गैर ते गैरच

0
19

सण उत्सव साजरे करण्याच्या जोशात कायदे कानून धाब्यावर बसवले की काय होते त्याचा प्रत्यय दरवर्षी दिवाळीत येत असतो. दिल्लीमध्ये फटाके लावण्यावर गेली चार वर्षे बंदी असूनही ती सर्रास धुडकावली गेल्याने आणि रात्रभर उशिरापर्यंत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके लावल्याने काल दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनले. हवेतील सूक्ष्म घातक कणांचे मोजमाप करणाऱ्या केंद्रांनी ठिकठिकाणी नोंदवलेली हवेची गुणवत्ता अत्यंत खालावलेली असल्याचे आढळून आले. ही गुणवत्ता 0 ते 50 पर्यंत असणे म्हणजे चांगली, 51 ते 100 म्हणजे समाधानकारक, 101 ते 201 म्हणजे मध्यम आणि त्यापुढे मग 201 पासून टप्प्याटप्प्याने अधिकाधिक खालावल्याचे मानले जात असते. दिल्लीतील सरासरी हवेची गुणवत्ता ही गेल्या दोन दिवसांत 325 च्या वर गेल्याचे आढळून आले आहे आणि मुख्यत्वे ह्याचे कारण दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात लावले गेलेले फटाके हेच आहे. दिल्लीच्या भौगोलिक स्थानामुळे दरवर्षी हिवाळ्यात प्रदूषणाची मोठी समस्या तेथे उद्भवत असते. पंजाब किंवा हरियाणातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमळ्यांमध्ये टाकाऊ तण जाळले, तरी त्याचा धूर हवेत मिसळून दिल्लीची हवा खराब होते. सर्वोच्च न्यायालयाला देखील त्या समस्येची दखल घ्यावी लागली आहे आणि वेळोवेळी पंजाब व हरियाणा सरकारला खडसवावेही लागले आहे. मात्र, तरीही ती समस्या सुटू शकलेली नाही. दरवर्षी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या शेतमळ्यात तण जाळतात त्यामुळे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ढासळते. त्यातच दिवाळी आली की दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके लावले गेल्याने विषारी धूर हवेत मिसळून हवेची गुणवत्ता ढासळते. परिणामी, मास्क बांधून हिंडण्याफिरण्याची पाळी दिल्लीवासीयांवर दरवर्षी येत असते. गेली चार वर्षे सरकारने दिवाळीत फटाके लावले जाऊ नयेत यासाठी कसोशीने पावले उचलली आहेत. फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापर ह्यावर बंदी घातली गेली आहे. यंदा तर दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाळ राय यांनी फटाके लावले जाऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल असे जाहीर केले होते व शेकडो पोलिसांना त्याकामी लावले गेले होते. परंतु तरीही दिवाळीच्या रात्री मोठ्या प्रमाणावर फटाके आणि आतषबाजी झालीच. त्याची परिणती म्हणून हवेची गुणवत्ता पार ढासळली आणि शेवटी त्याचा फटका दिल्लीवासीयांनाच भोगावा लागला. फटाक्यांच्या विक्री व साठवणुकीवर दिल्लीत बंदी असली, तरी शेजारच्या राज्यांतून फटाके आणून दिवाळीत लावण्याची अहमहमिका दिल्लीवासीयांमध्ये यंदाही दिसून आली. त्यामुळे सरकारी नियम आणि कायदेकानून धाब्यावर बसवले गेले. प्रदूषण ही दिल्लीची मोठी समस्या आहे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी दिल्लीत सम – विषम वाहतूक प्रणाली लागू करण्याची पाळी दिल्ली सरकारवर ओढवली होती. प्रदूषणाचा हा प्रश्न एवढ्या गंभीर प्रमाणात दिल्लीवासीयांना भेडसावत असला, तरी हीच स्थिती देशातील इतर शहरांमध्येही कमीअधिक प्रमाणात आहे. सण उत्सवाच्या काळात अनिष्ट प्रथांवर बंदी घातली तर तो आपल्या धर्मावरचा घाला आहे असा युक्तिवाद करून अट्टहासाने बंदी मोडण्यासाठी काही धर्मांध प्रवृत्ती पुढे सरसावत असतात. आपल्या ह्या हट्टापायी आपण समाजाचे नुकसान करतो आहोत हे त्यांच्या गावीही नसते. फटाक्यांवरील बंदीबाबतही हेच म्हणता येईल. फटाके लावणे हे आरोग्याच्या
दृ ष्टीने हितकारक नाही हे ठाऊक असूनही त्यावरील बंदी म्हणजे जणू आपल्या धर्मावरील घाला असल्याच्या थाटात त्याला विरोध होतो. परंतु फटाके फोडल्याने हवेत जी घातक रसायने पसरतात त्याचा फटका अंतिमतः नागरिकांनाच बसतो त्याचे काय? मानवी आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या गोष्टींना मनाई करताना त्यांच्या आड धार्मिक भावना आणल्या जाऊ नयेत. दिवाळीच्या काळात ठिकठिकाणी भेसळ पकडली जात असते. दिवाळीच्या सणासुदीच्या आनंदात विघ्न कालवणारे हे जे घटक असतात त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. गोव्यामध्ये नरकासुरांच्या संदर्भात जनजागृती होऊनही शेवटी रस्तोरस्ती अर्धवट जळलेले सांगाडे दिसून आलेच. शहरांमध्ये कर्णकर्कश आवाजातील डीजे, डोळ्यांना अत्यंत घातक अशा लेजर किरणांचा वापर, रात्री दहानंतर देखील संगीताचा ढणढणाट हे सगळे यंदाही कायम होते. प्रशासन ह्याबाबतीत कुठे झोपले होते? अशा गैरगोष्टींविरुद्ध कारवाई करताना प्रशासन हात आखडता घेते म्हणूनच अशा गैरगोष्टींना चालना मिळत असते. सण उत्सवाचा आनंद साजरा करताना गैरगोष्टींना फाटा दिला तर त्या आनंदात अधिक भर पडेल हे सत्य आपल्यालाही उमजणार केव्हा?