- – विश्राम गावकर
(माजी प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र)
बदलत्या हवामानामुळे माणूस अस्वस्थ होत आहेच; पण झाडे व लहान प्राणी यांच्यावरही परिणाम पाहायला मिळतो. झाडांची शास्त्रीय वाढ, फुलोर्याचा काळ, फुला-फळांची गुणवत्ता यावर अनाकलीनय परिणाम होत आहेत. शास्त्रज्ञही याबाबतीत हवामानाच्या विविध घटकांचा व झाडांच्या प्रतिसादाचा अभ्यास करत आहेत. गोमंतकातील फळपिकांवरही या हवामान बदलाचा परिणाम झालेला आहे. यंदा शेतकर्यांचे फळपिकाचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. त्यामुळे बाजारात गोमंतकीय फळे अभावानेच दिसत आहेत. बदलत्या काळाशी सुसंगत अशी फळलागवड होणे आवश्यक आहे. जाणून घेऊया फळझाडे आणि त्यांची निगा कशी घ्यावी याबाबत थोडक्यात माहिती….
हवामान बदलाची चर्चा बर्याचवेळा अवेळी पडणारा पाऊस, खूप काळ दिसणारे ढगाळ वातावरण, सरासरीपेक्षा वाढीव तापमान, या व अशा अनेक हवामानाशी संबंधित गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत चालल्या आहेत. माणूस यामुळे अस्वस्थ होत आहेच; पण झाडे व लहान प्राणी यांच्यावरही परिणाम पाहायला मिळतो.
झाडांची शास्त्रीय वाढ, फुलोर्याचा काळ, फुला-फळांची गुणवत्ता यावर अनाकलीनय परिणाम होत आहेत. शास्त्रज्ञही याबाबतीत हवामानाच्या विविध घटकांचा व झाडांच्या प्रतिसादाचा अभ्यास करत आहेत. शेतकरी, वनस्पतीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, शिक्षकही याबाबतीत चौकस आहेत.
गोवा हा शेतीप्रधान प्रदेश आहे. अन्नधान्याच्या पिकांपेक्षा गोव्यात फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गोव्यात नारळ, काजू, आंबा, फणस यांसारख्या पिकांची लागवड केली जाते. जाणून घेऊया गोमंतकीय विविध फळपिकांच्या लागवडीविषयी थोडक्यात माहिती…
नारळ ः गोव्यात सुमारे २६,००० हेक्टर क्षेत्रात नारळाची लागवड केली जाते. गोवा नारळी-पोफळींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. नारळ बागायतदारांना सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे वन्यप्राण्यांची; विशेषकरून माकड आणि खेती यांची. नारळीची लागवड शेतकरी करतात, पण नारळ फस्त करण्याचे काम खेती करतात. वाळपई तालुक्यात तर हा प्रश्न इतका गंभीर आहे की काही शेतकर्यांनी नारळीच्या बागांकडे लक्ष द्यायचे सोडून दिले आहे. दुसरी समस्या ही आहे की, एकूण खर्चाची तुलना करता गेली कित्येक वर्षे नारळाचे दर फारसे वाढलेले दिसत नाहीत. मजुरांचे मात्र दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे नारळ शेती फायदेशीर करावयाची असल्यास यांत्रिकीकरणाची गरज आहे. तसेच मिश्रपिके घेऊन उत्पादन वाढविण्याची गरज आहे. वन्यप्राण्यांचा प्रश्नही सोडवणे आवश्यक आहे. नारळ बागायतदारांना भेडसावणारी तिसरी समस्या आहे ती म्हणजे ‘पाडेली’ची! बर्याच ठिकाणी पाडेली मिळत नाहीत. मिळाले तर त्यांचे दर भरमसाठ असतात. कृषी खात्याने जास्तीत जास्त युवकांना पाडेलीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
काजू ः गोव्यातील दुसरे महत्त्वाचे पीक म्हणजे काजू. गोव्यात सुमारे ५६,००० हेक्टर क्षेत्रात काजूची लागवड केली जाते. ग्रामीण भागात काजू म्हणजे आर्थिकतेचा कणा आहे. परंतु गेली अनेक वर्षे काजूचे दर फारसे वाढलेले नाहीत. त्यामुळे काजूपिकापासून अलीकडच्या काळात कमी फायदा मिळतो. काजूच्या पिकावर हवामान बदलाचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. या वर्षी काजू पिकाचे उत्पन्न फारच म्हणजे ५० टक्क्यांच्या आसपास येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. काजू बागायतदारांना अजून एक समस्या भेडसावत आहे, ती म्हणजे, काजूचा ‘खोडकिडा.’ दरवर्षी सुमारे १०-१५ टक्के काजूची झाडे खोडकिड्यामुळे मरतात. संपूर्ण गोव्याचा विचार केल्यास दरवर्षी सुमारे ४-५ लाख झाडे या खोडकिड्यामुळे मरतात. या किडीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात ही कीड उग्र रूप धारण करू शकते.
काजू पिकामध्ये मिश्रपिके घेणे आवश्यक आहे. बहुतेक शेतकरी कुठलेही मिश्रपीक घेत नाहीत. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी मिरी हे अत्यंत फायदेशीर मिश्रपीक बनू शकते. काजूचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकर्यांनी सुधारित जातीच्या तसेच स्थानिक जातीच्या कलमांपासून लागवड करणे आवश्यक आहे.
सुपारी ः गोव्यात सुमारे १,७०० हेक्टर क्षेत्रात सुपारीची लागवड केली जाते. सुपारीच्या बागेत मिश्रपिके घेतली तर सुपारीची लागवड जास्त फायदेशीर ठरू शकते. मिरी हे त्यासाठी एक अत्यंत फायदेशीर मिश्रपीक आहे. सुपारी पिकाला ‘जलद मर’ या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान न होण्यासाठी मिरीची लागवड केली तर ‘जलद मर’ या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. एका मिरवेलीच्या वेलीपासून दोन किलो मिरी मिळतात. आजच्या बाजारदराचा विचार करता एका मिरवेलीपासून १००० रुपयांचे उत्पन्न मिळते.
सुपारीमधील दुसरे महत्त्वाचे आणि फायदेशीर मिश्रपीक आहे ते म्हणजे जायफळ. जायफळ या पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात दिसून येतो. जायफळाची लागवड रोपापासून न करता ती कलमाचा वापर करून करावी. कलमाचा वापर केल्यास नर-मादीचा प्रश्न राहत नाही. जायफळाच्या एका झाडापासून ३०० ते ५०० जायफळे मिळतात. अशा प्रकारे सुपारीच्या बागेमध्ये मिरवेल तसेच जायफळ या दोन फायदेशीर पिकांची लागवड करून उत्पादन वाढवता येते.
आंबा ः गोव्यात आंब्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या बागा फार कमी प्रमाणात आहेत. परंतु परसबागेत, नारळ-पोफळीच्या बागेत, शेताच्या बांधावर आंब्याची भरपूर झाडे दिसतात. आंब्यापासून चांगले उत्पन्न घ्यावयाचे असल्यास प्रामुख्याने दोन गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट म्हणजे, आंबा सावलीत लावू नये. सावलीत लावलेले आंब्याचे झाड कमी व उशिरा पीक देते. त्यामुळे आंब्याचे झाड अशा जागी लावावे जिथे भरपूर व दिवसभर ऊन असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चार वर्षांनंतर आंब्याच्या झाडाला पाणी देऊ नये. पावसाळा संपल्यानंतर पाणी बंद करावे. फलधारणा झाल्यानंतरच पाणी द्यावे. गोव्यात ‘मानकुराद’ या आंब्याच्या जातीला जास्त मागणी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या जातीची लागवड केल्यास शेतकर्यांना जास्त फायदा मिळू शकतो. याशिवाय आम्रपाली, रत्ना, केसर यांसारख्या जाती आता गोव्यात लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. यंदा हवामान बदलाचा परिणाम आंबा पिकावर बर्यापैकी झालेला आहे. कमाल तापमान ज्यावेळी ३२ डिग्री सेंटिग्रेडच्या वर जाते त्यावेळी लहान फळे मोठ्या प्रमाणात गळून पडतात. या वर्षी अशा प्रकारे आंबे गळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते आहे. या वर्षी थंडी बर्यापैकी पडल्यामुळे आंब्याच्या झाडांना चांगला मोहर आला होता व फलधारणाही चांगली झाली होती; मात्र मार्च-एप्रिलमध्ये तापमान वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात फळांची गळ झाली. फळांची गळ कमी करण्यासाठी झाडांना चांगले पाणी द्यावे. तसेच शक्य असल्यास झाडावर पाण्याचा फवारा मारावा.
पपई ः वीस-तीस वर्षांपूर्वी गोव्यात पपईची लागवड फारच कमी प्रमाणात असायची. कारण पपईवर विषाणूचा प्रादुर्भाव व्हायचा. अलीकडच्या काळात या रोगाचे प्रमाण फारच कमी झाले आहे. पपईची फळे वर्षभर मिळतात, त्यामुळे शेतकर्यांना जास्त फायदा होतो. परंतु ज्या ठिकाणी माकडांचा उपद्रव आहे अशा जागी पपईच्या लागवडीचा विचार करू नये.
केळी ः केळी हे असे एकमेव फळपीक आहे, ज्याचे उत्पन्न शेतकर्याला एक वर्षाच्या आत मिळते. त्यामुळे नारळीच्या बागेत सुरुवातीची पाच वर्षे केळीचे पीक मिश्रपीक म्हणून घेता येते. असे केल्यामुळे एक वर्षाच्या आत उत्पन्न तर मिळतेच, शिवाय नारळाच्या लहान रोपांना सावली मिळते. गोव्यात केळीच्या सालदारी, रसबाळी, वेलची, सावरबोंडी यांसारख्या जातींना चांगली मागणी आहे. शिवाय केळीचे फुटवे विकून शेतकर्याला चांगले उत्पन्न मिळते. काही वर्षांपूर्वी केळीला ‘बंची टॉप’ या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव व्हायचा. सध्या या रोगाचे प्रमाण बर्यापैकी कमी झालेले आहे.
गोव्यात फळपिकांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर सरकारने शेतकर्यांना खालील मदत करणे आवश्यक आहे ः
१. मजुरी खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर दिला पाहिजे. त्यासाठी शेतीकरिता लागणार्या विविध यंत्रांवर सरकारने १०० टक्के अनुदान देणे आवश्यक आहे.
२. जंगली प्राण्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी सरकारने प्रत्येक शेतकर्याला १० फूट उंच पक्की भिंत बांधण्यासाठी १०० टक्के अनुदान द्यावे.
३. माकड आणि खेती यांपासून सर्वात जास्त उपद्रव होत असल्यामुळे या दोन प्राण्यांना ‘व्हरमीन’ म्हणून जाहीर करावे.
४. ‘कसेल त्याची जमीन’ असे आम्ही म्हणतो, तसेच सरकारने ‘कसेल त्याला अनुदान’ ही पद्धत अवलंबली पाहिजे. मालकी हक्काचा विचार न करता सर्व शेतकर्यांना अनुदान द्यावे.
५. शेतकर्याचे जंगली प्राण्यांपासून नुकसान झाले तर त्यांना १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी.
अशा प्रकारे जर सरकारने शेतकर्यांना मदत केली तर गोव्याची ही भूमी फळपिकांनी फुलून जाईल व ती सुजलाम् सुफलाम् होईल यात शंका नाही.