गावभूल

0
84

 – श्रुती नाईक, प्रथम वर्ष कला शाखा,

शासकीय महाविद्यालय, साखळी
गोव्यासारख्या निसर्गरम्य प्रदेशातवसलेला माझा गाव तसाझाडापेडांनी भरलेला आहे. पण जंगलापासून मात्र तो बराच दूर आहे. इथे वन्य प्राणी फार कमी दिसून येतील. एके दिवशी मी पाहिले कुठून कोण जाणे एक पाहुणा आमच्या गावात आला. जणू काही जंगलापासून दूर आल्याने वाट चुकलेला. कदाचित त्याला वाटले असेल रोजच्या जीवनापासून जरा विश्रांती घेऊन लोकवस्तीत जाऊन फेरफटका मारून येऊया. त्यांना आपण आपले पूर्वज मानतो मग आमच्यात येऊन राहाण्याचा त्यांना अधिकार आहेच मुळी. तुम्हांला कळले असेलच मी कुणाविषयी बोलत आहे ते. होय! तो एक भारी चुणचुणीत माकड होता. प्रभू रामचंद्राचा परमभक्त!मी त्याला माकड न म्हणता माकडोबाच म्हणते. असे म्हटले जाते की जर एखादा माकड आपल्या कुटुंबापासून दुरावला की पुन्हा त्याला त्यांच्या गटात जागा मिळत नाही. प्राण्यांचे तसे आपापले वेगवेगळे नियम असतात जे सामान्य माणसाच्या आकलनाबाहेर असतात. असो. मला तुम्हांला गंमत सांगायची आहे ती बराच काळ आमच्या गावात येऊन राहिलेल्या या माकडोबाची. त्याचे दर्शन आम्हांला पहिल्यांदा गावातील देवळाच्या कळसावर बसलेला असताना झाले. आम्हा सर्वांना त्याची गम्मतच वाटली. कारण जेव्हा जेव्हा गावात माकडांची गँग यायची तेव्हा ती सर्व नासधूस करून जायची. कुठेही काही शिल्लक ठेवायची नाही. त्यामुळे या झाडावरून त्या झाडावर, ह्या फांदीवरून त्या फांदीवर त्यांची पळापळ चालायची. लोकांना त्यांना बघून दगड उचलल्यावाचून राहवत नसे. ह्याचे मात्र निराळेच. आमच्या गावात येऊन तो सरळ देवळाच्या कळसावर जाऊन बसला होता, म्हणून कोणाला त्याला हाकलावेसे वाटले नाही. माझे लक्ष तर प्रथम त्याच्या पाठमोर्‍या आकृतीवरच पडले. मला वाटले हा कुणी लोकरीचा पिवळा-सोनेरी कोट व काळी टोपी घालून बसलेला माणूसच आहे. पण जेव्हा माझ्या मैत्रिणीने सांगितले की तो माकड आहे तेव्हा मी चकीतच झाले. मध्यम उंची, काळे तोंड, वयाने दांडगा वाटत होता. जास्त वाकून बसला नव्हता म्हणून मला तो पाठमोरा असताना माणसासारखाच वाटला.
पण किती काळ एका जागेवर बसून राहाणार? शेवटी अतिउत्साही प्राण्याची जात. हळूहळू त्याच्या विदूषकाच्या हालचाली सुरू झाल्या. ते माणसांजवळ जाऊ लागल्यावर आम्हांला त्याची भितीच वाटू लागली. ते आपल्यावर तर झडप घालणार नाही ना? पण हळूहळू ते काही हानी पोचवणार नाही याची भनक लागल्यावर आमची त्याच्याशी गट्टी झाली. आम्हांला त्याची सवयच झाली म्हणा हवेतर. काही वेळाने हे माकडोबा एका घरावरून दुसर्‍या घरावर उडी मारू लागले. जणू काही प्रत्येक घराला ते भेटच देत होते. त्याची भेट पाहून त्याचा पाहुणचार तर होणारच. त्याची गम्मत म्हणजे लहान मुलांना पाहून तो एखाद्या वेड्यासारखा आपली बत्तीशी दाखवून हिणवायचा. तो खूप स्मार्ट होता. त्याला लहान मुलांनी परतून हिणवले की जणू आपले लक्षच नाही असे दाखवून तो इकडे तिकडे बघायचा. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे काही मुले क्रिकेट खेळत होती त्यांचा चेंडूच त्याने पळवला. जणू काही त्याला खेळायची उमेद आली होती. ती मुले त्याच्या मागानं लागल्यावर तो चेंडू त्याने फेकून दिला. हे पाहून मुले जोराने खुशीत ओरडली. गावात त्याच्या खाण्याचे काही वांदे नव्हते. लोकांच्या दारातील पेरू, केळी पळवणे हे काम त्याचे चालूच होते. पण तरीही गावातील मंडळी त्याचा खास पाहुणचार करीत. झाडावर काही नसेल तर घरातील केळी, सफरचंद आणून त्याच्या पुढ्यात टाकले जाई. आता बराच काळ झाला आहे तो आमच्या गावात आल्यापासून. त्याचा काही जंगलात परत जाण्याचा विचार दिसत नाहीये. आपल्या सवंगड्यांपासून दुरावल्याची खंतही त्याला नाहीये. कारण इथे माणूसच त्याचा मित्र झाला आहे. माणसाची व प्राण्यांची मैत्री किती सुखकारक असते. त्यात कोणत्याही प्रकारचे हेवेदावे नसतात. या माकडोबाला आमच्या लोकवस्तीची भूल पडली यामागचे कारण काय असेल देवास ठाऊक, पण त्याची ही गावभूल मात्र आमच्या मनोरंजनाचा विषय झाली आहे, हे मात्र खरं!