गुढी उभारूया सकारात्मकतेची!

0
612
  • डॉ. लता सत्यवान नाईक

गुढी उभारणीचा हा सण सर्वांना आनंदाचा, सुखसमृद्धीचा जावो. सर्वांसाठी ‘मंगलमय’ विचार मनात आणूया. कारण सध्याच्या आधुनिक शास्त्रानुसार हे सिद्ध झालंय की जेव्हा आपण नकारात्मक विचार मनात आणतो तेव्हा त्याचा सर्वांत प्रथम परिणाम होतो तो स्वतःवरच. त्यामुळे सतत सकारात्मक विचार असावेत व वागणेही त्याच दिशेने असावे.

सोनेरी पहाट
उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण
अन् सुखाची बरसात
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…

असे अनेक मनभावन संदेश स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर झळकतील आणि ‘गुढी पाडवा’ आजच का.. असे म्हणत प्रसन्न चेहर्‍याने काही मंडळी नवीन वर्षाच्या संकल्पांची मनातल्या मनात यादीही तयार करतील!
आम्ही भारतीय मुळातच उत्सवप्रिय असतो आणि सणवार आले की उत्साहाला व उत्सवालाही उधाण येते. हिंदू धर्मीयांचं नवीन वर्ष म्हणजे गुढी पाडवा. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकमधील हिंदू बांधव हा सण नवनिर्मितीचा, नवचैतन्याचा, नव्या वर्षाची सुरुवात करणारा म्हणून धार्मिक रूढी परंपरेनुसार साजरा करतात.
गुढी पाडव्याच्या अनेक पुराणकथा, दंतकथा आहेत. प्रत्येक गोष्टीत नावीन्य असणं ही भारतीय सणांची परंपरा आहे आणि म्हणून नववर्ष हे फक्त म्हणण्यापुरतंच नवीन नसतं तर नवीन नावं घेऊनच ते जन्माला आलेलं असतं. आणि म्हणूनच आपल्याकडे प्रत्येक वर्षाला नाव दिलं जातं. उदा. प्रभव, विभव, शुक्ल, प्रमोद अशी एक नव्हे, दोन नव्हे तर साठ नावे आहेत आणि ही पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येतात. जर पहिले संवत्सर ‘प्रभव’ आहे तर साठावे ‘क्षम’ आहे. हे नाव पूर्ण झाले की पुन्हा ‘प्रभव’ हे नाव पडते. अशा प्रकारे संवत्सरनामचक्र पुन्हा पुन्हा फिरत असते. यंदाच्या ६ एप्रिल २०१९ पासून मराठी संवत्सराचे विक्रम संवत्सर २०७६ सुरू होत आहे. यावरून गुढी पाडव्याला संवत्सर पाडवा हेही नाव पडले. याचाच अपभ्रंश, आपण खेडगावात, कोकणीत याला ‘संवत्सर पाडवो’ म्हणतो.
अशी दंतकथा आहे की नारद मुनींना दर चैत्र प्रतिपदेला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. असे त्यांना साठ पुत्र झाले. प्रत्येक बालकाचा जन्मदिवस देवदेवतांनी गुढ्या उभारून, आनंदाने साजरा केला. हाच जल्लोश, आनंदोत्सव म्हणजे गुढी पाडवा. अजून एक श्रद्धा आहे आणि ती म्हणजे या दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली. तिचा जन्मदिवस म्हणूनही गुढी पाडवा, सृजनोत्सव म्हणून साजरा होतो.

रामायणानुसार प्रभू श्रीरामचंद्र, सीता व लक्ष्मणासह वनवासातून अयोध्येला परतले. तेव्हा अयोध्यावासीयांनी हर्षोल्हास साजरा केला. राज्यात गुढ्या-तोरणे उभारली गेली. तोच दिवस गुढीपाडव्याचा. तर महाभारतानुसार चेदी राजा वसू जंगलात गेला व तो तपश्‍चर्येस बसला. देव प्रसन्न झाले व त्यांनी वसूला एक वैजयंतीमाला यशस्वीता प्राप्त व्हावी म्हणून दिली. भ्रमंतीसाठी सुंदर विमानही दिले. राज्यकारभार सांभाळण्यासाठी राजदंडही दिला. अगदी आनंदाने मग वसूने या राजदंडाच्या एका टोकाला रेशमी वस्त्र गुंडाळले व एक सोन्याचा चंबू ‘त्या’ टोकावर बसवला आणि गुढी म्हणून हा राजदंड पुजून त्याची यथासांग पूजा केली. मूळ गुढीचे हेच खरे स्वरूप. वसूच्या राजदंड पूजेमागे एक संदेश दडलाय, ज्याला आपण सकारात्मक संदेश म्हणू शकतो. नव वर्षाच्या दिवशी जे कार्य आपण करतो, तेच कार्य आपण वर्षभर करत राहू, नवीन वर्षाला जर शुभंकर कामे केली तर संपूर्ण वर्षभर चांगली कामे करण्यातच जाईल. चांगले काम म्हणजेच चांगले परिणाम आणि चांगले परिणाम मिळाले की मनस्वास्थ्य लाभतेच. मनस्वास्थ्य म्हणजेच चांगले आरोग्य. हा सण चांगल्या आरोग्याच्या शुभदायी आशीर्वाद घेऊन येणारा सण होय.

हिंदू धर्मानुसार आपले नवीन वर्ष सुर्योदयापासून सुरू होते. सूर्याच्या आशीर्वादाने, प्रकाशाने आपले वर्ष तेजोमय होते आणि म्हणूनच आपल्या वर्ष प्रारंभाला, दिवसाच्या प्रारंभाला एक नैसर्गिक अधिष्ठान लाभले आहे. आपले नव वर्ष इंग्रजी वर्षाप्रमाणे मध्यरात्री बारा वाजल्यापासून अंधारात सुरू होत नाही. अंधार म्हणजे नैराश्य. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची इंग्रजी वर्षाप्रमाणे रात्री अंधारातच सुरुवात होते. पण गुढी पाडव्याला मात्र आपण पहाटे उठतो, अभ्यंग स्नान करून गुढीची उभारणी, पूजा करून मगच आपण एकमेकांना शुभेच्छा देतो.
गुढीपाडव्यापासूनच वसंत ऋतुलाही सुरुवात होते. वसंत ऋतू म्हणजे नवचैतन्य! निसर्ग नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपल्या सुंदर फुलांनी बहरलेल्या चित्रातून देतो असाच आभास होतो. मोगरा, कस्तुरीमोगरा, चाफा, सुरंगा, कमळ, बकुळ अशा सुगंधी फुलांचा बहर घेऊन वसंत ऋतू येतो, ‘हासत नाचत वसंत आला..’ असे आनंददायी त्याचे आगमन असते. नुसतेच आगमन नसते तर सुगंधाची उधळण असते. तर काही झाडांना वृक्षवेलींना नवीन पालवीही फुटते. नवजीवनाचा उन्मेश घडवत ही झाडेझुडुपे बहरू लागतात. आणि वसंताचा हा आगळावेगळा मनोहारी डौल सगळ्यांनाच भावतो.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि म्हणून या दिवशी गृहप्रवेश किंवा चांगले कार्य करतात. याच दिवसापासून वासंतिक चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. यावेळी घटस्थापनाही होते. महाराष्ट्रात तसेच गोव्यातही काही विशिष्ट समाजातील कुटुंबांमधून चैत्रगौरी बसवतात, हळदीकुंकू करतात.

गुढी कळकाची म्हणजे बांबूची असावी लागते. ती स्वच्छ धुतली जाते, गंध लावून सजवली जाते, रेशमी कपडा एका टोकाला बांधून, त्यावर तांब्याचा चंबू घातला जातो, फुलांची माळ, बताशे किंवा गणींची माळ, तोरण बांधून गुढी सजवली जाते. स्नान करून घरातील प्रमुख व्यक्ती मग या गुढीचे पूजन करते व गुढी घराच्या उंचीपेक्षा वर दिसेल अशी उभारते. महाराष्ट्रातील काही खेड्यांमधून बांबूऐवजी शेवग्याच्या काठीला तेल लावून आंघोळ घालतात व मग गुढी म्हणून वापरतात. गुढीपाडवा आला की दोन गोष्टींची सहजच आठवण येते… एक कडुनिंबाच्या पाल्याची व पुरणाच्या पोळीची.
आयुर्वेदानुसार आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सहा रसांची गरज असतेच. मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट. आणि अन्नसेवन करताना या रसांच्या क्रमानेच करावे तरच ते चांगले पचते. त्यामुळे इंग्रजी बुफेप्रमाणे आधी आपण सगळे तिखट-तुरट, अरबट-चरबट हादडतो व मग गोड खीर, कस्टर्ड किंवा आईसक्रीम खातो. ही अन्नसेवन करण्याची अतिशय चुकीची पद्धत आहे. पण गुढीपाडवा, मात्र योग्य जीवनशैलीची भेट देतो. मधुर रस भरभरून वाटतो. कारण जीवनात ‘गोड’ हवेच नाहीतर जीवनातली ‘गोडी’च निघून जाते. मधुर रस हा नवचैतन्य निर्माण करणारा… शक्तिदायी रस आहे. या रसाचे जितक्या आनंदाने, नियमित आपण सेवन करू तितके कार्यशील राहू कारण गोड रस शक्ती देतो. पण अतिप्रमाणात सेवन केले तर ‘मधुमेह’ देतो!. मधुर स्वप्ने आपली त्वचा व कांती सतेज बनते. मधुर रस सेवन करताना कुणी तोंड वाकडे करीत नाहीत. कारण हा रस मनाला समाधान देतो. आयुष्य वाढविणारा मधुर रस, शरीराला स्थिर ठेवून, जीवनशक्ती वाढवतो आणि प्रसन्नता देतो. गुढीपाडव्या दिवशी काही ठिकाणी श्रीखंड सेवन करतात अथवा खीर. माझ्या बालपणापासून आजपर्यंत आम्ही पुरणपोळीच खाल्ली. खेडेगावात अजून एक पद्धत आहे रानमेवा गुढीपाडव्यादिवशीच चाखण्याची. त्याआधी कोणताही रानमेवा झाडावरून तोडायचा नसतो. कारण तोपर्यंत तो परिपक्व झालेला नसतो. परिपक्व रानमेवाच देवाला वहायचा आणि मग आम्ही खायचा. यासाठी रानातली करवंद, जांभळं आणि कच्चा कैर्‍या आणून त्यात कडूलिंबाची पाने व गूळ घालून वाटून त्यांची चटणी केली जायची. ही चटणी मग दुपारच्या जेवणात पुरणपोळीबरोबर वाढली जायची. काही ठिकाणी कडूनिंबाची पाने, हिंग, ओवा, आले टाकून चटणी वाटली जाते. हीदेखील गुढीपाडव्याला सेवन केली जाते.

ज्याप्रमाणे मधुर रस महत्त्वाचा त्याचप्रमाणे कडूनिंबाचा कडू रसही तितकाच आरोग्यदायी. कडूनिंबाची पाने चैत्रामध्ये तयार झालेली असतात व त्यांचा रस चैत्रातील वाढणारी उष्णता कमी करून रक्त शुद्ध करतो. त्याचप्रमाणे त्वचारोगांसाठीही हा रस उपयुक्त आहे. पोटाचे विकारही बरे होतात. म्हणूनच कडू रस उत्तम गुणांचा मानला जातो. पाडव्याला गोड-कडू असा खाण्यात समतोल राखावा असा संदेश नकळत मिळतो. खरे तर नव वर्षाचा हा हर्षोल्लास कडू-गोड गोष्टींचा अवलंब सहजपणे करा व जीवनाचा आनंद लुटा असेच सांगतो.

पण सध्याच्या या टेक्नोस्नेही दुनियेत व डिप्रेशन-सप्रेशन-टेन्शनच्या जंजाळात जगणार्‍या समस्त बुद्धीजिवींसाठी गुढीपाडव्याचा वेगळा आदर्श जाणून घ्यावा लागेल. एक स्त्री म्हणून आणि माझ्यातली एक शिक्षिका म्हणून कुठेतरी मला खुणावते की आपल्याला काहीतरी वेगळा विचार करता आला पाहिजे. बर्‍याचवेळा आपण हल्लीच्या मुलांबद्दल बोलताना म्हणतो, सारखी मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसतात, मनच मेलीत यांची! जराही दया-माया नाही येत यांना इतरांची! अन् काही अंशी हेदेखील खरंय! आपल्यासारखी संवेदनशीलता नाही आढळत हल्लीच्या पिढीत! मग करूया का काही सकारात्मक गोष्टी, समाजातील काही नकारात्मक गोष्टींना हटविण्यासाठी? बरेच वेळा आपण ओरडतो मुलांना…. सारखा टीव्ही बघतोस, मोबाइलवर चॅट करतोस? कसं होणार तुझं? मग अशावेळी स्वतःचं थोडंसं निरीक्षण कराल? आयपीएलसाठी तास न् तास आपणही बसतोच ना टीव्हीसमोर? सतत मोबाइलवर चॅट आपणही करत असतोच ना? आपण तक्रार करण्यापेक्षा स्वतःच्या सवयी थोड्या बदलल्या तर थोडातरी परिणाम मुलांवर होईल. मग उभारूया का सकारात्मकतेची गुढी?
हल्ली वृद्धांचा बराच त्रास तरुण पिढीला होतो. मुले सांभाळावीत आईवडलांनी, पण आईवडलांना आपण किती सांभाळावे याचे गणित या तरुण पिढीला सोडवता येत नाही. नातवंडे आजीआजोबांना बिलगतात, त्यांचे लाडही खूप होतात. पण हेही काही छोट्यांच्या आईबाबांना चालत नाही. मुले शेफारतात, लाडावतात… हा आरोप होतो. कधी कधी आरोप इतका शिगेला पोचतो की वृद्ध आईबाबांना वृद्धाश्रमाची वाट दाखवली जाते. हा नकारात्मक स्वार्थीपणा दूर करता येईल का? नातू म्हणे आजी-आजोबा, आई-वडलांना जोडणारा सेतू असतो तर नात मंजुळ गाणी गाणारी कोकिळा, सगळ्या घराचं गोकुळ करणारी मणी असते ती. या समस्येवर सकारात्मक गुढी उभारूया का? आजीआजोबा हे देवाने निर्मिलेले नातवंडांचे प्रतिनिधी असतात. बाहेरचे नोकर पगार देऊन ठेवले तर त्यांचे विचित्र संस्कार त्या कोवळ्या मनावर होतात. मुलांना सांभाळणे म्हणजे एक डोकेदुखी वाटू लागते. इथे सकारात्मक विचारमंथन करून नात-नातू ही सकारात्मक गुढी उभारू शकतात. यासाठी आपले योगदान होईल का? प्रेमळ आई असते ती घरातली सन्माननीय गृहिणी असते, पण जेव्हा सासू बनते तेव्हा अपुरी पडते. ‘सासू’ आई कधीच होऊ शकत नाही हे बाळकडू प्यायलेली सूनही, कितीही चांगली मुलगी असली तरी सून म्हणून अपुरी ठरते. असे सगळ्यांचेच घडते असे नाही, पण बहुतेक अनेक कुटुंबे या चक्रव्यूहात फसलेली असतात. सासू व सुनेमध्ये सकारात्मकतेची नाजूक अशी वीण विणायला हवी. इथे गुढी उभारायचीय सकारात्मक विचारांची!
काही काही मंडळी चालता-बोलता ‘अखबार’ असतात. गावावरच्या सगळ्या ताज्या-शिळ्या बातम्या २४ तास त्यांच्याकडे उपलब्ध असतात….
एखाद्या व्यक्तीची नात शिशुवाटिकेतच बसत नाही, पुढे कसं होणार तिच्या शिक्षणाचं?….इथपर्यंतची चिंताही हा ‘अखबार’ करतो. ही मंडळी समाजोपयोगी नसतात. वातावरण गढूळ करण्याचं कामच जास्त करतात. अशा मंडळींना जीवनाकडे डोळसपणे बघण्याची सकारात्मक दृष्टी दिलीच पाहिजे. सकारात्मक गुढी इथेही रोवलीच पाहिजे.

‘दर्द का मसीहा’ असा अजून एक प्रकार आपल्या आसपास आढळतो. ते नेहमी दर्द, दुःख यावरच बोलतात. सतत दुःखाच्या गोष्टी करतात. कुणाचे दुःखद निधन झाले तर ती बातमी या व्यक्तीकडूनच आधी मिळते. कुणाला अपघात झाला, कुणाची भांडणं झाली, कुणी कर्जबाजारी झाला, आजारी पडला अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी आधी सांगणारी ही व्यक्ती. जरा नीट पाहिलं तर लक्षात येईल की अशी व्यक्ती कधीच सुखी दिसत नाही. नेहमी आपला सुतकी चेहरा करून असतात व भेटताच कुणाच्या तरी मरणाची, वाईट गोष्टींची माहिती देतात. असं म्हणतात की अतिशय दुःखी असणार्‍या, सतत दुःखाला कवटाळत बसणार्‍या व्यक्तीच्या दारावर आलेलं सुखही, ही व्यक्ती आपल्याकडे पाहात नाही म्हणून नाराज होऊन निघून जातं. हाच विचार यांच्या मनात रुजवणं आज काळाची गरज आहे. सकारात्मक विचारांची गुढी या व्यक्तींसाठीही उभारायची. तरच विचार बदलतील व अशी व्यक्ती बदलून जाईल.

आणखीन एक प्रकरण असते ‘व्हॉट्‌सऍप’वाल्या बंधूंचे. काही मंडळी व्हॉट्‌सऍपवर सतत नकारात्मक पोस्ट पाठवत असतात. अपघात, आत्महत्या, मारहाण असे भयानक फोटो पाठवण्यात त्यांना असुरी आनंद मिळतो. अनेक वेळा सूचना देणारा ऍडमिनही मग वैतागतो. काय साध्य होतं याने? फक्त नकारात्मक विचार पसरतात. हाच मुद्दा अशा व्यक्तींना सांगावा लागेल. असे भयानक पोस्ट्‌स फॉरवर्ड करून सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचारांचं बीजारोपण करता. जमेल ही सकारात्मक गुढी उभारायला?

छोट्या-छोट्या गोष्टींमुळे डिप्रेशनमध्ये (नैराश्यात) जाणारी आजची तरुण पिढी. खरेतर या सगळ्याच तरुणांच्या हाती एक एक सकारात्मकतेची गुढी द्यायला हवी. पालक-शिक्षक किंवा वयाने यांच्यापेक्षा थोडी मोठी असणारी व्यक्ती तरुण पिढीचं योग्य मार्गदर्शन करू शकते. कुणीही जरा काही बोललं, मनासारखी गोष्ट घडली नाही तर अगदी आत्महत्या करण्यापर्यंत मजल मारणार्‍या या पिढीला गरज आहे ती मायेच्या दोन शब्दांची, आपलेपणाची. ही गोष्ट जमवून आणूया का यंदाच्या गुढी उभारणीला?
गुढी उभारणीचा हा सण सर्वांना आनंदाचा, सुखसमृद्धीचा जावो. सर्वांसाठी ‘मंगलमय’ विचार मनात आणू या. कारण सध्याच्या आधुनिक शास्त्रानुसार हे सिद्ध झालंय की जेव्हा आपण नकारात्मक विचार मनात आणतो तेव्हा त्याचा सर्वांत प्रथम परिणाम होतो तो स्वतःवरच. त्यामुळे सतत सकारात्मक विचार असावेत व वागणेही त्याच दिशेने असावे.