गुन्हेगार अनिल भुयेला पोलीस कोठडी

0
139

कोलवाळ येथील केंद्रीय मध्यवर्ती कारागृहात जेलगार्ड व दोन कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती केली होती. त्यांना दुधातून भांग दिलेल्या कारागृहातील सजा भोगणार्‍या अनिल भुये या अट्टल गुन्हेगाराला अटक करण्यात आली होती. काल न्यायालयाच्या आदेशावरून म्हापसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची कोठडी देण्यात आली.

गेल्या मंगळवारी दि. १३ रोजी हा प्रकार घडला होता. कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात भांग पिऊन सुरेश ऊर्फ बाबू आरोलकर व विनय गडेकर हे दोन कैदी तसेच जेलगार्ड किरण नाईक यांनी धांगडधिंगा घातला होता. त्यानंतर त्यांना येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. उपचारानंतर विनय गडेकर या कैद्याला व जेलगार्ड किरण नाईक याला डिस्चार्ज देण्यात आला होता. तर सुरेश आरोलकर याला बांबोळी येथे गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी दाखल केलेल्या दोन्ही गुन्हेगारांवर मयडे येथे एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

त्यानुसार त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावून त्यांची रवानगी कोलवाळ येथील कारागृहात केली होती. वरील प्रकरणी संशयित अनिल भुये याने दुधातून भांग पिण्यास दिल्याचे तपासात समोर आल्याने म्हापसा पोलिसांनी त्याला अटक केली होती. काल म्हापसा न्यायालयाच्या सांगण्यावरून म्हापसा पोलिसांकडे त्याला देण्यात आले. म्हापसा पोलिसांनी त्याला रिमांडसाठी न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास साहाय्यक उपनिरीक्षक के. टी. गावस, निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

न्यायालयातून कैद्याचा पलायनाचा प्रयत्न फसला
कोलवाळ कारागृहात गेल्या काही महिन्यांपासून सजा भोगत असलेला मंत्तेश मेथी याला काल म्हापसा न्यायालयात आणले असता न्यायालयातून पुन्हा कारागृहात नेत असताना न्यायालयाच्या खाली त्याने हवालदार व पोलीस कॉन्स्टेबल या दोघांना धक्का देऊन पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. काल म्हापसा न्यायालयात रिमांडसाठी पोलीस बसने आले होते. हवालदार रवींद्र पाटील व पोलीस कॉन्स्टेबल कालिदास राऊत हे दोघे त्याला ‘सी’ कोर्टमध्ये घेऊन गेले. तेथून पुन्हा कोलवाळ कारागृहात नेत असताना कोर्टाच्या खाली हवालदार पाटील व कॉन्स्टेबल राऊत यांना धक्का देत त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चपळाई दाखवत धावत जाऊन न्यायालयाच्या कंपाऊंडजवळच त्याला पकडले.