गुरदासपूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विजयी; भाजपला धक्का

0
148

पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे सुनील जाखड यांनी भाजपच्या स्वर्णसिंह सलारिया यांचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव करीत भाजपला जोरदार हादरा दिला आहे. या विजयामुळे सहा महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये सत्तेवर आलेल्या कॉंग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
अभिनेता विनोद खन्ना हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुरदासपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, एप्रिलमध्ये त्यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. या जागेसाठी ११ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. सुमारे ५६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कॉंग्रेसतर्फे सुनील जाखड, भाजपचे स्वर्णसिंह सलारिया व आम आदमी पक्षाचे मेजर जनरल (नि.) सुरेश खजूरिया रिंगणात होते. काल झालेल्या मतमोजणीत जाखड यांनी सुमारे दीड लाख मतांनी विजय मिळवत भाजप उमेदवाराला पराभूत केले.