लाखभर भाविकांची उपस्थिती : मुंबईच्या कार्डिनलचा भाविकांना संदेश
देव आपल्या मागण्यांकडे कधीच दुर्लक्ष करीत नाही. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी केलेल्या मागण्यांसाठी कळ सोसावी. देव कधी ना कधी तरी ते निश्चितच देईल व आपली इच्छा पूर्ण करील, असे प्रतिपादन मुंबईचे कार्डिनल वॉझवर्ल्ड ग्रासीएस यांनी काल जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्या सकाळच्या प्रमुख प्रार्थनासभे वेळी उपदेशपर संदेशात केले. काल दिवसभरात दीड लाखांहूनही अधिक भाविकांनी फेस्त आणि अवशेष दर्शन सोहळ्यात भाग घेतला.या फेस्ताला देशविदेशातील भाविकांनी सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली. काल रात्री बेसपूर हा धार्मिक सोहळा झाल्यानंतर मध्यरात्रीपासून वार्षिक फेस्ताला सुरुवात झाली. पहाटे ४ वाजता पहिली प्रार्थना सभा द बॅसिलिका ऑफ बॉंज जिझसच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य सभा मंडपात घेण्यात आली. दिवसभरात याच मंडपाच्या वेदीवर भाविकांना धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले.
प्रमुख प्रार्थनासभेला सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली. या सभेला प्रमुख सेलिब्रंट मुंबईचे कार्डिनल वॉझवल्ड ग्रासीएस यांनी संदेश भाविकांना दिला. यावेळी त्यांच्या समवेत सिंधुदुर्गचे बिशप ऑलव्हिन बार्रेटो, गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव, आर्चबिशप इम्यॅरिटस राहुल गोन्साल्विस व ब्लास्को कुलासो आदिंचा समावेश होता. मुख्य प्रार्थनासभा कोकणी व इंग्रजी भाषेतून झाली तर दिवसभरात कोकणी, स्पॅनिश व इंग्रजी भाषेतील प्रार्थनासभांचा लाभ भाविकांनी घेतला. दर एका तासाच्या अंतराने येथे प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते.
यंदा गोंयच्या सायबाचे अवशेष प्रदर्शन से कॅथेड्रल चर्चमध्ये चालू असल्याने येथेही मोठ्या संख्येतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी ६ वाजता हे प्रदर्शन खुले ठेवण्यात आले होते ते संध्याकाळी ७ वाजता बंद करण्यात आले. दि. ४ जानेवारीपर्यंत भाविकांना अवशेष प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. चर्चपर्यंत शेडचीही सोय करण्यात आली होती. दिवसभरात गांधी चौक व जुने गोवे पंचायत परिसरात फेरीला ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून आली. प्रत्येक स्टॉल्सवर खरेदीसाठी लोकांनी ही गर्दी केली. चणे, च्योरीस, खांजे, खेळणी, मेणबत्त्या, फुले आदिंची मोठ्या प्रमाणात येथे विक्री झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेमुळे भाविकांना त्रास सोसावा लागला. पोलीस आपण आपली भूमिका चोख बजावत असल्याचे सांगत होते. तरीही भाविकांना या समस्येला तोंड द्यावे लागले. पाणी, शौचालय व निवासाची येथे सोय करण्यात आली होती. जेवणाची सोय स्वतः भाविकांनी केली.
द बॅसिलिका बॉम जिझस चर्च व से कॅथेड्रल चर्च परिसरात दिवसभरात भाविकांनी दर्शनासाठी व प्रार्थनासभेसाठी गर्दी केली. येथे कोणताही गोंधळ गडबड होता कामा नये यासाठी भाविकांना रांगेत सोडण्यात आले. सभामंडपात प्रार्थनासभेसाठी खास आसन व्यवस्था केली होती. वरिष्ठ धर्मगुरू, अतिमहनीय व्यक्ती, राज्यपाल, मंत्रीगण, आमदार यांच्यासाठी खास आसन व्यवस्था केली होती. गोवा व महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी येथे कार्यरत होते तसेच स्थानिक चर्चच्या स्वयंसेवकानीही भाविकांना आज येथे सहकार्य केले.