‘गुलमोहर’कार जयराम कामत निवर्तले

0
202

>> ज्येष्ठ गोमंतकीय ललित लेखक व कथाकार

दै. ‘नवप्रभा’चे स्तंभलेखक (‘गुलमोहर’कार) म्हणून एकेकाळी संपूर्ण गोवाभर सुपरिचित असलेले ज्येष्ठ ललित लेखक व कथाकार जयराम पांडुरंग कामत (८७) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पकालीन आजाराने अस्नोडा येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाला दान केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
प्रतिभावान असे ललित साहित्यिक असलेल्या जयराम पांडुरंग कामत यांनी १९८३ साली कै. लक्ष्मीदास बोरकर हे संपादक असताना दै. ‘नवप्रभा’मध्ये ‘गुलमोहर’ हे ललित सदर सुरू केले होते. ते अत्यंत लोकप्रिय ठरल्याने दोन तपांहून अधिक काळ ‘नवप्रभा’मधून चालू होते.

कामत हे एक कथाकार म्हणूनही प्रसिद्ध होते. ‘सुखिया’, ‘अंधारयात्री’ व ‘क्रांतिदूत’ असे त्यांचे तीन कथासंग्रह असून त्यापैकी ‘अंधारयात्री’ या कथासंग्रहाला गोवा कला अकादमीचा साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

‘महाराष्ट्र टाईम्स’ या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्राने १९७५ साली घेतलेल्या कथा स्पर्धेत गोवा व महाराष्ट्रातून आलेल्या शेकडो कथांमधून त्यांच्या ‘क्रांतिदूत’ या कथेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. अशा या प्रतिभावंत साहित्यिकाचा गोवा सरकारने कला आणि सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यांच्या मागे पत्नी कालिंदी, पुत्र अतुल, अरूण व उदय, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.