‘गुन्हेगार’ उमेदवारांबाबत आयोग कठोर

0
25

>> निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची माहिती

>> पक्षासह उमेदवारांना स्पष्टीकरणाची सक्ती

एखाद्या राजकीय पक्षाने गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तीस उमेदवारी दिली तर यापुढे त्या पक्षाला आपण स्वच्छ प्रतिमा असलेल्या व्यक्तीपेक्षा अशा व्यक्तीला उमेदवारी का दिली याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. हे स्पष्टीकरण पक्षाच्या वेबसाईटवरून किंवा प्रसारमाध्यमांद्वारे द्यावे लागेल अशी माहिती काल भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिली.

उमेदवाराच्या विरोधात पोलीस स्थानकावर गुन्हा नोंद असल्यास त्याने तीन वेळा जाहिरातीच्या माध्यमातून माहिती जाहीर केली पाहिजे. उमेदवारांनाही एकदा आपली उमेदवारी निश्‍चित झाली की, आपल्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती मतदारांना द्यावी लागणार आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

गोवा विधानसभेची आगामी निवडणूक निःपक्षपाती, भयमुक्त वातावरणात घेण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. मागील निवडणुकीत कमी मतदान झालेली मतदान केंद्रे शोधून काढण्याची सूचना केली असून आगामी निवडणुकीत १०० मतदान केंद्रांची व्यवस्था महिला कर्मचारी हाताळणार आहेत. तसेच, ४ ते ५ मतदान केंद्राची व्यवस्था दिव्यांग कर्मचारी हाताळणार आहेत, अशी माहिती यावेळी सुशील चंद्रा यांनी दिली.
एका मतदान केंद्रावर १ हजार मतदारांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे गोव्यात ६० नवीन मतदान केंद्रे तयार करावी लागणार आहेत. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही चंद्रा यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्त चंद्रा यांच्या हस्ते स्वीप मोबाईल व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे यांची उपस्थिती होती.

५ जानेवारीपर्यंत मतदार यादी
गोव्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी चांगली आहे. येत्या ५ जानेवारीपर्यंत मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैशांचे वाटप केले जाते. त्यावर कारवाईसाठी आयकर विभाग, पोलीस व इतर सरकारी यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. सीमेवर गस्त वाढविली जाणार आहे, असेही मुख्य निवडणूक आयुक्त चंद्रा यांनी सांगितले.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय पथकाने विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा दोन दिवस घेतला. गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च २०२२ रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

८० वर्षांवरील मतदारांना
घरबसल्या मतदान सुविधा

८० वर्षावरील मतदारांनी फॉर्म १२ डी भरून मतदान केंद्र अधिकार्‍याकडे (बीएलओ) सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. राज्यात ३० हजारांवर ८० पेक्षा जास्त वय असलेले मतदार आहेत. वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर येण्याची सक्ती नाही. या मतदानाबाबत राजकीय पक्षांना माहिती दिली जाणार आहे, असेही चंद्रा यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक अधिकारी
कुणाल यांची दिल्लीत बदली
केंद्रीय गृह मंत्रालयाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदलीचा आदेश काल जारी केला. गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आयएएस) यांची नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. मेकला प्रसाद आणि अंकिता आनंद यांची दादरा नगर हवेली येथे तर रमेश वर्मा यांची गोव्यात नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव अशोक कुमार (आयएएस) यांची बदली रद्द करण्यात आली आहे.