गेल्या 5 वर्षांत रस्ता अपघातात 953 जणांचा मृत्यू : आलेमाव

0
10

राज्यात 5 वर्षांत रस्ता अपघातात 953 जणांचा मृत्यू झाला आहे. रस्ता अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. ‘ब्लॅक स्पॉट’ दुरुस्त करण्यात आणि अपघाती मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात भाजप सरकारवर अपयशी ठरले आहे. राज्य सरकार रस्ता अपघात प्रकरणामध्ये गंभीर नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल केली.

राज्यातील रस्ते बांधणी अभियांत्रिकीमध्ये सुधारणा करावी आणि रस्त्यांवर एकही जीव यापुढे जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांवरील अनेक ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. असे असूनही त्यावर काम करण्यासाठी उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गेल्या 69 महिन्यांत 16,346 अपघात झाले असून, त्यामध्ये 953 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 9 महिन्यांत 1824 अपघात झाले असून, 197 जणांचा मृत्यू झाला आहे, असे आलेमाव यांनी निदर्शनास आणून दिले. अपघातांना कारणीभूत ठरलेल्या रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास आणि अपघात रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास सरकारला आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही आलेमाव यांनी दिला आहे.