‘गुरू’ ः एक निराकार शक्ती

0
683
  •  पौर्णिमा सुखटणकर
    (निवृत्त मुख्याध्यापिका)

‘गुरुमाऊली’आपल्या लाडक्या भक्ताला, शिष्याला भेटायला कायम आतुरलेली असते- जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना ‘गुरू-शिष्य’ या नात्याशी, त्यांच्यातील निरपेक्ष प्रेमाशी होऊ शकत नाही. एखाद्या गुरूचे भक्त अनेक
असतात पण ‘शिष्य’ एखादाच असतो.

वैज्ञानिक प्रगतीमुळे, तंत्रज्ञानाच्या क्रांतिमुळे हल्लीचे विद्यार्थी संगणक, मोबाइल, इ-बुक, इत्यादी यंत्रांमुळे स्वतःच किमान शिक्षण सहज घेऊ शकतात. विद्यालयातून ‘पर्यायी शिक्षक’ व्यवस्था होऊ शकते, पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो परंतु गुरुंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही.

आषाढ पौर्णिमेला ‘गुरूपौर्णिमा’ असे म्हणतात. या दिवशी ‘गुरूंचे पूजन’ करून त्यांच्याप्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करावयाची असते. आपल्या गुरूंनी दिलेले मार्गदर्शन, बोध, शिकवण जी आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी आपली साहाय्यक बनते त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस!… पण, ‘गुरू’ कोणाला म्हणायचे? विद्यालयात शिकवणारे ते ‘शिक्षक’- माणसाला जीवन जगण्यासाठी जो व्यवहार आवश्यक असतो त्याची कला शिकवतात ते ‘शिक्षक’ नि आपले जीवन घडवून जगायचे कसे याचे ज्ञान उत्स्फूर्त देतात ते ‘गुरू’! खरे म्हणजे शिक्षक ही एक व्यक्ती आहे नि गुरू म्हणजे एक ‘निराकार शक्ती’ आहे. ही शक्ती ज्या शिक्षकात रुजते व त्याद्वारे ते विद्यार्थ्यांची जीवनं घडवतात त्या शिक्षकाला ‘गुरू’ मानता येते! ‘गुरू’ ही माणसामाणसातली प्रज्ञा आहे, प्रेरणा आहे. ‘गु’प्त ‘रू’पाने कणाकणात वास्तव्य करते ती शक्ती म्हणजेच ‘गुरू’ होय. जगद्गुरू श्रीदत्तात्रेयांनी ‘चोवीस’ गुरू केले असे म्हटले जाते… खरे म्हणजे ‘गुरू’ हा ‘करावा’ लागत नाही तो ‘जाणावा’ लागतो. ‘गुरू’ आपल्या अवती-भवती सतत अस्तित्वात असतात- त्यांना आपणच शोधले पाहिजे. श्रीदत्तात्रेयांनी केलेल्या ‘गुरू’त सजीव-निर्जीव, लहान-थोर, पशु-पक्षी सारे सारे आले. म्हणजेच त्यांनी प्रत्येक वस्तूत, व्यक्तींत, पशु-पक्षात जे गुण व अवगुण पाहिले त्यातून गुण व दोष निवडून घेतले. गुण कसे वेचायचे व दोष कसे वगळायचे हे जाणून स्वतःचे जीवन घडवले व हाच बोध जगतातील भूतमात्रांना दिला- म्हणूनच ते ‘जगद्गुरु’ झाले!
जन्माला येणार्‍या प्रत्येक मानवाचे एक ‘जन्मकारण’ असते. जन्मकारण म्हणजे हेतु किंवा ध्येय आणि ते प्राप्त करण्यासाठी त्याला प्रथम शिक्षकाची व नंतर गुरूची नितांत गरज भासते. आपण अशा अनेक स्त्री-पुरुषांबद्दल वाचले, ऐकले, पाहिले आहे की ते शिक्षणाची एखादी उच्च पदवी घेतात परंतु त्यांचा नावलौकिक वेगळ्याच क्षेत्रात होतो. हे वेगळे क्षेत्र निवडण्यासाठी, त्यातून परमोच्च आनंद प्राप्त करण्यासाठी ज्या व्यक्तीकडून मार्गदर्शन, सहकार्य मिळते ती व्यक्तीच त्यांचा ‘गुरू’ असते. असे गुरू एखाद्या शिक्षकाच्या माध्यमातूनही त्याला भेटू शकतात व असे शिक्षक- गुरू त्या विद्यार्थ्याला आजन्म लक्षात राहतात. त्यांना आपण ‘ऐहिक गुरू’ असे संबोधले तरी चालेल. शेवटी शिक्षक हे विद्यार्थ्याला विविध विषयात पारंगत करतात व त्या विद्यादानाचा मोबदला ‘पगारा’च्या रूपात घेतात परंतु ‘पारमार्थिक गुरू’ ज्ञानदानाच्या मोबदल्यात फक्त ‘श्रद्धा- भक्ती’ हीच गुरुदक्षिणा घेतात.

शिक्षकांच्या बुद्धीत संपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम (सिलॅबस) असतो व त्यानुसारच ते विद्यार्थ्याला आवश्यक विद्या, शिक्षण देतात- काही हुशार मुलांसाठी त्या त्या विषयातील अभ्यासक्रमाचे बारकावे आवर्जून शिकवतात, त्यांच्या परीक्षा घेतात व विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण पडावेत म्हणून त्याच्याकडून विशेष सरावही करून घेतात. ‘पारमार्थिक गुरु’च्या गुरुकुलात मात्र प्रत्येक शिष्यासाठी वेगळा अभ्यासक्रम असतो. शिष्यांच्या विचार (वृत्ती), आचार (कृती) व उच्चार (उक्ती) यांची परीक्षा क्षणोक्षणी घेतली जाते. समर्थ रामदास स्वामींचे अनेक शिष्य होते परंतु कल्याण स्वामी हा जणू त्यांचा बहिश्‍चर प्राण होता- साहजिकच इतर शिष्यांना त्याच्याबद्दल असूया वाटत असे. एकदा नदीवर स्नान करून गडावर परतत असता सोसाट्याचा वारा सुटला नि त्यांच्या खांद्यावरचे उपरणे उडून दरित वार्‍याबरोबर हेलकावे खाऊ लागले. समर्थ म्हणाले, ‘‘अरे, माझे उपरणे उडाले… कोणी धरा रे!’’ कल्याणाने क्षणाचाही विलंब न लावता गडावरून उडी मारली, ते उपरणे पकडले व धावत पुन्हा गडावर समर्थांकडे आला. समर्थ म्हणाले, ‘‘अरे कल्याणा, गडावरून उडी मारताना तुला भय नाही वाटले?’’ कल्याण स्वामी म्हणाले, ‘‘तुम्ही पाठीशी असताना मला भय कसले?’’ इतर शिष्यांना स्वतःची पात्रता समजली. असे शिष्य व असे गुरू – त्यांची तुलना जगातील इतर कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. एखाद्यामध्ये तळमळ असेल, तर त्याला गुरुंची कृपा आपोआप मिळते. गुरुंना त्यासाठी काही करावे लागत नाही, केवळ शिष्यांची आपल्या सद्गुरुंवर संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरूच मग त्या शिष्याला कृपेसाठी पात्र बनवतात.
गुरुंच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा असणाराच आपली निर्भयपणे प्रगती करू शकतो. ज्या परमेश्‍वराने हे सृष्टी चराचर निर्मिले आहे त्या परमेश्‍वराचेच आपण एक अंग आहोत म्हणूनच आपले विचार, आचार व उच्चारण हे केवळ कल्याणाचेच असले पाहिजेत. हे ज्ञान अगदी निरपेक्षपणे गुरू आपल्या शिष्याला देत असतात. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर शिष्यच गुरूंना ‘गुरुदक्षिणा’ देतो. गुरू ती कधीच ‘मागत’ नाहीत. आपल्या गुरूंची प्रतिमा शिष्याच्या अंतःकरणात ओतप्रोत भरलेली असते – त्या प्रेमाने, शक्तीने, ज्ञानाने जग जिंकण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होते जसे विवेकानंदांना प्राप्त झाले.

आपल्या गुरूंची श्रीपरमहंसांची अनुमति मिळाली तरच ‘सर्वधर्मपरिषदेत’ जावे अशा विचारांत गुंग होऊन विवेकानंद दक्षिण भारताच्या टोकाला हिंद महासागरात एका शिळेवर ध्यानस्थ बसले असता पश्चिमेकडील अवकाशात त्यांना श्रीपरमहंसांचे दर्शन झाले. हीच आपल्या श्रीगुरूंची अनुज्ञा आहे या विचारांनी प्रेरित होऊन व मार्गात आलेल्या सर्व संकटांवर मात करत विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या धर्मपरिषदेत मंचावर पाऊल ठेवले नि जगातील सर्वांना आपल्या प्रेमळ उच्चारांनी जिंकून घेतले. आपल्या श्रीगुरूंनी दिलेले अनमोल ज्ञान सर्वत्र जगात प्रकाशित केले. तिथून पुन्हा भारतात परतल्यावर आपल्या गुरूंच्या नावाने लोक-कल्याणाचे कार्य सुरू केले जे अजूनही अहोरात्र ‘रामकृष्ण मिशन’ नावाने चालू आहे. या कार्यात सहभागी होणारे कार्यकर्तेही निष्काम निरपेक्ष सेवा करणारे आहेत.

प्राचीन भारतात ऋषीमुनींचे आश्रम असत ज्याला ‘गुरुकुल’ म्हणत असत कारण ते ऋषीमुनी तेथे वास्तव्यास राहणार्‍या विद्यार्थ्यांची मातापित्यांसारखीच देखभाल करीत असत. तिथे राहणारे विद्यार्थी सर्व प्रकारच्या विद्या तर शिकत असतच परंतु तेथे कुटुंबातील सर्व प्रकारची कर्तव्ये अतिशय प्रेमाने, आपलेपणाने पार पाडत असत. कुटुंब म्हणजेच ‘कुल’. प्रत्येक विद्यार्थी हा त्या ऋषींचा म्हणजे ‘गुरुं’चा पुत्र किंवा शिष्यच असे म्हणूनच अशा आश्रमांना ‘गुरुकुल’ म्हणत असत…. ‘यथा कालानुसारेण’… लोकसंख्या वाढत गेली, कुटुंब पद्धती बदलत गेली, सांस्कृतिक व सामाजिक बदल होत गेले, भारतावर अनेक आक्रमणं होत गेली नि विद्यापीठाचा प्रमुख म्हणून ‘कुलगुरु’ची नियुक्ती झाली! शब्दात अदलाबदल झालीच पण वृत्तीही बदलली- आज विद्यापीठात शिकवणारे शिक्षक ‘कूल’गरु झालेत! एक सत्य लक्षात घेतले पाहिजे- समाजात शिक्षकाला पर्याय असतो पण ‘गुरू’ला पर्याय नाही. वैज्ञानिक प्रगतीमुळे, तंत्रज्ञानाच्या क्रांतिमुळे हल्लीचे विद्यार्थी संगणक, मोबाइल, इ-बुक, इत्यादी यंत्रांमुळे स्वतःच किमान शिक्षण सहज घेऊ शकतात. विद्यालयातून ‘पर्यायी शिक्षक’ व्यवस्था होऊ शकते, पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो परंतु गुरुंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही. गुरू आपल्या शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला स्वयंप्रकाशित करतात. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांति नाही आणि शांतिविना आनंद नाही. खरा आनंद मिळवायचा असेल तर ‘गुरूदेव’ सेवा महत्त्वाची असते – ‘गुरूदेह’सेवा नव्हे! हल्लीची दुनिया ही ‘भुलभुलैय्या’ आहे आणि त्यातच ‘भोेंदू गुरु’ची चलती आहे. शांति नि आनंद यांना मिळविण्याच्या प्रयत्नात आपण खर्‍या गुरूंपासून दूर दूर जाऊ लागलो आहोत. भोंदू गुरूंबरोबर थिल्लर अंगविक्षेप करत नाचणे म्हणजे ‘आनंद’ मिळवणे असे मत अनेक प्रवाहपतित लोकांचे झाले आहे आणि असा आनंद मिळाला नाही तर अगदी आत्महत्येपर्यंतही जाण्याची त्या लोकांची तयारी असते. हा कसला आनंद? ही कसली शांति? आत्महत्येला प्रवृत्त करणारी भावना ही ‘आनंद’ असूच शकत नाही कारण ‘आनंद’ या शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्दच नाही.

आषाढातील ह्या गुरुपौर्णिमेला ‘व्यास पूजन’ केले जाते. महर्षी व्यासांना ‘आद्यगुरू’ मानले जाते. ज्या मंचावरून चौसष्ट कला व्यक्त केल्या जातात त्या मंचालाही ‘व्यासपीठ’ म्हटले जाते. व्यासांनी प्रचंड साहित्य निर्मिती केली. त्यांच्या साहित्यनिर्मितीचा आनंद अनेक पिढ्यांनी अनुभवला आहे. त्या साहित्यातून अनेक जणांना ‘गुरू’ लाभले म्हणजेच जीवनाबद्दलचे ज्ञान प्राप्त झाले. बुद्धी विकसित झाली, मन प्रगल्भ झाले अर्थात मनाचा ‘व्यास’ वाढला….. आजचा समाज मनबुद्धीने अगदी संकुचित होऊ लागलाय… ‘मी, मला, माझे’ (अहम्)कडून ‘त्वं, इदम्’ असे विश्‍वव्यापी विचार निर्माण होणे म्हणजेच खरे ‘व्यासपूजन’ होय! मनुष्यमात्राला निसर्गतःच बुद्धी असते. त्या बुद्धीतूनच तो निर्मिती व नवनिर्मिती करू शकतो, त्या बुद्धीचा वापर तो संरक्षणासाठी करतोच परंतु संहारासाठीही करू शकतो. कोणताही निर्णय तो घेऊ शकतो. अशाच वेळी त्याला एका योग्य, सूज्ञ ‘मार्गदर्शकाची’ म्हणजेच ‘गुरू’ किं वा ‘सद्गुरु’ची नितांत आवश्यकता असते. ‘योग्य गुरू’ लाभण्यासाठी गरज असते प्रार्थना, शरणागती, दृढ श्रद्धा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले ‘नशीब’, आपले पूर्व सुकृत! ‘पूर्व सुकृत’ म्हणजे केवळ गतजन्मातील सत्कर्मच नव्हे तर ‘श्रीगुरू’ आपल्या जीवनात प्रवेश करण्यापूर्वी केलेले प्रत्येक सत्कृत्य, सद्विचार व सदुच्चारच आपल्याला श्रीगुरूंची भेट घडवून आणतात. मनुष्य साक्षर असो वा निरक्षर, सज्जन असो अथवा दुर्जन त्याला ‘गुरुं’ची आवश्यकता असतेच कारण ‘गुरू’ ही गुप्त रुपाने त्याच्या अंतर्मनात वास करणारी चैतन्यमय शक्ती आहे जी केवळ सकारात्मक आहे, सत्य-शिव-सुंदर आहे!
आषाढी- कार्तिकीला लाखोंच्या संख्येने ‘पाऊले चालती पंढरीची वाट’- ही ‘विठू माऊलीला’ भेटण्याची आंतरिक ओढ म्हणजेच ती चैतन्यमय शक्ती आहे! आपले ‘गुरू/सद्गुरु’ ही ‘सर्वांग सुंदर, रूप मनोहर’ ल्यालेली ‘गुरूमाऊली’आपल्या लाडक्या भक्ताला, शिष्याला भेटायला कायम आतुरलेली असते- जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना ‘गुरू-शिष्य’ या नात्याशी, त्यांच्यातील निरपेक्ष प्रेमाशी होऊ शकत नाही. एखाद्या गुरूंचे भक्त अनेक असतात पण ‘शिष्य’ एखादाच असतो. आपल्या भक्तांना सर्वकाही इच्छित दिल्यानंतरही गुरूंपाशी काही ‘खास’ असे शिल्लक राहते – ते ज्या समर्पित भक्ताला दिले जाते तोच भक्त ‘शिष्य’ बनतो व कालांतराने आध्यात्मिक साधनेद्वारेच गुरूमय होतो, येणार्‍या पुढच्या पिढ्यांचे योग्य मार्गदर्शन करतो! अशा तर्‍हेने ही ‘गुरू-शिष्य’ परंपरा अनादी कालापासून चालू आहे व चालू राहील…
जगतात प्रत्येक धर्मात व जातीत अनेक संत होऊन गेले. त्या सर्वांनी ‘भक्ती- ज्ञान- कर्म- योग- ध्यान’ अशा अनेक मार्गातील कोणत्यातरी एका मार्गाचा अवलंब करून परमेश्‍वर-प्राप्तीचा मार्ग दाखवला परंतु सद्गुरुंनी आपल्या भक्तांना- शिष्यांना परमेश्वरप्राप्तीच करून दिली. संत व सद्गुरु हे परीस आहेत – फरक हाच की संत हा लोखंडाचा सुवर्ण करणारा ‘परीस’ आहे तर सद्गुरु हे ‘या हृदयीचे त्या हृदयी’ घालणारे परीस आहेत जे भक्ताला, शिष्यालाच ‘परीस’ बनवतात. म्हणूनच संत म्हणतात-
‘गुरू गोविंद दोऊ खडे| का के लागे पाय?
बलिहारी गुरू आपने| जिन गोविंद दिओ बताय’॥
या विश्वाची उत्पत्ती करणारे श्रीब्रह्मदेव, विश्वाचा प्रतिपाळ (सांभाळ) करणारे श्रीविष्णुदेव व संहार (नाश) करणारे श्रीमहेश्‍वर – हे तिन्ही देव उत्पत्ती, स्थिती व लय तत्त्वाचे प्रमुख आहेत. निसर्गचक्राप्रमाणे नाशातूनच नवनिर्मिती होते म्हणजेच तिन्ही तत्त्वे एकमेकांना पूरक व पोषक आहेत. या तिन्ही देवांनासुद्धा आपापले कार्य करण्यासाठी अशा शक्तीची आवश्यकता होती जी त्यांना त्यांचे नेमलेले कार्य करण्यास प्रेरणा देईल, ती शक्ती परमश्रेष्ठ असेल, परमपूज्य असेल, त्रिगुणात्मक असेल व तिन्ही तत्त्वांच्या पलीकडे असेल – अशी त्रिगुणातीत शक्ती म्हणजेच ‘साक्षात् परब्रह्म’!! म्हणूनच म्हटले आहे-
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥