गृह, वाहनकर्जे महागणार

0
13

>> आरबीआयकडून रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ केली. त्यामुळे रेपो रेट ५.४० टक्के इतका झाला आहे. रेपो दरातील या वाढीचा बोजा बँकाच्या ग्राहकांवर पडणार आहे. परिणामी गृहकर्जासोबतच वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज देखील महागणार आहे. याशिवाय कर्जाचा हप्ता देखील वाढणार आहे. ८ जून रोजी केलेल्या शेवटच्या पतधोरणेच्या घोषणेमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केली होती. त्यावेळी रेपो दर ४.९० टक्क्यांवर पोहोचला होता.

महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास हे चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या या वाढीमुळे ऑगस्ट २०१९ नंतरचा हा उच्चांक ठरला आहे. अशा प्रकारे रेपो दर आता कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर पोहोचला आहे.

रेपो दरातील या वाढीचा बोजा बँक ग्राहकांवर पडणार आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता वाढेल. गृहकर्जासोबतच वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा हप्ताही वाढणार आहे. जर तुमचे गृहकर्ज ३० लाख रुपये असेल आणि कालावधी २० वर्षांचा असेल, तर तुमचा हप्ता २४,१६८ रुपयांवरून २५,०९२ रुपयांपर्यंत वाढेल.