गृहिणी व नोकरदार महिलांचा आहार-विहार

0
668
  •  डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

स्वतःला न आवडणारे व वेळी-अवेळी खाणे, शिळे अन्न सेवन करणे, अन्नाचे पचन नीट न होणे, तणावयुक्त व धावपळीचे जीवन जगणे… अशा प्रकारच्या अनेक कारणांनी घरातला कणखर ‘कणा’ चाळीशी येता येता मोडकळीस येऊ लागतो. कारण आहे फक्त ‘आहार’ व उपायही आहे फक्त योग्य आहार-सेवन!

९० टक्के महिलांना आपण जी धावपळ करतो किंवा घरकाम करतो तोच व्यायाम असे वाटते. म्हणून महिलांना वेगळा व्यायाम करायची गरज नाही असे बर्‍याच जणींचे मत आहे. त्यातील बर्‍याच जणींना साधारण ४० टक्के महिलांना कधीतरी व्यायाम करावासा वाटतो पण ‘वेळ नाही’ हा मोठा अडसर आहे.

‘आहार संभव रोगः’ असे आयुर्वेदात म्हटलेले आहे. आहारामुळे वेगवेगळे आजार निर्माण होतात. त्याचप्रमाणे माणसाला आरोग्य मिळवायचे असेल, कोणताही आजार होऊ नये असे वाटत असेल तर महत्त्वाचा असतो तो ‘आहार’च! प्राण धारण करणार्‍यांना आहार हा प्राणमय आहे व म्हणूनच सर्व मनुष्यांची धडपड आहार मिळविण्याकडेच असते.

आहारावरच वर्ण, प्रसन्नता, उत्तम स्वर, जीवन, प्रतिभा, संतोष, शरीराची पुष्टी, बल, मेधा अवलंबून असतात. म्हणून सतत ‘शीर्यमान’ होणार्‍या शरीराचे आहाराने पोषण करावे.

तसेच आहाराने शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळ मिळते. या रोगप्रतिकारक यंत्रणेवरच आरोग्य टिकून राहते. आजार निर्माण झाल्यास तो निसर्गतः बरा करण्याचे काम शरीर करत असते, पण शरीरास बळ हे योग्य आहारातून मिळते.

आपण कसे दिसतो यावरून आपण काय खातो, हे लक्षात येते. अन्नाच्या माध्यमातून घेतल्या जाणार्‍या प्रत्येक घटकाचा शरीरावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो.

बाह्य सौंदर्य आणि स्वास्थ्य हा अंतर्गत शरीरक्रियांचा परिणाम असतो. प्रत्येक अवयवाच्या शरीरक्रिया सुरळीत राहण्यासाठी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. अशी ही आहाराची प्रशस्ती असतानादेखील महिला जी संसाराचा, घराचा कणा आहे ती स्वतः आहार सेवनासाठी आग्रही असते का कधी? महिला मग ती नोकरदार असो वा गृहिणी, स्वतःचा आहार- व्यायाम- एकंदरित आरोग्याला किती महत्त्व देते?
नवर्‍याच्या हृदयाचा कप्पा किंवा प्रेमाचा झरा हा पोटातून उगवतो, खुला होतो.. असे म्हणत प्रत्येक स्त्री नवर्‍याच्या आवडी-निवडी सांभाळताना दिसते. मुलाबाळांचे संगोपन योग्य रीतीने व्हावे यासाठी त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन मुलांच्या पद्धतीने पण तरीही आरोग्यकारक अशा आहाराचा बेत आखते. वृद्धांचे पथ्यपालन, औषधोपचार या सगळ्यांचा विचार करत जेवण बनवतेच, पण त्यांचे स्वतःचे काय? कधीतरी घरच्या गृहिणीला तिला काय खायला आवडते…असा प्रश्‍न विचारा. तिला कधीच या प्रश्‍नाचे उत्तर देता येत नाही. कारण घरातल्या सगळ्यांची आवड-निवड सांभाळताना तिची स्वतःसाठी अशी वेगळी आवड शेवटी उरतच नाही. आणि यातूनच स्त्रियांना भयंकर अशा दुर्धर रोगांना सामोरे जावे लागते आहे. स्वतःला न आवडणारे खाणे, वेळी-अवेळी खाणे, शिळे अन्न सेवन करणे, अन्नाचे पचन नीट न होणे, तणावयुक्त जीवन जगणे, धावपळीचे जीवन जगणे… अशा प्रकारच्या अनेक कारणांनी घरातला कणखर कणा चाळीशी येता येता मोडकळीस येऊ लागतो. कारण आहे फक्त आहार व उपायही आहे फक्त योग्य आहार-सेवन!
महिलांना चाळीशीत ग्रासणारे आजार –
– कंबरदुखी, सांधेदुखी, अशक्तपणा ही चाळीशीत प्रत्येक स्त्रीमध्ये दिसणारी लक्षणे ही प्रत्येक स्त्रीपरत्वे कमी- जास्त प्रमाणात असतात.
– पाळीच्या तक्रारी, अंगावरून रक्त खूप प्रमाणात जाणे किंवा अगदी कमी प्रमाणात. पाळी लवकर येणे किंवा अनियमितपणे उशिरा येणे.
– केस गळणे, केस लवकर पिकणे, त्वचा निःस्तेज रुक्ष वाटणे.
– चिडचिड वाढणे, तणाव वाढणे.
– बर्‍याच स्त्रिया आपल्या घरातील- कामातील कार्यभाग संपवण्याच्या नादात इतरांशी संवाद विसरतात. त्याच्याही पलीकडे विचार केल्यास असे आढळते की स्त्रिया मनमुराद, खळखळून हसणेच विसरल्या आहेत.
– अपचन, ऍसिडिटी, गॅससारखी लक्षणे प्रचंड प्रमाणात दिसून येतात.
– अल्सर, बद्धकोष्ठासारखे विकार निर्माण होतात.
– निद्रानाश किंवा अतिनिद्रासारखी लक्षणेही दिसतात.
– सततच्या शिळ्या अन्न सेवनाने, फ्रीजमध्ये साठवून ठेवलेल्या अन्नसेवनाने आतड्यांचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो.
– तसेच वंध्यत्व, हायपरटेन्शन आणि डायबिटीज हे तीन आजार प्रचंड प्रमाणात पसरत आहेत. त्यात वंध्यत्वाचे प्रमाण खूप मोठे आहे.

या सर्व रोगांचे मूळ हे अनुचित आहार सेवन हेच आहे. त्यामुळे महिलांनो तुम्ही प्रथम स्वतःकडे लक्ष द्या.
महिलांनी स्वतःला कधीतरी विचारून तर बघा….
किती खाता? काय खाता? केव्हा खाता?… असे प्रश्‍न प्रत्येक महिलेने स्वतःला विचारा.
या प्रश्‍नांची बर्‍याच जणींची उत्तरे अशी मिळतील…
– दोन वेळाच जेवतो.
– उपाशी पोटी कामाला जातो. गृहिणी असेल तर.. नाश्ता करतच नाही. फक्त वेळी-अवेळी चहाच पिते.
– खायला वेळच मिळत नाही.
– दूध/ताक अजिबात आवडत नाही.
– फळे मुद्दाम कधीच खात नाही. फळांचा आणि महिलांचा संबंध बर्‍याच वेळा पहिल्या गर्भारपणा-इतपतच येतो.
– भूक लागली असता चहा-कॉफीने भूक मारतात.
गृहिणी असलेली महिला तिच्या जेवणाच्या वेळा कामांवरून ठरवतात. सगळी कामे आटोपली की मग जेवतात. भुकेचा आणि त्यांच्या जेवणाचा काहीही संबंध नसतो. नोकरदार / व्यावसायिक महिला दुपारच्या ठरलेल्या वेळात एकतर जेवण आटोपून घेतात किंवा कामाच्या रगाड्यात जेवायला वेळच मिळाला नाही म्हणून मग संध्याकाळी स्नॅक्स खातात.
– ९० टक्के महिलांना आपण जी धावपळ करतो किंवा घरकाम करतो तोच व्यायाम असे वाटते. म्हणून महिलांना वेगळा व्यायाम करायची गरज नाही असे बर्‍याच जणींचे मत आहे.
– त्यातील बर्‍याच जणींना साधारण ४० टक्के महिलांना कधीतरी व्यायाम करावासा वाटतो पण ‘वेळ नाही’ हा मोठा अडसर आहे.
चुकीच्या आहार- विहाराचा परिणाम वजनावर होत असतो. त्यामुळे महिला डाएटिंगकडे वळतात. डॉक्टरांचा सल्ला न घेता प्रथम डाएटिंग सुरू करतात. डाएटिंग म्हणजे उपाशी राहणे, कमी खाणे, रात्री न जेवणे, फक्त सॅलॅड खाणे, फक्त सूप पिणे, फक्त चपाती/पाव खाणे, भात न जेवणे अशा विविध तर्‍हेवाईक संकल्पना महिलांच्या आहेत. अशा या डाएटिंगमुळे वजन कमी होत नाही. उलट आहारातून मिळणारे पोषक मूल्य, महिलांना मिळेनासे होते. परिणामी नवीन समस्या निर्माण होतात.

म्हणूनच प्रत्येक महिलेने आयुर्वेद शास्त्रानुसार दिनचर्या- रात्रीचर्या, ऋतुचर्येच्या नियमांनुसार आहार- विहाराचे व्यवस्थापन करावे. गरज असल्यास त्यासाठी योगवैद्याचा सल्ला घ्यावा. पण स्वतःच्या आहार- विहाराला पर्यायाने आरोग्याला प्राधान्य द्यावे. तसेच बर्‍याच जणींना दुखणी अंगावर काढण्याची, स्वतःच औषधोपचार करण्याची सवय असते. या दोन्ही गोष्टी अरोग्याच्या दृष्टीने खूपच हानिकारक आहेत. वैद्याच्या सल्ल्याची आता मला गरज आहे हे महिलेने मान्य करावे.

गृहिणींचा आहार
– गृहिणींची शारीरिक व मानसिक दमछाक होत असते पण त्याचबरोबर सध्या आधुनिक उपकरणांचा उपयोगही बर्‍यापैकी होत आहे. अगदी कपडे धुण्यापासून ते केर काढण्यापर्यंत म्हणजेच शारीरिक हालचाली कमीत कमी. अशा परिस्थितीत वेळी-अवेळी जेवण व त्याचबरोबर चरबीयुक्त आहार अधिक मात्रेत सेवन होऊ लागल्यास, जी उर्जा शरीरात निर्माण होते, त्याचा योग्य वापर न होता, चरबीच्या रुपाने शरीरात संचित होत जाते व लठ्ठपणा येतो. त्याचप्रमाणे वेळी- अवेळी, पिष्टमय पदार्थ अधिक प्रमाणात प्रथिने खाल्ल्याने अम्लपित्ताची, बद्धकोष्ठतेची, पचनाच्या समस्या वाढतात. वजन वाढत असेल तरी शक्ती कमी- कमी होत जाते. त्यामुळे कितीही धडधाकट दिसला तरी वैद्याच्या सल्ल्याची व योग्य आहार- विहाराची तुम्हाला गरज आहे याचे ज्ञान असू द्यावे.

– गृहिणींनी रोज तीन ते चार वेळा खावे.
– जेवण गरम घ्यावे.
– जेवणाच्या वेळा शक्यतो पाळाव्यात.
– सकाळी न्याहारी करावीच. घरच्या इतर सदस्याप्रमाणे तुम्हालाही न्याहारीची गरज असते, याचे भान असावे. न्याहारी शक्यतो घरच्या इतर सदस्यांबरोबरच करावी.
– दुपारच्या जेवणाची वेळ इतरांच्या घरी येण्याच्या वेळेवर ठरवू नये. दुपारचे जेवण १ ते १.३०च्या दरम्यान, भूक लागल्यावर लगेच सेवन करावे.
– घरच्या इतर मंडळींसारखाच आहार घ्यावा.
– दूध, फळे, भाज्या, तूप, दही, ताक, मासे- मटण या सगळ्या प्रकारच्या आहाराची गृहिणींनाही गरज असते.
– दिवसभर चहा- कॉफी पिऊन आपली भूक मारु नये.
– संतुलित आहाराबरोबरच रक्तधातू, पोषक आहार व रसायनांचा उपयोग करावा. कारण बर्‍याच गृहिणी अशक्तपणा, पाण्डू रोगाने ग्रस्त असतात. त्यासाठी काळ्या मनुका, काळे खजुर, अंजीर, डाळिंब, द्राक्षे, शतावरी, सारिवा यासारख्या द्रव्यांचा आहार घ्यावा.
– मांसधातूला ताकद मिळण्यासाठी खारीक, दूध, लोणी, बदाम, खीर, लाडू, शतावरी, अश्‍वगंधा, आवळासारखी आहारीय द्रव्यांबरोबरच रसायन द्रव्यांचे सेवन करावे.
– बळकट संधिंसाठी डिंकाचे लाडू, नाचणीसत्त्व, गव्हाचा शिरा, दूध, तूप, पंचामृत, आक्रोड- खारीक याचेही सेवन करावे.
– व्यायामाने शरीरसंहनन उत्तम होते म्हणून आपण कितीही घरकाम केले तरी रोज साधारण अर्धा तास स्वतःसाठी काढावा. त्यात सूर्यनमस्कार घालणे, चालणे, प्राणायाम करणे यांसारखे व्यायाम जरूर करावे.
– रोज अभ्यंग करूनच स्नान करावे.
– गृहिणींनी पाणी पिण्याचे नियम कटाक्षाने पाळावे. तहान लागेल तेव्हा पाणी प्यावे. बर्‍याच गृहिणी फक्त जेवताना पाणी पितात असे आढळते. जेवताना अगदी कमी घोट- घोट जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी प्यावे. साधारण अर्धा ते १ ग्लास जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवणानंतर साधारण ४० ते ५० मिनिटांनी पाणी पिण्यास हरकत नाही. आपल्या शरीराच्या गरजेनुसार, ऋतुनुसार पाणी प्यावे.

नोकरदार/व्यावसायिक महिलांचा आहार –
काम करणारी महिला म्हटलं की सकाळी लवकर उठून आपले काम पटापटा उरकायचे हे आलेच. ही धावपळ करत असताना खायला वेळ मिळत नाही, म्हणून फक्त चहा प्यायचा व कामाचे ठिकाण गाठायचे हे सर्वसाधारण सगळ्यांचे चित्र आहे. तिथे भूक लागली की चहा-बिस्कीट, चहा-समोसा/भजी अशा प्रकारचा आहार घेतला जातो व काही कंपन्यांमध्ये काम करणार्‍या महिला तर सकाळी काही न खाता गेल्या तरी थेट दुपारी जेवणाचा ब्रेक, मध्ये काहीच खाता येत नाही. दुपारच्या सुटीत डबा ही घाईगडबडीत खायचा. बर्‍याच महिला दुपारच्या डब्याला चपाती-भाजी नेणे पसंत करतात. किंवा रात्रीची उरलेली भाजी/आमटी व सकाळी फक्त भात बनवून नेणे असाही डबा नेला जातो. सकाळी न्याहारी न करता जाणे व दुपारचा हा डबा महिलेच्या आरोग्यासाठी अगदी हानिकारक आहे.

– नोकरदार महिलेने सकाळी योग्य न्याहारी करूनच घराबाहेर पडावे. गडबड-घाई होत असल्यास पंधरा मिनिटे लवकर उठावे. नास्त्यामध्ये दूध/ताक, चपाती-भाजी, वरण-भात, एखादे फळ किंवा सुका मेवा खावाय
– दुपारच्या डब्यात एखादी हिरवी भाजी, चपाती, उसळ, भात- आमटी, कोशिंबीर असा पूर्ण आहार न्यावा व सेवन करावा. म्हणजे संध्याकाळी कामावरून जाताना भूक लागत नाही व काही अरबट- चरबट खाल्ले जात नाही.
– संध्याकाळी चहाऐवजी एखादे फळ खाणे किंवा एखादा जास्तीचा पराठा आणावा व तो खावा.
– चपातीचा जॅम लावून रोल किंवा घरच्या चटणी- लोणच्यासोबत रोल करून कामावर कॅरी करायला हरकत नाही. प्रवासात मध्ये खाता येतो.
– रात्रीचे जेवण आवडीनुसार बदलून घेता येते. सूप, हिरव्या भाजीचा पराठा, उसळीचा पराठा, खिचडी, सॅलड अशा स्वरूपात घेता येतो. किंवा वरण-भात, भाजी, सॅलड, फुलका असाही घेता येतो. रात्रीचे जेवण शक्यतो हलके व वेळेवर म्हणजे आठ ते किमान ९ च्या पूर्वी सेवन करावे. म्हणजे पचनाच्या अडचणी येत नाहीत.
– लिंबू-पाणी, आवळा सरबत किंवा च्यवनप्राश अशा एखाद्या तरी द्रव्याचा उपयोग रोज करावा.
– काम करणार्‍या महिलांनी शतावरी कल्प घालून रोज दूध प्यावे.
– काम करणार्‍या महिलांना ताण-तणावाचा जास्त त्रास होत असल्याने वेळ काढून किमान पंधरा मिनिटे प्राणायाम व ध्यान करावे.
– आठवड्यातून एक दिवस तरी सुट्टी घ्यावी. तो दिवस घरच्या साफ-सफाईच्या कामात न घालवता स्वतःसाठी योग्यरीत्या वापरण्याचा जरूर प्रयत्न करावा.
– वेळेअभावी फास्ट फूड, रेडी-टू-इट च्या मोहाला बळी पडू नये.
महिलेच्या आरोग्यावर घरातील इतर मंडळींचे आरोग्य अवलंबून असते. म्हणून या महिलादिनी तू ‘आरोग्यपूर्ण आहार- विहार’ आचरणाचा संकल्प जरूर कर!