गोमंतकीय महिला

0
191
  • प्रा. नागेश सु. सरदेसाई

आज आपल्या ‘कुटुंबा’मध्ये महिलेचा स्तर फार उंचावलेला आहे. महिलेची साक्षरता म्हणजेच परिवाराची आणि देशाची साक्षरता, असे म. गांधी म्हणत. त्यादृष्टीने महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मजल मारलेली पाहावयास मिळते.

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. आपले गोवा राज्य हे देशातले एक आदर्श राज्य आहे असे आपण सहजपणे म्हणू शकतो. एक धावती नजर फिरवली तर आपल्याला कळेल की गोव्यातील महिलांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे.

१९६१च्या पोर्तुगीज राजवटीतल्या सुटकेनंतर गेल्या सहा दशकांमध्ये महिलांनी विशेष दर्जा मिळविला आहे. गोव्याच्या राजकारणापासून जर आम्ही सुरुवात केली तर कै. शशिकलाताई काकोडकर या राज्याच्या दुसर्‍या मुख्यमंत्री झाल्या. त्यांच्या सहा वर्षांच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या कायद्यांची भर पडली. शशिकलाताई देशातल्या काही निवडक अशा मुख्यमंत्र्यांच्या पंगतीत आहे. त्याशिवाय कै. व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी १९६७ च्या जनमतकौलात विशेष भूमिका बजावली होती. त्याच अनुषंगाने बघितले तर इलु मिरॉंडा, फेरल फुर्तादो, उर्मिदालिमा लेतांव, सुलोचना काटकर, फिलीस फारिया, निर्मला परब सावंत इत्यादींनी राजकारणात नाव कमावले.

जर आपण निर्मलाताईंची कारकीर्द बघितली तर आपल्याला कळेल की त्यांनी समाजसेवेत उत्कृष्ट भूमिका बजावलेली आहे. ‘म्हादई बचाव अभियाना’च्या त्या संस्थापक सदस्या होत्या. पण जर विधानसभेतील आमदारांची सख्या बघितली तर आपल्याला कळून येईल की महिलांचे प्रतिनिधीत्व फार कमी आहे. ही संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. एक आनंदाची गोष्ट म्हणजे संयोगिता राणे सरदेसाई या लोकसभेच्या सदस्य निवडून आल्या होत्या.

साहित्याच्या क्षेत्रात गोवेकर महिलांनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. शीला कोळंबकर, मीना काकोडकर, जयमाला दणायत, हेमा नाईक इत्यादींची नावे घेता येतील. साहित्य हा समाजाचा आरसा असतो, असे म्हटले जाते. आजच्या २१व्या शतकातल्या विविध आव्हानांना पेलताना महिलांनी साहित्याच्या माध्यमाचा फार उपयोग केला आहे. आज मराठी, कोंकणी किंवा इंग्रजी भाषांमध्ये साहित्य लिहिले जाते आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून गोवेकर महिलांनी नाव मिळवलेले आहे. सुनिता प्रभुगावकर, देविका सिक्वेरा, लीना पेडणेकर इत्यादींनी आपल्या लेखणीतून समाजामध्ये प्रबोधन केले आहे. त्याचा फायदा सामान्य महिलांपर्यंत पोचतो आहे.
आज कला आणि संगीत क्षेत्रही महिलांपासून दूर राहिलेले नाही. मगुबाई कुर्डीकर, सुरश्रीबाई केरकर, किशोरी आमोणकर, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर इत्यादींनी या क्षेत्राला संजीवनी दिली आहे. संगीत क्षेत्रात गोव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून दिलेले आहे.

खेळातूनही विशेष प्रकारचा आनंद मनुष्याला होत असतो, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. गोव्यातील खेळाडूंकडे आपण नजर फिरविली तर आपल्याला समजेल की गोव्याच्या मुली देशात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवत आहेत. नताशा पालां टेनिस खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव जागवत आहे. त्याचप्रमाणे भक्ती कुलकर्णी बुद्धीबळ खेळात आंतरराष्ट्रीय मास्टर बनलेली आहे. १३वर्षीय पर्ल कोलवाळकर या मुलीला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. ती देशातली कमी वयाची याचिंग खेळगडी आहे.

आजच्या काळात जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करतो तेव्हा आमच्यासमोर आजही अनेक आव्हाने आहेत असे दिसून येते. भारत तसेच राज्य सरकारच्या अनेक योजना, मुलींचे शिक्षण, संगोपन आणि विकासावर फार पैसा खर्च करतात. देशातल्या तुलनेत गोवा राज्य अग्रेसर आहे. आज आपला शैक्षणिक दर्जा फार उंचावला आहे. हल्ली गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात जवळजवळ ६० टक्के मुली पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन मुलांपेक्षा पुढे गेलेल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात गोव्यातल्या मुली नाव मिळविताना आपल्याला दिसतात. आज आपल्या ‘कुटुंबा’मध्ये महिलेचा स्तर फार उंचावलेला आहे. महिलेची साक्षरता म्हणजेच परिवाराची आणि देशाची साक्षरता, असे म. गांधी म्हणत. त्यादृष्टीने महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मजल मारलेली पाहावयास मिळते.
तरीही गोव्यामध्ये आजची आव्हाने कोणती?….
‘कुटुंब’व्यवस्था सांभाळून ठेवणे ही काळाची गरज आहे. आजच्या बदलत्या आधुनिकीकरणाच्या युगात प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची काळजी भासू लागलेली आहे. आजच्या ‘रॅट रेस’च्या युगात कमीत कमी वेळेत सर्वांत ज्यादा पैसे मिळवण्याची होड चालू आहे. आम्ही आमच्या युवा पिढीमध्ये चांगले संस्कार आणि नीतिमूल्ये रुजवण्याची फार गरज आहे. शेकडो वर्षांपासून आपल्या देशात ‘संस्कार’ पिढी दरपिढी पोचविण्यात येत असत. परंतु आज आपली कुटुंबव्यवस्था कोलमडली आहे. कुटुंबातील आजी-आजोबा- काका-काकी, मामा-मामी, चुलनभाऊ-मामेभाऊ इत्यादी नाती कमी होतांना दिसत आहेत. याला जबाबदार आमची कुटुंबनियोजनाची प्रणाली आहे. ‘हम दो हमारे दो’ हे ब्रीदवाक्य घेऊन पुढे जाताना आम्ही सर्व नातीगोती तर विसरत नाही? आज आपल्याला आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे आपण मुलीची काळजी करत असतानाच कुटुंबाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जर आपल्याला सुसंस्कृत समाज घडवायचा असेल तर आजच्या शिक्षणप्रणालीमध्ये सुधार आणणे अतिशय आवश्यक आहे. जर आपण विशेष परिश्रम घेऊन गुणात्मक आणि दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर आपला समाज अत्यंत वैभवशाली बनेल.

म्हणून उद्याचा महिला दिन साजरा करण्याबरोबरच आम्ही गोवा आदर्श राज्य बनवण्यासाठी सर्व स्तरांवर काम करून एक नवीन कार्यप्रणाली घडवू आणि घर, शाळा, समाज, परिवार अशा सर्व पातळ्यांवर बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू. सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा!!