मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन; युरी आलेमाव यांनी मांडला होता प्रश्न
ॲपवरुन ऑनलाइन पद्धतीने चालू असलेल्या जुगाराबरोबरच गावागावांत चालू असलेल्या जुगारअड्ड्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारलेल्या जुगारासंबंधीच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.
काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला युरी आलेमाव यांनी ऑनलाइन जुगारावरील कारवाईबाबतचा प्रश्न उपस्थित केला. ऑनलाइन पद्धतीने जो जुगार चालू आहे, त्या जुगाराला मोठ्या प्रमाणात राज्यभरातील युवा वर्ग बळी पडू लागला असल्याचे आलेमाव यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. बेकायदेशीररित्या हे जुगार चालवणारे लोक दिवसाला कोट्यवधी रुपये कमावत असून, ज्या लोकांना हे व्यसन जडले आहे, त्या लोकांचे मात्र दिवाळे निघत आहे. पैसे गमावल्यानंतर काही जण नैराश्यातून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊलही उचलत असल्याचे आलेमाव यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जुगार प्रकरणी गेल्या काही वर्षांत केलेल्या कारवाईची माहिती सादर केली. जुगार प्रकरणी 2019 ते 2023 या दरम्यान 44 जणांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले. राज्यात फक्त 11 हॉटेल्स व 6 जहाजांतून चालणारा कॅसिनोतील जुगार हा कायदेशीर आहे. अन्य जुगार हे बेकायदेशीर असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. मांडवी नदीतील जहाजांतून चालणाऱ्या कॅसिनोत जाण्यास गोमंतकीयांना बंदी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना युरी आलेमाव यांनी या ऑनलाइन जुगारावर सरकारने कडक कारवाई करावी; अन्यथा राज्यातील भावी पिढ्या बरबाद होतील, अशी भीती व्यक्त केली. यावेळी केपे मतदारसंघाचे आमदार एल्टन डिकॉस्टा व विजय सरदेसाई आणि व्हेन्झी व्हिएगस यांनीही हा जुगार विनाविलंब बंद करावा, अशी मागणी सरकारकडे केली.
जुगार चालवणाऱ्यांची गोव्यात कार्यालये नाहीत, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर एक कार्यालय फातोर्डा मतदारसंघात असल्याचे युरी आलेमाव यांनी लक्षात आणून दिले.
सभापतींनी काणकोणातील
जुगार बंद पाडला ः आलेमाव
काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांना आपल्या मतदारसंघातील जुगारअड्डे बंद पाडण्यात यश आले आहे. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र असल्याचे युरी आलेमाव यांनी यावेळी स्पष्ट केले.
तामिळनाडू सरकारनेही
जुगार बंद पाडला ः सरदेसाई
तामिळनाडू सरकारने जुगारविरोधी कायदा आणून ऑनलाइन जुगार बंद केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी आणलेल्या या कायद्याचा गोवा सरकारने अभ्यास करावा, अशी सूचना विजय सरदेसाई यांनी केली.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
गावातील जुगारअड्डे हे बेकायदेशीर आहेत व ते बंद करण्यात येतील. ऑनलाइन जुगारावर लक्ष ठेवून हा जुगार कसा बंद करता येईल याकडे लक्ष देण्याची सूचना सायबर पोलिसांना करणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच गावागावांतून चालणारा जुगार बंद पाडण्याची जबाबदारी संबंधित पोलिसांवर सोपवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पोलिसांच्या आशीर्वादाने जुगारअड्डे चालतात : व्हिएगस
ग्र्रामीण भागात चालू असलेले जुगारअड्डे हे पोलिसांच्या आणि विशेष करुन त्या त्या भागातील पोलीस स्थानकावरील निरीक्षकांच्या आशीवार्दाने चालू असल्याचा आरोप आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी केला. या पोलीस निरीक्षकांना ते जुगारअड्डे बंद करण्यास सांगा आणि आदेश देऊनही बंद न करणाऱ्या निरीक्षकांना निलंबित करा, अशी सूचना व्हिएगस यांनी केली.