गिरी बार्देश येथे राष्ट्रीय महामार्गावरील नवीन उड्डाण पुलाच्या कामासाठी माती परीक्षण करताना मुख्य जलवाहिनी काल फुटल्याने बार्देश तालुक्यात आज सोमवार 15 जानेवारीला मर्यादित पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असून जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
मुख्य जलवाहिनी फुटल्याने बार्देश तालुक्यातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. रविवारी महामार्गावरील उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून माती परीक्षण करण्यात येत होते. माती परीक्षणासाठी खोदकाम करण्यापूर्वी योग्य खबरदारी घेण्यात न आल्याने मुख्य जलवाहिनी फुटली. कंत्राटदाराला माती परीक्षण करण्यासाठी यंत्राच्या साहाय्याने जमिनीची तपासणी करून नंतरच खोदकाम करण्याची सूचना करण्यात आली आहे. दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर बार्देश तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत होत असताना आता मुख्य जलवाहिनी फोडण्यात आल्याने पुन्हा एकदा पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.