गैर बोललात!

0
5

विधानसभेत आश्वासन देऊनही डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यंदा ‘जनमत कौल दिन’ अधिकृतपणे साजरा केला नाही, त्यामुळे त्यांना गोव्याच्या अस्मितेची ॲलर्जी आहे असा आरोप करताना गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांची जीभ काल घसरली. खऱ्या अर्थाने गोव्याचे भाग्यविधाते गणले गेलेले राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनाही गोव्याच्या अस्मितेची ॲलर्जी होती, असे म्हणण्यापर्यंत सरदेसाई यांची मजल गेली आहे. ज्या लोकनेत्याबद्दल गोव्याचा बहुजन समाज नितांत आदर बाळगतो, ज्यांच्या दूरदर्शी आणि लोकाभिमुख नेतृत्वाची आजही आठवण काढतो, अशा भाऊसाहेबांना गोव्याच्या अस्मितेची ॲलर्जी होती असे म्हणणे अत्यंत बेजबाबदारपणाचे, त्या वंदनीय व्यक्तिमत्त्वाचा आणि गोव्याच्या बहुजनसमाजाचा अपमान करणारे आहे. जणू एका सरंजामशाही प्रवृत्तीचेच दर्शन सरदेसाई यांनी ह्या आपल्या विधानातून घडवले आहे. बेजबाबदार विधाने करण्याची त्यांची खोड जुनीच आहे. अलीकडेच ‘मराठी खंयची’ असा सवाल करून नंतर माफी मागण्याची पाळी त्यांच्यावर ओढवली होती. प्रत्येक राजकीय नेत्याला, पक्षाला आपली अशी एक भूमिका घेऊन पुढे जाण्याचे स्वातंत्र्य असते. जसे आज सरदेसाई यांना हे तथाकथित ‘अस्मिताये’चे तुणतुणे वाजवायचे स्वातंत्र्य आहे, तसेच भाऊसाहेबांना आणि त्यांच्या पक्षाला देखील नुकत्याच मुक्त झालेल्या गोव्याच्या भवितव्याविषयी विचार करण्याचे आणि त्यानुरूप आपली भूमिका ठरविण्याचे स्वातंत्र्य होते. गोव्यासारखा छोटासा प्रदेश आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ शकणार नाही, त्यामुळे केंद्रशासित प्रदेश म्हणून केंद्राच्या तालावर नाचण्यापेक्षा त्याचे शेजारच्या महाराष्ट्रात – ज्या भूमीशी त्याचे सांस्कृतिक नाते आहे, त्यात त्याचे विलीनीकरण व्हावे अशी भूमिका महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तेव्हा घेतली होती. ती कितपत बरोबर कितपत चूक हा भाग वेगळा, परंतु त्याचा अर्थ त्या पक्षाच्या सरकारचे नेतृत्व चालवणाऱ्या भाऊसाहेबांना गोव्याच्या अस्मितेची ॲलर्जी होती असे म्हणणे योग्य नव्हे. मुळात ही जी काही तथाकथित ‘अस्मिताय’ सांगितली जाते, ती काय आहे हेही तपासण्याची त्यामुळे गरज आहे. गोव्याचे आजचे तीन तालुके 451 वर्षे पोर्तुगिजांच्या टाचेखाली राहिले. त्याच्या जवळजवळ सात पट असलेला उर्वरित गोवा हा जेमतेम दीडशे वर्षे पोर्तुगिजांच्या राजवटीखाली राहिला. गोव्याची मूळ संस्कृती ही भारतीय संस्कृतीच होती. गोव्यावर वेळोवेळी ज्या राजसत्तांनी राज्य केले, ते सगळे स्वदेशी शासक होते, त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या गोवा आणि बाजूचा प्रदेश यांचे नाते कायम होते. पोर्तुगीज हे परकीय होते. ते येथे अवतरले आणि येथील संस्कृतीनाशाचे धोरण त्यांनी अवलंबिले. येथील हिंदू समाजावर नाना तऱ्हेचे निर्बंध लादले गेले, त्यांची पोथ्यापुराणे जाळली गेली, जबरी धर्मांतरे करविली गेली. गोव्याची खरी संस्कृती आणि अस्मिता पुसून टाकण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो पोर्तुगिजांनी केला. त्याच्या जागी आपल्याला अनुकूल राहील अशा, मिंध्या प्रजेच्या निर्मितीचा पोर्तुगिजांचा प्रयत्न राहिला. त्यासाठी मिशनऱ्यांना मुक्तहस्त दिला गेला. येथील पुरातन मंदिरांची तोडफोड काय, पोथ्यापुराणांची, ग्रंथांची जाळपोळ काय, देशी भाषांवर निर्बंध काय, हरेक तऱ्हेने येथील मूळ संस्कृतीच्या नाशाचे धोरण त्यांनी अवलंबिले. गोवा हा उर्वरित भारतापेक्षा वेगळा आहे हे भासवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला. खरे तर गोव्याच्या भूमीवरचे हे परकीय आक्रमण होते. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा सर्व स्तरांवरचे हे आक्रमण होते. आजही त्याचे अवशेष आपल्या समाजजीवनामध्ये ठायीठायी दिसून येतात. डॉ. टी. बी. कुन्हा यांनी ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ मध्ये त्याचा लेखाजोखा मांडला आहे. आजही पोर्तुगाजचे गोडवे गाणारे लोक येथे आहेत. आजही पोर्तुगालचा राष्ट्रध्वज गाड्यांवर मिरवणारे, भारतीय नागरिकत्व त्यागून पोर्तुगालचे राष्ट्रीयत्व प्राप्त करण्यासाठी धडपडणारे लोक आहेत. भारतीय संस्कृतीविषयी त्यांना यत्किंचितही प्रेम नाही. गोव्याची संस्कृती भारतीय संस्कृतीपेक्षा वेगळी कधीच नव्हती आणि नाही. येथे युरोपीयांच्या आगमनामुळे आलेला थोडाफार खुलेपणा, हिंदू व ख्रिस्ती समाजातील सलोखा, सौहार्दाने शांततामय जीवन जगण्याची वृत्ती ही गोव्याची अस्मिता आहे असे मानले तरी भाऊसाहेबांसारख्या लोकनेत्याला ह्या अस्मितेची ॲलर्जी होती असे म्हणणे गैर आहे. विलीनीकरण हा त्यांच्यासाठी राजकीय मुद्दा होता. त्याचा अर्थ ते गोव्याचे आणि गोमंतकीयांचे द्वेष्टे होते असा होत नाही. सरदेसाई यांनी ह्या वक्तव्याबाबत बहुजन समाजाची तात्काळ माफी मागणेच श्रेयस्कर राहील!