गुन्हेगारी रोखण्यास मुख्यमंत्री अपयशी

0
6

गिरीश चोडणकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप

राज्यात खून, बलात्कार, अपहरण, विनयभंग, चोऱ्या आदी गुन्ह्यांत कधी नव्हे एवढी वाढ झालेली आहे. ही गुन्हेगारी रोखण्यास गृहखाते असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत अपयशी ठरले असून यांना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास त्यांना पूर्ण अपयश आले असल्याचा आरोप काल काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. पत्रकार परिषदेला पर्वरी काँग्रेस गट अध्यक्ष मारियो आताइद व विकास प्रभुदेसाई हेही यावेळी उपस्थित होते.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्याचे काम हे पोलिसांचे आहे. मात्र, कायद्याचे रक्षक असलेले हे पोलीसकर्मीच कायद्याचे भक्षक बनले असल्याचा आरोपही चोडणकर यांनी यावेळी बोलताना केला.
एका राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून पर्वरी पोलिसांनी ॲड्. आल्बुकर्क यांच्याविरुद्ध एक खोटी तक्रार नोंद केल्याचे प्रकरण उघडकीस आले असल्याचे चोडणकर म्हणाले. पर्वरी मतदारसंघात राहणारे न्यायाधीश व वकीलही आता सुरक्षित नसल्याचा आरोपही यावेळी बोलताना चोडणकर यांनी केला. गृहमंत्री सावंत यांनी आता गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी सक्रिय व्हावे, अशी मागणीही चोडणकर यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी बोलताना मंत्र्यांच्या वैयक्तिक गोष्टीत लक्ष घालण्याचा कुणाला अधिकार नसल्याचे जे म्हटले आहे ते बरोबर नसल्याचे चोडणकर म्हणाले.

एखाद्या मंत्र्याने केलेल्या अनैतिक गोष्टींकडे ती त्याची वैयक्तिक गोष्ट असे म्हणून दुर्लक्ष करता येणार नसल्याचे चोडणकर म्हणाले. ज्या अर्थी मुख्यमंत्री हे ती गोष्ट ही सदर मंत्र्याची वैयक्तिक गोष्ट आहे असे म्हणतात तेव्हा हे प्रकरण झाले आहे हे त्यांनी मान्य केले आहे. एखाद्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला तर तेव्हाही मुख्यमंत्री ती त्या मंत्र्याची वैयक्तिक बाब आहे, असे म्हणतील काय, असा प्रश्नही चोडणकर यांनी यावेळी केला.

सेक्स स्कँडलप्रकरणी ‘त्या’ मंत्र्याला मुख्यमंत्र्याचे अभय

राज्य मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्याचे सेक्स स्कँडल प्रकरण आपण उघड करूनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची कोणतीही चौकशी करण्याचा आदेश दिला नसल्यामुळे या मंत्र्याला मुख्यमंत्री अभय देत असल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला. विरोधक ह्या नात्याने अशा प्रकरणावर आवाज उठवणे हा आपला अधिकारच आहे असे सांगतानाच आपण या प्रकरणातील महिलेचे नाव उघड केले नव्हते याचा पुनरुच्चार चोडणकर यांनी पत्रकारांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केला.