गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ हे गोव्यातील जमीन भांडवलदारांना देण्यासाठी सत्ताधारी भाजप सरकारने सुरू केलेला एक घोटाळा आहे, असा आरोप काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. आतापर्यंत मंडळाने मंजूर केलेल्या सर्व प्रकल्पांची सखोल माहिती व आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली
आहे.
मंडळाच्या 35व्या बैठकीत जे 7 प्रकल्प मंजूर झालेले आहेत त्याद्वारे 180 कोटींची गुंतवणूक होणार असून 1208 जणांना रोजगार प्राप्त होणार असल्याची मुख्यमंत्र्यानी जी घोषणा केलेली आहे त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ही आकडेवारी गोमंतकीयांची दिशाभूल करणारी आहे, असा आरोप आलेमाव यानी केला.
2018 सालापासून आयपीबीसाठीच्या प्रकल्पांना गोवा सरकारने 12.91 लाखा चौ. मी. एवढी जमीन दिली आहे. आणि त्यासाठीची प्रस्तावित गुंतवणूक ही 4637.50 कोटी रु. एवढी आहे.
मात्र, प्रत्यक्षात केवळ 726.43 कोटी एवढीच गुंतवणूक आली आहे. तसेच सदर प्रकल्पांतून 2018 पासून 17525 एवढ्या प्रस्तावित नोकऱ्यांच्या तुलनेत केवळ 1037 एवढ्याच नोकऱ्या तयार झालेल्या आहेत आणि त्यात केवळ 55 गोमंतकीयांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. सदर आकडेवारी ही फक्त गेल्या चार वर्षांची असून हे एक हिमनगाचे टोक आहे, असा दावाही आलेमाव यांनी केला आहे.
नगर नियोजन कायद्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून पेडणे येथे गेमिंग व्हिलेज उभारण्यासाठी 3.80 चौरस मीटर एवढी जमीन देण्यात आली आहे. ही जमीनसुद्धा जलसिंचन खात्याच्या कमांड एरियाखाली असल्याचे आलेमाव यांनी नमूद केले आहे.