- मीना समुद्र
गुरू आकाशाच्या विशाल अंतःकरणाचा आणि धरणीच्या मायेचा असल्याने आपल्या शिष्यासाठी त्याचा हात आशीर्वादाचाच असतो आणि त्याचे पाय हे पथप्रदर्शकच असतात. असा सद्गुरू लाभणे ही जीवनातील अतिशय भाग्याची गोष्ट आहे.
आषाढ शुक्ल पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा नुकतीच साजरी झाली. चार वेद आणि अठरा पुराणे लिहिणार्या द्रष्ट्या व्यासऋषींची ही परमपावन जन्मतिथी. केवळ भारतालाच नव्हे तर सर्या जगाला धर्म, न्याय, नीती, मानसशास्त्र, अध्यात्म, सृष्टिविज्ञान आणि जितक्या म्हणून प्रकारचे ज्ञान आहे ते देणार्या आणि त्यामुळेच ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वं’ अशी महती प्राप्त करणार्या व्यास महर्षींचा हा जन्मदिवस, व्यासपौर्णिमा- म्हणजेच गुरुपौर्णिमा म्हणून साजरा झाल्यास नवल नाही. श्री संत ज्ञानेश्वरांनीही ‘व्यासांचा मागोवा घेतु| भाष्यकराते वाट पुसतु’ अशा प्रकारे गीतातत्त्वज्ञान ‘ज्ञानेश्वरी’रूपाने म. व्यासांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ॐकार स्वरूप समर्थ सद्गुरूला नमन करूनच संतांनी ग्रंथारंभ केलेला आहे. गुरू या शब्दाचा अर्थच अंधःकार नष्ट करून प्रकाशाकडे नेणे असा आहे. त्यामुळे आपली प्रार्थनाच ‘तेजस्वि नावधीतमस्तु’ अशी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत रामायण-महाभारत काळापासून गुरू-शिष्य परंपरा अस्तित्वात आहे. ज्ञान देणारा, शिकविणारा तो गुरू आणि ज्ञान घेणारा, शिकणारा तो शिष्य असे थोडक्यात म्हणता येते. गुरूविषयी कृतज्ञता हा अत्यंत उदात्त आणि मानवी जीवनावश्यक असा गुण आहे आणि ते आपले श्रेष्ठ कर्तव्यही आहे. त्यामुळे गुरूने जे ज्ञान दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतिशय आदरपूर्वक आणि विनम्रभावाने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
जीवनाच्या विविध क्षेत्रांत उच्च कोटीचे ज्ञान प्राप्त केलेले अतिशय अनुभवी गुरू शिष्याला अतिशय स्नेहाने, जबाबदारीने, प्रसंगी कठोरतेनेही ज्ञान देतात. त्यामुळे शिष्यांचे जीवन विकसित होते. त्यांच्या धारणांना चांगले वळण लागते. योग्य-अयोग्य कळते. सारासार विवेकबुद्धी प्राप्त होते. योग्य मार्गदर्शन मिळते. ज्ञानेश्वरांनी तर सांगितलेच आहे- ‘गुरू दाविलिया वाटा| घेऊनी विवेकतीर्थतटा| धुवूनिया मळकटा| बुद्धीचा जेणे|’ अशा प्रकारे गुरू बुद्धिभ्रम नष्ट करतो. दुष्टबुद्धीचा विनाश करतो. अधिक निर्दोष, अधिक सजग, अधिक निर्भय बनविणाराही गुरूच असतो. जीवन सुंदर, निष्काम, निरुपाधिक करण्याचे, समत्वभावाने सर्वांना पाहण्याचे कार्य गुरू करतो. तो भूतकाळ दाखवितो, वर्तमानकाळाची ओळख देतो आणि भविष्याची दिशा सांगतो. शिष्याचे हिताहित पाहतो, त्याची दुःखे-संकटे-चिंता-निराशा दूर करण्याचा मार्ग सांगतो. मात्र शिष्य वा साधकाच्या हातात तो ब्रह्म ठेवीत नाही. साधना-कष्ट हे ज्याचे त्यानेच करायचे. समर्थ रामदासांनी अध्यात्मज्ञानसाधनाविषयी म्हटले आहे- ‘साधकाला साधन न लावणारा गुरू अडक्याला तीन मिळाला तरी करू नये.’ गुरू दृढबुद्धी, निष्काम हवा. त्याप्रमाणेच सत्शिष्याची लक्षणे सांगताना त्यांनी म्हटले आहे, ‘मुख्य सत्-शिष्याचे लक्षण| सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण|’ गुरुवचनावर, सांगण्यावर, बोलण्यावर विश्वास हवा. तो परोपकारी, शुद्ध, सावध, सेवातत्पर, उद्योगी, निष्ठावंत, निर्मळ, सात्त्विक, विनम्र, भजक, साधक, विरक्त, आचारशील, सभ्दावी असावा.
शनिमहात्म्यात गुरूग्रहाचे केलेले वर्णन सद्गुरूला लागू पडते- ‘गुरूचे सामर्थ्य असे अद्भुत| गुरू तो श्रेष्ठ सर्वात इंद्रादि देवा समस्ता| गुरू ज्ञानाचा असे पुरा| तयाच्या सान्यासी नसे दुसरा त्यापुढे नुरेचि थारा| कल्पनेचा कदाही|’ म्हणून ‘गुरू सर्वभावे भजावा’ असे म्हटले आहे.
गुरूच्या अनंत, अथाह, अथांग ज्ञानशक्तीमुळेच त्याचे स्थान ईश्वरासमान आहे असे आपण प्रार्थनेतून म्हणतो. ‘गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः, गुरूः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः’ अशा श्लोकातून परब्रह्माशी त्याची मिळणी करतो.
‘‘गुरुचरणी ज्याचे मन, त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून| काळमृत्यू भयापासून| सर्वदा रक्षी देशिक जो’’ असे स्तुतिपर उद्गार श्रीधराने ‘शिवलीलामृता’त काढले आहेत ते वृथा नव्हेत. सद्गुरूमुळे येणारी भावश्रीमंती, सामाजिक भान, संयम, नियम, व्रतपालनाची सवय, कर्तव्यतत्परता, अभ्यासू वृत्ती हे जीवनाला केवढ्या उत्कर्षापर्यंत नेते, अत्यानंद देते.
‘गुरू परमात्मा परेशू’ असा दृढ विश्वास शिष्यांच्या मनी वसत असला तर जगाचा दुस्तरघाट चालताना ‘गुरुविण कोण दाखविल वाट’ असे पुनः पुन्हा म्हणण्याची वेळ न येता शिष्यही स्वयं-प्रकाशी, स्वयं-निर्भर बनतो. जीवनाची कला शिकविणार्या आणि ती साध्य करणार्या गुरू-शिष्यांच्या अनेक जोड्या जगप्रसिद्ध आहेत. याज्ञवल्क्य- जनक, जनक- शुक्राचार्य, शुक्राचार्य- कच; वसिष्ठ, विश्वामित्र – राम, सांदिपनी- कृष्ण; रामकृष्ण- विवेकानंद; द्रोणाचार्य- एकलव्य, अर्जुन, योगेश्वर कृष्ण- अर्जुन, निवृत्ती- ज्ञानदेव, जनार्दनस्वामी- एकनाथ, श्रीसमर्थ रामदास- कल्याणस्वामी, शुकासारखे पूर्ण वैराग्य, वशिष्ठांसारखे ज्ञान, कवी वाल्मिकींसारखी मान्यता, रामानंद-कबीर आदर्श गुरू-शिष्यांची अशी किती किती नावे सांगावीत?
सद्गुरुवाचोनी सापडेना सोय| धरावे ते पाय आधी त्याचे
आपणासारिखे करिती तात्काळ| काही काळवेळ नलगे त्यासी
लोह परिसासी न साहे उपमा सद्गुरूमहिमा अयाधचि
तुका म्हणे ऐसे आंधळे हे जन गेले विसरून खर्या देवा
असा आपला ‘खरा देव’ म्हणजे आपला गुरू. त्याचे आपण सदैव स्मरण करावे, मग आपले जीवन सोपे, सुसह्य आणि आनंददायी होईल. ज्ञान, भक्ती, शांती, प्रीती यांचा उदय होऊन जीवन सार्थक बनेल. माणूस जन्मला की तीन ऋणे घेऊन जगतो. सर्वात पहिले असते मातृ-पितृऋण. गुरूऋण आणि देवऋण. चालणे, बोलणे, खाणे, पिणे, बाहेर जमाजाशी वागणे हे मातापित्यामुळे त्यांच्या शिकवणुकीमुळे घडते. गुरू आपले अज्ञान, नैराश्य दूर करून आपल्याला ‘आपणासारिखा’ करून सोडतो.
सृष्टी ही ईश्वराने निर्माण केलेली. ती आपल्याला चराचर प्राणिमात्रांचे नियम समजावते. आपली सहायक, संरक्षक बनते. अनुभव देऊन स्वयंप्रज्ञ बनवते. या सार्यांचे ऋण आपल्यावर असते ते आपण यमनियम, आचारविचार, संयम पाळून जीवनाचे सौंदर्य वाढवून मिळवायचे आणि नाना शास्त्रे, नाना कला यांत पारंगत होऊन अध्यात्म साध्य करून लौकिक आणि पारलौकिक कल्याण साधायचे. म्हणून नाना प्रकारे नृत्य, नाटक, संगीत वगैरे कलांद्वारे गुरूला मानवंदना दिली जाते. ज्ञानग्रहण, ज्ञानपिपासा आणि जिज्ञासा सतत जागी ठेवून आपल्याबरोबर सर्वांचे हित साधणे, समाजाचे कल्याण करणे आणि सर्वांचा उत्कर्ष साधणे हीच खरी गुरुपूजा, गुरुदक्षिणा आणि गुरूला वाहिलेली आदरांजली. गुरू आकाशाच्या विशाल अंतःकरणाचा आणि धरणीच्या मायेचा असल्याने आपल्या शिष्यासाठी त्याचा हात आशीर्वादाचाच असतो आणि त्याचे पाय हे पथप्रदर्शकच असतात. असा सद्गुरू लाभणे ही जीवनातील अतिशय भाग्याची गोष्ट आहे. मिळेल तिथून ज्ञानकणांनी जीवनाचा मधुघट भरण्याचे काम अखंडितपणे चालू राहावे यासाठी योग्य गुरू जीवनात सर्वांना लाभावा आणि त्याच्या आशीर्वादाचा हात सदैव डोक्यावर, पाढीवर राहावा हीच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रार्थना!