गोपालरत्न पुरस्काराचे निकष बदलणार

0
126
  • प्रमोद ठाकूर

राज्य सरकारच्या पशुसर्ंवधन खात्यातर्फे दूध उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी दूध उत्पादकाला घोषित करण्यात आलेला गोपालरत्न पुरस्कारासाठी तयार करण्यात आलेल्या निकषात त्रुटी आढळून आल्याने त्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी दूध उत्पादनाबरोबरच जनावरांचे संगोपन व एकंदर व्यवस्थापन या निकषांचा विचार केला जाणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. संतोष देसाई यांनी दिली.

भाजपच्या मागील सरकारच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वर्ष २०१६ च्या अंदाजपत्रकात राज्यात सर्वाधिक दुधाचे उत्पादन करणार्‍या दूध उत्पादकाचा गोपाल रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली होती. तथापि, पशुसंवर्धन खात्याने अद्यापर्यंत गोपाळ रत्न पुरस्काराचे वितरण केलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर बोलताना खात्याचे संचालक डॉ. देसाई म्हणाले की, गोपाल रत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आल्यानंतर या पुरस्कारासाठी दूध उत्पादकांची निवड करण्यासाठी निकष तयार करण्यात आला होता. त्यात केवळ सर्वाधिक दूध उत्पादन असा एकमेव निकष निश्‍चित करण्यात आला होता. वरील निकषानुसार पुरस्कारासाठी दूध उत्पादकाची निवड करण्याची प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर निकषामध्ये त्रुटी असल्याचे आढळून आले. त्यामुळे नव्याने निकष तयार करून पुरस्कार वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

दूध उत्पादकाने वार्षिक कमीत कमी एक लाख लीटर किंवा प्रतिदिन २५० लीटर दुधाचा पुरवठा केला पाहिजे, अशी खात्याने तयार केलेल्या निकषामध्ये प्रमुख अट आहे. खात्याचा केवळ एकच मापदंड पुरस्कारासाठी पुरेसा नसल्याचे अधिकार्‍यांच्या लक्षात आले. केवळ एकच मापदंडानुसार पुरस्कार दिल्यास गेली कित्येक वर्षे दूध उत्पादन क्षेत्रात कार्यरत असणार्‍या दूध उत्पादकांवर अन्याय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. राज्यात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या दूध उत्पादकांच्या एकंदर दूध उत्पादन क्षेत्रातील कार्याचा आढावा पुरस्कारासाठी विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात दूध उत्पादनाबरोबर, दूध व्यवसाय व्यवस्थापन, जनावरांचे पालन पोषण या बाबींचा विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोपाल रत्न पुरस्कारासाठी नव्याने निकष तयार केल्यानंतर अर्ज मागवून पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, असेही डॉ. देसाई यांनी सांगितले.