गानकोकिळा लता मंगेशकर कोरोनामुक्त ः आरोग्यमंत्री टोपे

0
18

कोरोनाची बाधा झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात उपचार घेत असलेल्या प्रख्यात गायिका लता मंगेशकर आता कोरोनामुक्त झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लता दीदींच्या प्रकृतीमध्येही सुधारणा होत असून, व्हेंटिलेटर सपोर्टही काढण्यात आला असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, लता दीदी व्हेंटिलेटरवर होत्या, मात्र आता त्यांचे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आहे. न्यूमोनिया आणि कोरोनातून लता दीदी आता बर्‍या झाल्या असून सध्या ब्रेन इन्फेक्शन आहे. यामध्ये सुधारणा करण्याबाबत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असून सध्या काही प्रमाणात त्यांना अशक्तपणा आहे, त्यावर उपचार सुरू असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.