जिल्हा पंचायत निवडणुकीत पराभवाची जबाबदारी स्वीकारून गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे पक्ष सूत्रांकडून समजले. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा अध्यक्षा सोनिया गांधी यांना काल पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे पानिपत झाल्याने गिरीश चोडणकर यांना ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी लक्ष्य केले आहे. कॉंग्रेस पक्षातील ज्येष्ठांना बाजूला सारून आपल्या गटांतील कार्यकर्त्यांना घेऊन निर्णय घेत असल्याची टीका होत होती. गोव्यात कॉंग्रेसने उभे केलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते मतदारसंघात गेले नाहीत. या उलट फक्त पत्रकबाजी करीत राहिले, असा आरोप होत आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेल्या चार जागांपैकी तीन जागा सासष्टी तालुक्यातून मिळाल्या. मात्र सासष्टी तालुक्यातून कॉंग्रेसला सहा जागा मिळण्याची आशा होती. मात्र दवर्ली व गिरदोली या कोळशाविरुद्ध आंदोलने पेटलेल्या ठिकाणीही कॉंग्रेसला यश मिळू शकले नाही. या सर्वच कारणांमुळे ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांकडून चोडणकर यांच्यावर टीका होत आहे.