गृहआधार व दयानंदच्या थकित मानधनासाठी ४५ कोटी मंजूर

0
85

राज्यातील गृहआधार योजना आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थीचे एक महिन्याचे प्रलंबित मानधन वितरित करण्यासाठी ४५.२९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल एका संदेशाद्वारे दिली आहे.
सरकारी विविध सामाजिक योजनांचे मानधन रखडल्याची तक्रार आहे. कॉंग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाने सामाजिक योजनेच्या मानधन रखडल्याप्रश्‍नी समाज कल्याण खाते, लेखा खात्यावर बुधवारी मोर्चा नेला होता.

राज्य सरकार कोरोना महामारीच्या काळात आर्थिक समस्येला तोंड देत असले तरी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आणि गृहआधार योजनेच्या लाभार्थीसाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दयानंद सामाजिक योजनेच्या लाभार्थींना जून महिन्याचे मानधन आणि गृहआधार योजनेच्या लाभार्थींना एप्रिल महिन्याचे मानधन वितरित केले जाणार आहे. सरकार आर्थिक संकटात असतानासुद्धा सामाजिक योजना कार्यान्वित ठेवणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारकडून लाभार्थींना मानधनाचे वितरण उद्या केले जाणार आहे. तर, कॉंग्रेस पक्ष मानधन रखडल्याचा प्रश्‍नाचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली.