राज्यात गेल्या चोवीस तासांत नवे १८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मागील तीन महिन्यांत प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १२७८ एवढी झाली असून कोरोना बळींची एकूण संख्या ८२२ एवढी झाली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. सरकारी पातळीवरून कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्याच्या उपाययोजनांबाबत केवळ घोषणाबाजी केली जात आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येने ५७ हजारांचा टप्पा पार केला.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५७,१७० एवढी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ६६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण ५५ हजार ०७० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३२ टक्के एवढे आहे.
चोवीस तासांत नवीन २१९० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ८.६३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ७० जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
पणजीत रुग्ण वाढले
पणजी, मडगाव, पर्वरी व फोंडा परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०० च्यावर झालेली आहे.
सालई-पर्वरीतील काही
भागात कंटेनमेंट झोन
उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी पर्वरी साल्वादोर द मुंद येथील सालई भागातील एका निवासी इमारत संकुलाचा काही भाग मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. पर्वरी परिसरातील कोरोना रुग्णांच्या प्रमाणात पुन्हा वाढ झाली आहे. पर्वरीतील कोरोना रुग्णांची संख्या ११४ एवढी झाली आहे. राज्यातील आठ दिवसाच्या काळातील हा दुसरा मायक्रो कंटनमेंट झोन आहे. मागील आठवड्यात ढवळी कवळे येथील एक इमारत मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहे.