गेल्या दशकभरात 12 हजार भारतीय अमेरिकेतून हद्दपार

0
2

>> 2019 मध्ये सर्वाधिक 2042 तर 2020 मध्ये 1889 भारतीय नागरिक हद्दपार

गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये 2019 मध्ये सर्वाधिक 2042 आणि 2020 मध्ये 1889 जणांना हद्दपार करण्यात आले. 2009 ते 2014 या कालावधीत 3 हजार 210 जणांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले. 2009 ते 2025 या कालावधीत 15 हजार 756 जणांना हद्दपार करण्यात आले आहेत.

दरम्यान, अमेरिकेतून निर्वासित 104 भारतीयांना घेऊन आलेले अमेरिकन सैन्याचे सी-17 विमान 5 फेब्रुवारी रोजी पंजाबमधील अमृतसर विमानतळावर उतरले. या लोकांच्या पायाला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या, तर त्यांचे हातही साखळदंडाने बांधलेले होते. यूएस बॉर्डर पेट्रोल चीफ मायकेल बँक्स यांनी हा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीयांच्या हातापायात बेड्या स्पष्टपणे दिसत आहेत.

अमेरिकेत अवैध नागरिकांची धरपकड सुरू करण्यात आल्यानंतर यामध्ये भारतीयसुद्धा पकडण्यात आले. अमेरिकन लष्करी विमानाने भारतीयांची पहिली 104 जणांची तुकडी भारतात परतली. दरम्यान याबाबत भारताची सुद्धा मवाळ भूमिका चर्चेचा विषय ठरला असून अमेरिकेला शरण कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. आता अमेरिकेने 487 अवैध स्थलांतरितांना भारतात पाठवण्यासाठी यादी तयार केली आहे. त्यापैकी सुमारे 298 जणांची माहिती देण्यात आली आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, भारतीयांना पाठवताना कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घेतली जाईल. असा कोणताही मुद्दा आमच्या निदर्शनास आला तर आम्ही तो अमेरिकेसमोर मांडू. मिसरी यांनी, भारतीयांना भारतात पाठवताना त्यांच्याशी गैरवर्तणूक होत असल्याचा मुद्दा त्यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर मांडला आहे. असे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे सांगितले.