गॅस गळतीमुळे वास्कोत एकाचा मृत्यू

0
9

>> तिघेजण बेशुद्ध, गोमेकॉत उपार सुरू, सर्वजण उत्तरप्रदेशमधील

काल रविवारी पहाटे झालेल्या सिलिंडर गॅस गळतीच्या प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर तिघेजण बेशुद्ध झाले आहे. बेशुद्ध झालेल्या तिघांवर गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. साईनगर, फकीर गल्ली वास्को येथे ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार अनिल बिंद, (19 वर्षे), अमन यादव, (22 वर्षे), धरमवीर बिंद (21 वर्षे) आणि संजय बिंद (21 वर्षे) हे सर्व उत्तर प्रदेशमधील तरुण माणिकचंद रझाई केवट, वास्को, मंगूर हिल, वास्को यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत राहत होते. नुकतेच कामानिमित्त गोव्यात आलेल्या या सर्व पीडित तरुणांनी फकीर गल्ली परिसरात दोन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. त्यातील एका खोलीत हे चौघे व दुसऱ्या खोलीत त्यांचे मित्र रहात होते. काल रविवारी सकाळी वरील चौघांना त्यांच्या शेजारी दुसऱ्या खोलीत राहत असलेल्या त्यांच्या मित्रांनी उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या खोलीचा मुख्य दरवाजा आतून बंद असल्यामुळे चिंता निर्माण झाली.

त्यामुळे याची माहिती वास्को पोलिसांना देण्यात आली. वास्को पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी इतर नागरिकांच्या मदताने दरवाजा उघडला व खोलीत प्रवेश केला असता चारहीजण खोलीत बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले. त्यानंतर चौघांना 108 रुग्णवाहिकेद्वारे वैद्यकीय उपचारासाठी चिखली येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यापैकी संजय बिंद याला मृत घोषित करण्यात आले. इतर तिघांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी वास्को पोलीस पुढील तपास करीत आहेत.