गुलाबी कसोटीत टीम इंडियाचा डावाने विजय

0
179

>> मालिकेत २-० असे निर्भेळ यश

>> वेगवान त्रिकुटाचा प्रभावी मारा

ईडन गार्डनवरील ऐतिहासिक गुलाबी कसोटीत काल रविवारी भारताने बांगलादेशचा एक डाव आणि ४६ धावांनी पराभव केला. तिसर्‍या दिवशी केवळ ८.४ षटकांत व ५० मिनिटांच्या खेळात भारताने बांगलादेशच्या दुसर्‍या डावातील उर्वरित तीन बळी घेतले. शनिवारी जखमी झालेला महमदुल्लाह फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला नाही. कालच्या विजयासह भारताने २ कसोटींची मालिका २-० अशी जिंकत बांगलादेशला व्हाईटवॉश दिला. उमेश यादवने दुसर्‍या डावात ५३ धावा देऊन ५ गडी बाद केले. सामन्यात ९ गडी बाद केलेला इशांत शर्मा सामनावीर तसेच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

बांगलादेश पहिला डाव ः सर्वबाद १०६
भारत पहिला डाव ः ९ बाद ३४७ घोषित
बांगलादेश दुसरा डाव ः ६ बाद १५२ वरून ः मुश्फिकुर रहीम झे. जडेजा गो. यादव ७४, इबादत हुसेन झे. कोहली गो. यादव ०, अल अमिन हुसेन झे. साहा गो. यादव २१, अबू जायेद नाबाद २, अवांतर २२, एकूण ४१.१ षटकांत सर्वबाद १९५
गोलंदाजी ः इशांत शर्मा १३-२-५६-४, उमेश यादव १४.१-१-५३-५, मोहम्मद शमी ८-०-४२-०, रविचंद्रन अश्‍विन ५-०-१९-०, रवींद्र जडेजा १-०-८-०

२०१२ पासून भारताचे मायदेशातील मालिका विजय ः वि. ऑस्ट्रेलिया २०१२-१३ (४-०), वि. वेस्ट इंडीज २०१३-१४ (२-०), वि. द. आफ्रिका २०१५-१६ (३-०), वि. न्यूझीलंड २०१६ (३-०), वि. इंग्लंड २०१६-१७ (४-०), वि. बांगलादेश २०१६-१७ (१-०), वि. ऑस्ट्रेलिया २०१६-१७ (२-१), वि. श्रीलंका २०१७-१८ (१-०), वि. अफगाणिस्तान, २०१८ (१-०), वि. वेस्ट इंडीज, २०१८-१९ (२-०), वि. द. आफ्रिका, २०१९-२० (३-०), वि. बांगलादेश, २०१९-२० (२-०)

खेळ आकड्यांचा
सलग चार कसोटी सामने डावाने जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला. दक्षिण आफ्रिकेचा शेवटच्या दोन कसोटींत डावाने पराभव केल्यानंतर भारताने बांगलादेशविरुद्धचे दोन्ही सामने डावाने जिंकले.

सलग सात कसोटी सामने भारताने जिंकले. वेस्ट इंडीज (२-०), द. आफ्रिका (३-०) व बांगलादेश (२-०). यापूर्वी धोनीच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०१३ या कालावधीत भारताने सहा सलग कसोटी जिंकल्या होत्या.

एकाच कसोटीत १७पेक्षा जास्त बळी भारतीय वेगवान गोलंदाजांनी घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. ईडन कसोटीत भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचे बाद झालेले सर्व १९ बळी घेतले. २०१७-१८ मोसमात ईडनवरच श्रीलंकेविरुद्ध भारतीय जलदगती मार्‍याने १७ बळी घेतले होते.

मायदेशातील एकाच कसोटीत वेगवान गोलंदाजांनी-गोलंदाजाने डावात पाच बळी घेण्याची ही तिसरी वेळ ठरली. पहिल्या डावात इशांतने २२ धावांत ५ बळी घेतल्यानंतर उमेशने दुसर्‍या डावात ५३ धावांत ५ गडी बाद केले. १९८१-८२ मध्ये कपिलदेव (७०-५) व मदललाल (२३-५) यांनी इंग्लंडविरुद्ध वानखेडेवर दुसर्‍या डावात प्रत्येकी पाच बळी घेतले होते. यानंतर जवागल श्रीनाथने कोलकाता येथे पाकिस्तानविरुद्ध (४६-५, ८६-८) अशी शानदार कामगिरी केली होती.

भारतात चाललेली सर्वांत कमी चेंडूंची कसोटी म्हणून बांगलादेश व भारत यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याची नोंद झाली. केवळ ९६८ चेंडूचा खेळ या लढतीत झाला. यापूर्वी २०१८ साली भारत- अफगाणिस्तान यांच्यातील लढतीच्या नावे हा विक्रम होता. त्या लढतीत १०२८ चेंडू टाकण्यात आले होते.