गृह आधार, लाडली लक्ष्मीच्या प्रलंबित अर्जांना लवकरच मंजुरी

0
10

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधानसभेत आश्वासन; 7 ऑगस्ट रोजी घेणार समितीची बैठक

गृह आधार आणि लाडली लक्ष्मी या योजनेसाठीचे जे शेकडो अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, ते लवकरात लवकर हातावेगळे करता यावेत यासाठी हे अर्ज 7 ऑगस्ट रोजी संबंधित समितीपुढे ठेवण्यात येतील, आणि त्या अर्जांच्या मंजुरीचा मार्ग मोकळा केला जाईल, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
या संबंधीचा मूळ प्रश्न आमदार संकल्प आमोणकर यांनी महिला आणि बाल कल्याण खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांना प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला होता. यावेळी बोलताना विश्वजीत राणे यांनी गृह आधार व लाडली लक्ष्मी या योजनांसाठीचे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेले अर्ज हातावेगळे करण्यासाठी पुढील आठवड्यात एक बैठक घेण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. संकल्प आमोणकर यांनी जरी हा प्रश्न मांडलेला असला, तरी सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील किती अर्जदारांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, त्याची माहिती आपणाला द्यावी, अशी सूचना आमदारांना केली.

यावेळी संकल्प आमोणकर यांनी आपल्या मतदारसंघातील एका महिलेने गृह आधार योजनेसाठी केलेला अर्ज मागील 12 वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले. अन्य एका महिलेला सदर योजनेखाली तीन महिने पैसे दिल्यानंतर योजनेसाठीच्या कागदपत्रात ती मृत झाल्याची नोंद करुन तिला पैसे देणे बंद करण्यात आल्याची बाब त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. अर्जदार महिलांना आपले अर्ज का मंजूर करण्यात आलेले नाहीत, त्याची चौकशी करण्यासाठी पुन्हा पुन्हा पणजीला यावे लागत असते, असेही त्यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले.

यावेळी आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी आपल्या मतदारसंघातील 638 युवतींचे लाडली लक्ष्मीसाठीचे अर्ज 2018 पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच विजय सरदेसाई यांनी आपल्या मतदारसंघातील लाडली लक्ष्मीसाठीचे 3932 अर्ज, तर गृह आधारचे 167 अर्ज मंजुरीसाठीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले. हे अर्ज कधी मंजूर केले जाणार याची माहिती मुख्यमंत्र्यांनी द्यावी. कारण निधी अभावी हे अर्ज मंजूर केले नसल्याची माहिती आपणाला मिळाली असल्याचे सरदेसाई यांनी निदर्शनास आणून दिले. यावर बोलताना हा प्रश्न सोडवण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 7 ऑगस्ट रोजी संंबंधित समितीची बैठक बोलावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.