गोमंतकीयांना पिण्याचे पाणी मोफत किंवा कमी दरात

0
43

मुख्यमंत्री आज अधिकृत घोषणा करणार

गोमंतकीयांना पिण्याचे पाणी एक तर मोफत अथवा कमीत कमी दरात पुरवण्याचा गोवा सरकारचा विचार असल्याचे संकेत काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काल दिले. ह्या संबंधीची घोषणा आज स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांकडून होण्याची शक्यता आहे.

राज्यातील जनतेला एक तर मोफत अथवा कमीत कमी दरात पिण्याचे पाणी पुरवण्यात येईल, अशी घोषणा आपण आपल्या अर्थसंकल्पातून केली होती. उद्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ह्या संदर्भात आपण महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. पर्वरी येथील ५ एमएफडी जलशुद्धीतकरण प्रकल्प येत्या ८ ते १० दिवसांत सुरू होईल. तिळारीतून पाणी आणून त्याचे शुद्धीकरण करून ते पाणी साळगांवला पुरवण्याची योजना असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. साळगांव येथे चोगम रस्त्याच्या कामाची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.
कोविडमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील पारंपरिक व्यावसायिकांना गणेश चतुर्थीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रु.चे अर्थसाहाय्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ह्या योजनेचे अर्ज वितरित करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली.

कोविड मृतांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य
कोविडमुळे राज्यात ज्यांचा मृत्यू झाला त्या मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी २ लाख रु. देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्राकडून मदत नाही
कोविड मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नसून केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रु.चे अर्थसाहाय्य देण्याची योजना तयार केली असल्याचे वृत्त खोटे आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.