गुरुपौर्णिमा ः संकल्पना, परंपरा आणि वास्तव

0
11
  • डॉ. पांडुरंग फळदेसाई

भारतीय संस्कृतीमध्ये ‘गुरुपौर्णिमा’ हा एक पारंपरिक उत्सव हजारो वर्षांपासून साजरा करण्यात येतो. अलीकडे या उत्सवाचे स्वरूप एखाद्या विधीसारखे झाले आहे. खरे म्हणजे ‘विश्वगुरू’ व्यासांच्या नावाने साजरी केली जाणारी ही ‘व्यासपौर्णिमा.’ व्यासांना विश्वगुरू म्हणण्याचे कारण म्हणजे, जगातील सर्व प्रकारचे ज्ञान अवगत असलेला हा महागुरू होता. ‘व्यासोऽच्छिटं जगत्‌‍ सर्वम्‌‍’ अशी व्यासांची ख्याती आणि महती आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आचार्यांची स्मृती जागवून त्यांना वंदन करण्याचा हा मंगलदिन आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये ‘गुरुपौर्णिमा’ हा एक पारंपरिक उत्सव हजारो वर्षांपासून साजरा करण्यात येतो. अलीकडे या उत्सवाचे स्वरूप एखाद्या विधीसारखे झाले आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’ म्हणतात. खरे म्हणजे ‘विश्वगुरू’ व्यासांच्या नावाने साजरी केली जाणारी ही ‘व्यासपौर्णिमा.’ व्यासांना विश्वगुरू म्हणण्याचे कारण म्हणजे, जगातील सर्व प्रकारचे ज्ञान अवगत असलेला हा महागुरू होता. ‘व्यासोऽच्छिटं जगत्‌‍ सर्वम्‌‍’ अशी व्यासांची ख्याती आणि महती आहे. म्हणूनच या आचार्यांची स्मृती जागवून त्यांना वंदन करण्याचा हा मंगलदिन आहे.

व्यास महर्षी हे शंकराचार्यांच्या रूपाने पुन्हा अवतीर्ण झाले या श्रद्धेने भाविक या दिवशी शंकराचार्यांची शोडषोपचार पूजा करतात. त्यानिमित्ताने विशेषतः भारतातील सर्व शिष्य या दिवशी आपापल्या गुरूची पूजा करतात. मोठ्या प्रमाणावर व्यासपूजेचा महोत्सव साजरा होणारी क्षेत्रे म्हणजे दक्षिण भारतातील शृंगेरी आणि कुंभकोणम. याच दिवशी गौतम बुद्धाने धम्मचक्रपरिवर्तन केले असे बौद्धधर्मीय मानतात. जैन लोक या दिवशी जीनपूजा करून उपवास करतात व पौर्णिमा साजरी करतात. अशा प्रकारे हिंदू, बौद्ध आणि जैन अशा तीनही धर्मांत गुरुपौर्णिमेचे आगळे-वेगळे स्थान आहे.

त्या काळचे गुरुकुल म्हणजे आधुनिक काळातील एखादी शिक्षणसंस्था. प्राचीन काळी गुरुकुलात जाणाऱ्या विद्यार्थ्याला सदैव गुरूच्या सान्निध्यात राहावे लागे. त्याला एक तप म्हणजे बारा वर्षांपर्यंत गुरुकुलात अध्ययन करून तेथील संस्कार आणि वेद, वेदांगे आणि शास्त्रे यांचे ज्ञान संपादन करावे लागे. गुरुकुलात गुरूची सदैव सेवा करणे व त्या सहवासातून सुसंस्कारांबरोबरच बाह्य जगाचे व व्यवहाराचे ज्ञान करून घेणे या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागत. काही वेळा गुरू आपल्या शिष्याची कसोटीही पाहत. गुरुगृहीच्या वेद-वेदांगे-शास्त्रे यांच्या ज्ञानाबरोबरच एखाद्या शिष्याला व्यवहारज्ञान कितपत झाले आहे त्याची परीक्षा ते घेत असत. ज्या गुरुकुलातून उच्च विद्याविभूषित झालेले शिष्य बाहेर पडत त्यांची कीर्ती मग दाही दिशांना होत असे. इतिहासातील नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला ही विद्यापीठे म्हणजे अशा प्रगत गुरुकुलांची रूपे होत. अशी गुरुकुले अखंडितपणे चालू राहण्याची व्यवस्था तत्कालीन राजे-रजवाडे आणि धनवान लोक करीत असत.
इतिहासकारांच्या मते व्यास जन्माचा काळ सनपूर्व 3100 असा मानला जातो. पूर्वी चारही वेद एकमेकांत मिसळलेले असल्याने वेद म्हणजे एक राशी, दीर्घ ज्ञानसंहिता मानली जायची. ती व्यासांनी पूर्णतः आत्मसात केली. परंतु ती एकत्रित असल्याने अध्ययनाला कठीण होत आहे हे व्यासांना जाणवले आणि त्यांनी वेदाचे वेगवेगळे चार विभाग करण्याचे ठरविले. त्यांनी सर्वप्रथम वेदराशीतल्या ऋचा वेगळ्या काढल्या व त्या संग्रहित करण्याचे काम त्यांचा शिष्य पैल याच्यावर सोपविले. तो संग्रह म्हणजे ऋग्वेद. गाण्यायोग्य ऋचा वेगळ्या काढून छंदोग किंवा सामवेद या नावाने जैमिनीकडे सोपविला. यज्ञप्रक्रियेची माहिती एकत्रित करून यजुर्वेद वैशंपायनाकडे सोपविला आणि यातुविद्या व लौकिक व्यवहारासाठीच्या मंत्रांच्या संग्रहाला अथर्ववेद हे नाव देऊन ती संहिता सुमन्तकडे सोपविली. या चार शिष्यांनी त्या संहिता व्यासांनी जशा पढविल्या तशा पूर्णतः आत्मसात केल्या आणि प्रसारित केल्या. तत्कालीन ऋषिमुनी व आचार्यांनी त्या सहजपणे स्वीकारल्या. अशा प्रकारे वेदांचे विभाजन करणारा म्हणून ते वेद-व्यास ठरले.

प्राचीन काळातील विस्मृतीत गेलेल्या विविध विद्या आणि कला यांचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्कार्य व्यासांनी केले. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करून त्यातील अक्षरत्व विविध वेद-वेदांगे आणि पुराणरचनांद्वारा संकलित-संपादित करण्याचा दीर्घोद्योग व्यासांनी जन्मभर केला. भारतीय लोकवाङ्मयातील मूल्ये जगासमोर आणून त्यांची महती अधोरेखित करण्याची महान कामगिरी व्यासांनी केली. मानवता, प्रेम, साहचर्य, राष्ट्रधर्म इत्यादी मौलिक अशा नीतिमूल्यांचा अखंड प्रसार त्यांनी केला. व्यासांच्या प्रदीर्घ साहित्यसंपदेचे अध्ययन करणारे अभ्यासक सांगतात की, भारतवर्षाच्या राष्ट्रीय जीवनात सद्भाव रुजविणे, नैतिक व आध्यात्मिक उत्कर्ष घडविणे या महनीय उद्देशाने व्यास प्रेरित झाले होते.

व्यासांची जन्मकथा आणि संपूर्ण चरित्र असामान्य आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. वसू राजाच्या वीर्याने सत्यवती नामक कन्येचा जन्म झाला. तिचे पालनपोषण यमुनेवर नावाडी म्हणून काम करणाऱ्या दाशराजा नावाच्या कोळ्याने केले. सत्यवती दाशराजाला नाव चालविण्यास मदत करीत असे. एकदा पराशरमुनी हिमालयात जाताना यमुनेकाठी आले. सत्यवती पराशराना नदीपार नेताना ते सत्यवतीच्या लावण्यावर मोहीत झाले. तिचा कन्याभाव दूषित न करण्याच्या अटीवर पराशरांशी समागम करण्यास ती तयार झाली. तिच्या अंगास येणारा माशांचा वास पराशरानी आपल्या तपःसामर्थ्याने बदलून टाकला व तिला मत्स्यगंधेऐवजी योजनगंधा आणि गंधवर्ती करून टाकले. समागमक्रिया दिवसा असल्याने ती लोकांना दिसू नये म्हणून पराशरानी तपाच्या बळावर नावेभोवती दाट धुके निर्माण केले. पैलतीरावर पोचल्यावर पराशरमुनीनी सत्यवतीला सांगितले की, ‘तुझ्या पोटी जन्म घेणारा पुत्र जगात सर्वत्र वंदनीय असा महापुरुष होईल.’ कालांतराने सत्यवतीने यमुनेच्या एका द्वीपात गुप्त जागी एका पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव ‘कृष्णद्वैपायन.’ पुढे तेच ‘व्यास’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

पुढे सत्यवतीचा शांतनूशी विवाह झाला. मात्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य ही त्याची दोन्ही मुले अकाली मृत्यू पावली. वंश चालू राहण्याच्या व राजशकट चालविण्याच्या विचाराने सत्यवतीने व्यासांना नियोगविधीच्या आधारे अंबिका व अंबालिका या विधवा सुनांच्या ठिकाणी संतती उत्पन्न करण्यास सांगितले. आढेवेढे घेत सत्यवतीची मागणी व्यासांनी पूर्ण केली. परंतु दुर्दैवाने अंबिकेला धृतराष्ट्र नावाचा जन्मांध पुत्र झाला आणि अंबालिकेला पंडुरोगी पांडू हा पुत्र झाला. अंबिकेने पाठविलेल्या दासीपासून विदूर हा पुत्र जन्मास आला. धृतराष्ट्राचे शंभर पुत्र कौरव आणि पांडूचे पाच पुत्र पांडव ही खरे तर व्यासांची नातवंडे.
कौरव-पांडवांच्या कलहात अनेक प्रसंगी व्यास त्यांना सल्ला देत असत. पांडव सच्छील आणि सद्वर्तनी असल्याने व्यासांचा कल नेहमी पांडवांच्या बाजूने राहिला. म्हणून अनेक प्रसंगी व्यासांनी अंतर्ज्ञानाने पांडवांना आगामी संकटांची कल्पना देऊन सावध केले. धृतराष्ट्रालाही त्यांनी दिव्य दृष्टी देऊ केली, परंतु ती त्यानी नाकारली. म्हणून संजयला दिव्य दृष्टी देऊन व्यास मोकळे झाले. पुढे कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या धुमश्चक्रीत व्यासांचे तीनही पुत्र मरण पावले. त्यानंतर शंकराच्या घोर तपश्चर्येतून व्यासांना शुक हा पुत्र लाभला. कुरुक्षेत्रावरील युद्धानंतर विषण्ण मनाने व्यासांनी महाभारत रचले. त्यांच्या महाभारताला ‘पंचमवेद’ ही उपाधी आचार्यांनी दिलेली आहे.

व्यासमुनी हे भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहेत. तेच भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मानले गेले आहेत. अशा या व्यासमुनींप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणजे गुरुपौर्णिमा तथा व्यासपौर्णिमा. ही परंपरा रामायण-महाभारत काळापासून निरंतरपणे आपणापर्यंत चालत आली आहे. चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणांची रचना करून व्यासमुनीनी मानवी जीवनाला संपन्नता बहाल केली.

आचार्य अथवा गुरूंची ही परंपरा आपल्याकडे संगीतक्षेत्रापुरती मर्यादित होत आली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विधिवत गुरुपूजन करण्याचा आणि विद्येचे नवे धडे घेण्याचा पवित्र विधी म्हणून या गुरुपौर्णिमेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. संगीतक्षेत्रामध्ये आपला गुरू निवडून ‘गंडाबंधन’ करण्याची परंपरा आजवर चालत आली आहे. गुरुगृही जाऊन गुरूंची सेवा करतानाच त्यांची मर्जी संपादन करून विद्या मिळविण्याची परंपरा आता मोडीतच निघाली आहे. सध्याच्या कंप्युटर युगात ‘गुरू’समोर बसून विद्याध्ययन करण्याची परंपरा बदलून कंप्युटरच आपला गुरू बनू पाहत आहे. कालामानानुसार आपण परिस्थितीशी मुळते-जुळते घेतल्याने गुरू-शिष्य परंपराच नामशेष होण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हणूनच गुरुपौर्णिमेसारख्या पारंपरिक विधी-उत्सवांचे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्व अधोरेखित होते.
गुरूंची सेवा कोणत्या स्तरापर्यंत करावी याला कोणतीच मर्यादा असलेली दिसत नाही. आरुणीने गुरूंच्या समाधानासाठी पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी स्वतः प्रवाहात आडवा पडून आपले शिष्यत्व सिद्ध केले. श्रीकृष्णाने गुरूच्या आश्रमात लाकूड-फाटा जमवला, या कथा आपणास अवगत आहेत. काही आध्यात्मिक गुरूंची उदाहरणेही आपल्याकडे आहेत. संत नामदेव प्रत्यक्ष विठ्ठलाशी बोलत असत. नामदेव हे विसोबा खेचरांचे शिष्य. ज्ञानेश्वरांनी आपले वडीलबंधू निवृत्तीनाथांनाच गुरू मानले होते. असे जे सद्गुरूंना शरण जातात, त्यांच्यामागे सद्गुरू सदासर्वकाळ राहून भक्ताला इच्छित फलप्राप्ती करून देतात. शिष्याला सत्कर्माचा मार्ग दाखवून त्याचे जीवन उजळीत असतात, सुगंधित करतात.

या संपन्नतेचे इंगित म्हणजे ईश्वरभक्ती. शक्य असेल त्या सर्व मार्गांनी ईश्वराचे भजन, पूजन, कीर्तन, संकीर्तन करून भक्ती करावी आणि जीवन जगण्याची प्रेरणा आणि आत्मविश्वास बाळगावा. गुरू हा या सर्व प्रवासात मार्ग दाखविणारी त्रिमूर्ती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिगुणात्मक परब्रह्म तत्त्व गुरूच्या ठायी एकवटलेले असते, ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण होय.
म्हणूनच वेगवेगळ्या संप्रदायात गुरूला सर्वश्रेष्ठ स्थान बहाल करण्यात आलेले दिसते. दत्त संप्रदायातील भक्त दत्तमहाराजांची या दिवशी साग्रसंगीत पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात आणि आशीर्वादाची याचना करतात. कारण दत्तमहाराजांनी ज्ञानसंपादनाची परिपूर्ती करण्यासाठी चोवीस गुरू केल्याचे सांगतात.
आपल्या भारतीय संस्कृतीत तीर्थक्षेत्र आणि मोक्ष या दोन संकल्पना प्रचलित आहेत. तीर्थक्षेत्री जाऊन मोक्षप्राप्ती करण्याची इच्छा प्रत्येकाची असते. परंतु गुरू-सद्गुरूच्या बाबतीत गुरू जिथे असेल तेच तीर्थक्षेत्र आणि गुरूची निरपेक्ष सेवा हाच मोक्ष मानण्यात येतो. सर्व तीर्थे गुरूच्या ठायी एकवटलेली असतात असा आपल्या संस्कृतीचा संदेश आहे.

समकालीन संदर्भात गुरूविषयीचा विचार साकल्याने करावा लागतो. आज गुरू-शिष्याची मनोधारणा व्यावहारिक निकषांवर आधारलेली दिसते. ग्रामीण भागातील अध्ययन क्षेत्राकडे पाठ फिरवून नामवंत आणि धनवंत संस्थांकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. शिष्यत्वाच्या संकल्पनेत स्पर्धा, अहमहमिका यांना स्थान नसते. परंतु अलीकडच्या काळात अध्ययन क्षेत्राला कमालीचे स्पर्धात्मक स्वरूप आले आहे. बहुमजली आणि विशाल स्वरूप अंगीकारलेल्या शिक्षण संस्थांमधून प्रवेश मिळविण्यासाठी जिवाचे रान करणारे विद्यार्थी आजूबाजूला वावरताना दिसतात. स्पर्धात्मक स्वरूपाच्या प्रवेश-परीक्षांच्या गदारोळात विद्यार्थ्याने स्वतः टिकून राहावे, यशस्वी व्हावे म्हणून देशाच्या ग्रामीण भागातला पालक लाखो रुपये खर्चून परीक्षापूर्व तयारीसाठी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी धडपडत आहे. कधी आपले घर गहाण ठेवून अथवा शेतीवाडी विकून- आणि प्रवेश परीक्षांच्या वाहत्या गंगेत आपले विखाळलेले हात धुऊन मधले महाठक परीक्षार्थींच्या भवितव्यावर पाणी फेरत आहेत. हा दैवदुर्विलास आजच्या विद्यार्थ्यांच्या नशिबी येत आहे!
अशा या परिस्थितीत भारतीय संस्कृतीतील गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधिक उठून दिसते. गुरू म्हणजे ज्ञानसंपन्नता, गुरू म्हणजे सर्व शंकांचे निरसन आणि समाधानाचे स्थान. त्यातूनच यशाचा मार्ग प्रशस्त करण्याचे सामर्थ्य गुरूच्या ठायी असते. म्हणूनच गुरू म्हणजे तीर्थक्षेत्र, गुरू म्हणजे मोक्षपद.
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही
श्रीगुरवे नमः