आरोग्यास घातक रंगांचा वापर
सांताक्रुझ येथील फेस्ताच्या फेरीतील सर्व १४ गोबी मंच्युरियनची दुकाने काल अन्न आणि औषध प्रशासनाने बंद पाडली. आरोग्यासाठी अत्यंत घातक व ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो असे अनैसर्गिक रंग हे लोक गोबी मंच्युरियन या पदार्थांत घालत असल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच त्यांना नोटीस देऊन दुकाने बंद करण्याचा आदेश दिला होता. मात्र असे असतानाही या लोकांनी आपली दुकाने चालूच ठेवून गोबी मंच्युरियन विकणे चालू ठेवले होते. हे दुकानदार आपल्या दुकानांबाहेर चांगल्या कंपनीचे सॉस ठेवत होते. मात्र, प्रत्यक्षात दुकानांच्या अत्यंत खालच्या दर्जाचा व वापरण्यास बंदी असलेला रंग या मंच्युरियनमध्ये घालून ग्राहकांना देत असत. ते वापरीत असलेला रंग हा निकृष्ठ दर्जाचा असल्याने तो त्यांना अगदी स्वस्तात मिळतो. मात्र, प्रत्यक्षात या घातक रंगावर बंदी आहे. तो पोटात गेल्यास कर्करोग होण्याची भीती असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्यानी सांगितले. अन्न पदार्थ्यांना रंग घालणे हे घातक असून आता तंदुरीची दुकाने तसेच जी रेस्टॉरंटन्स अन्न पदार्थांत रंग घालतात अशा रेस्टॉरंटवरही खाते छापे मारणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनातील सूत्रानी स्पष्ट केले.