवंत माणसांना खड्ड्यात पुरून आणि एकाला प्रतिकात्मकरीत्या सुळी देऊन हा विधी उरकला जातो. चार माणसांना खड्ड्यात गळ्यापर्यंत पुरतात, तर अन्य चार माणसांची डोकी खड्ड्यात पुरतात आणि फक्त गुडघ्याखालचा भाग तेवढा डोळ्यांना दिसतो. कधीकाळी त्यांच्या पूर्वजांच्या हातून घडलेल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून हा ‘चोर’ उत्सव साजरा केला जातो.
गोव्यातील एखाद्या मंदिराच्या वार्षिकोत्सवालाही शिगमो म्हणण्याची प्रथा आहे. परंतु होळीच्या दिवसांत साजरा होणाऱ्या या शिगम्याची सर त्याला येऊच शकत नाही. निसर्गाशी एकरूप होतानाच, निसर्गाच्या बहराचे हार्दिक स्वागत करीत येणारा शिगमो हा गोव्याच्या लोकसंस्कृतीचे आनंदमयी संचित होय.