भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी ३ जून रोजी एचएस प्रणॉय याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे समोर आले आहे. भारतीय बॅडमिंटन महासंघाने २ जून रोजी सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी तसेच समीर वर्मा यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठवली होती. यावेळी प्रणॉय याने आपली भावना ट्विटरद्वारे व्यक्त केली होती. ‘तीच जुनी कहाणी, राष्ट्रकुल व आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेत्याचे नाव नाही व एकाही प्रमुख स्पर्धांत नसलेल्याचे नाव सूचवले जाते, असे ट्विट त्याने केले होते. प्रणॉयने हे ट्विट आता टिलिट केले आहे.
महासंघाने प्रणॉयचे नाव न पाठवल्याची माहिती मिळताच स्वतः खेलरत्न पुरस्काचे माजी विजेते असलेल्या गोपीचंद यांनी प्रणॉयचे नाव पाठवले. राष्ट्रीय पुरस्काराचे माजी विजेते असलेल्या खेळाडूंना शिफारस करण्याचा हक्क देण्यात आला आहे. गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने नव्हे तर माजी पुरस्कार विजेते म्हणून प्रणॉयच्या नावाची शिफारस केली आहे. गोपीचंद व प्रणॉय या दोघांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.