गैरकृत्ये रोखण्याची जबाबदारी पोलिसांचीच

0
13

>> पर्यटनमंत्र्यांचे संयुक्त बैठकीत खडेबोल; किनाऱ्यांवरील बेकायदा गोष्टींवरील कारवाईपासून पोलिसांना हात झटकता येणार नाहीत

किनारी भागातील गैरव्यवहार, गैरकृत्ये आणि दलालांवरील कारवाईची जबाबदारी पोलीस खाते झटकू शकत नाही. किनारी भागात पर्यटन विभागाची कारवाईची भूमिका किमान आहे. किनाऱ्यांवरील बेकायदा कृत्यांबाबत पर्यटन विभाग किंवा पोलिसांवर दोषारोपाचा खेळ चालणार नाही. गोव्याच्या पर्यटनाच्या प्रगतीसाठी आपण एकत्र बसून काम केले पाहिजे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपाका आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्यासोबत घेतलेल्या एका संयुक्त बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

राज्यातील समुद्रकिनारी भागातील दलाल, भिकाऱ्यांमुळे गोव्याचे नाव खराब होत आहे. काही दलाल खुलेआम पर्यटकांना बेकायदा गोष्टींकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे खंवटे यांनी सांगितले.

पर्यटन संचालक आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून समुद्रकिनाऱ्यांवरील बेकायदा गोष्टी, दलालांवर कारवाई करण्याबाबत सूचना जाणून घेतल्या. या बैठकीत पर्यटन आणि पोलीस विभागाने दलालांवरील कारवाईबाबत त्यांचे नियोजन आणि विचार मांडले. तसेच या संयुक्त बैठकीमध्ये बेकायदा दलाल समस्या आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला, असे खंवटे यांनी सांगितले.
पोलीस ज्या वेळी कारवाई करतात आणि एखाद्या दलालाला अटक करतात, तेव्हा त्याला शिक्षा होईपर्यंत अंतिम कार्यवाही पाहण्याची जबाबदारी पोलीस विभागाची असते, असे खंवटे यांनी सांगितले.

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर पोलिसांना सक्रियपणे दक्ष राहावे लागणार आहे. त्यांनी त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. पर्यटन विभागाने समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदेशीर कामांविरोधात आदेश जारी केला आहे. त्यानुसार पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा आहे. जेव्हा एखाद्याला दंड ठोठावला जातो आणि त्याचा भरणा त्याच्याकडून होत नाही, तेव्हा पोलीस कारवाई अपेक्षित असते, असे खंवटे म्हणाले.

संयुक्त कारवाई करणार : निधीन वाल्सन
उत्तर गोव्यातील किनारी भागातील बेकायदा दलाल व इतर गोष्टीवर संयुक्त कारवाई केली जाणार आहे. पोलिसांकडून बेकायदा दलाल, भिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यापुढे बेकायदा गोष्टींच्या विरोधातील कारवाईला गती दिली जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

लोबो म्हणतात, योग्य कायदा आणा
पर्यटनावर परिणाम करणाऱ्या दलाल आणि भिकाऱ्यांच्या समस्येपासून गोव्याला मुक्त करण्यासाठी योग्य कायद्याची गरज आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी म्हटले आहे.