>> पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी ७८८ उमेदवार रिंगणात; तिरंगी लढत
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवार दि. १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. गुरुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होईल. दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र विभागातील १९ जिल्ह्यांतील ८९ जागांसाठी तब्बल ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात लढत होत असे; परंतु यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) रुपाने तिसरा पक्ष रिंगणात आहे. आपने एकूण १८२ पैकी १८१ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र भागांत १९ जिल्ह्यांतील ८९ जागांसाठी दोन कोटींहून अधिक मतदार ७८८ उमेदवारांना मतदान करतील. यामध्ये सौराष्ट्रातील ४८, कच्छमधील ६ आणि दक्षिण गुजरातमधील ३५ जागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या भागात एकूण दोन कोटी ३९ लाख ७६ हजार ६७० मतदारांची नोंदणी झाली आहे.
पहिल्या टप्प्यात गुरुवारी राजकोट, सुरेंद्रनगर, कच्छ, मोरबी, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर सोमनाथ, अमरेली, भावनगर, बोताड, नर्मदा, भरूच, सुरत, तापी, डांग्स, नवसारी आणि वलासड या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी २५ हजार ४३४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. शहरी भागातील ९ हजार १८ आणि ग्रामीण भागातील १६ हजार ४१६ केंद्रांवर मतदान होणार आहे. २०१७च्या निवडणुकीत या जागांवर ६८ टक्के मतदान झाले होते.
पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवींचा समावेश आहे. ते द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथून निवडणूक लढवत आहेत. गुजरातचे माजी मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, कुंवरजी बावलिया, मोरबीचे कांतीलाल अमृतिया, क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा आणि ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया हेही रिंगणात आहेत.
पहिल्या टप्प्यातील एकूण ७८८ उमेदवारांपैकी ७१८ पुरुष आणि ७० महिला उमेदवार आहेत. मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने पहिल्या टप्प्यात ५७, भारतीय आदिवासी पक्षाने (बीटीपी) १४, समाजवादी पक्षाने १२, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) ४, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने २ उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय ३३९ अपक्षही रिंगणात आहेत.
कॉंग्रेस-भाजपचे ८९, तर आपचे ८८ उमेदवार
पहिल्या टप्प्यात भाजप व कॉंग्रेसने प्रत्येकी ८९ उमेदवार उभे केले आहेत. आपचे ८८ उमेदवार रिंगणात आहेत. सुरत (पूर्व) मतदारसंघातील आपच्या उमेदवाराने शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे त्यांचे ८८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यात भाजपने नऊ, कॉंग्रेसने सहा आणि आपने पाच महिला उमेदवार उभ्या केल्या आहेत.
भाजपसमोर कॉंग्रेस-आपचे आव्हान
आतापर्यंत गुजरातमध्ये भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात लढत होत असे; मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर कॉंग्रेस आणि आपचे आव्हान देखील आहे. भाजपसमोर गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने तगडे आव्हान निर्माण केले होते. कॉंग्रेसला ७७ आणि भाजपला ९९ जागा मिळाल्या होत्या. भाजपला २०२४ च्या निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये सत्ता मिळवायची असल्याने मोठी ताकद लावली असल्याचे दिसून येत आहे.