गिरीश लायन्स, एव्हेंजर्सची घोडदौड

0
137

कुडचडे येथील वॉरिअर्स क्लबने आयोजित केलेल्या पहिल्या सांगे, केपे, धारबांदोडा मर्यादित टी-ट्वेंटी प्रीमियर लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या सामन्यांत गिरीश लायन्स व एव्हेंजर्स यांनी विजयाला गवसणी घातली.

कुडचडे येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एव्हेंजर्सने ‘दामबाब’ संघावर तीन गड्यांनी विजय प्राप्त केला. प्रथम फलंदाजी करताना दामबाब संघाने २० षटकात नऊ गडी गमावून १२२ धावा केल्या. त्यांच्या राजेश वायंगणकरने ३०, संदीप मडगावकरने १९ तर अमय धामसेकरने १८ धावा केल्या. एव्हेंजर्सतर्फे वीरेश १८-४, सर्फराज नवाझ २७-२, रुपेश वेळीप ४-१ यांनी गडी बाद केले. एव्हेंजर्सने विजयासाठी आवश्यक १२३ धावा १९ शतकात ७ गडी गमावून केल्या. त्यांच्या सोमेश प्रभुदेसाई (नाबाद ४९) याने विजयात सिंहाचा वाटा उचलला. प्रल्हाद नाईकने १५ धावा केल्या. दामबाबकडून विनोद विल्सन १९-२, मयूर नाडकर्णी १९-२, महादेव फडते २३-१ यांनी गडी बाद केले. सोमेश प्रभुदेसाई सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.

दुसर्‍या सामन्यात गिरीश लायन्सने साई स्पोटर्‌‌सवर ७ गड्यांनी एकतर्फी विजय मिळविला. फलंदाजी करत साई स्पोटर्‌‌सने १८ षटकात सर्वगडी गमावून शंभर धावा केल्या. त्यांच्या सनी कांडेकर (२३) याने एकाकी झुंज देत गिरीश लायन्सचा प्रतिकार केला. गिरीश लायन्स क्षितीज नाईक १८-४ साई स्पोटर्‌‌ससाठी कर्दनकाळ ठरला. हरीश नाईक १८-२, राजदीप नाईक ११-१ यांनी त्याला टांगली साथ दिली.
प्रत्युत्तरात गिरीश लायन्सने केवळ १६ षटकांत अवघे तीन गडी गमावून १०४ धावा केल्या. त्यांच्या आर्यन खुटकर (३७) भारत अर्कस (२६) हरीश नाईक (१५) यांनी मोलाचे योगदान दिले. साई स्पोटर्‌‌सतर्फे नूर अहमद, बाळकृष्ण होंडारकर व संदीप कुर्डीकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.