गृहमंत्री अमित शहांच्या सभेची तारीख आज निश्चित होणार

0
27

>> 3 रोजी म्हापशात सभा घेण्याचे नियोजन

भाजपने दक्षिण गोव्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचारसभा यशस्वी केल्यानंतर आता, उत्तर गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचारसभा यशस्वी करण्यासाठी रणनीती तयार केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उत्तर गोव्यात म्हापसा येथे सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गृहमंत्री शहा यांची 3 मेला सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय मंत्री शहा यांच्या जाहीर सभेची तारीख सोमवार 29 एप्रिलपर्यंत निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांच्या प्रचारार्थ सांकवाळ येथे शनिवारी भव्य जाहीर सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेत मार्गदर्शन केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांच्या प्रचाराला आणखी गती दिली आहे.
उत्तर गोवा मतदारसंघात भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचाराला आणखी चालना देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित केली जात आहे अशी माहिती तानावडे यांनी यावेळी दिली. भाजपच्या राष्ट्रीय स्टार प्रचारकांच्या सभा दोन्ही मतदारसंघात आयोजित केल्याचे तानावडे यांनी सांगितले.