(क्षणचित्रं… कणचित्रं…)
- प्रा. रमेश सप्रे
वरच्या खोळी निरनिराळ्या प्रकारच्या, रंगांच्या असल्या तरी साऱ्या गाद्यांचा आतला कापूस एकसारखाच असतो. महत्त्व असतं कापसाला; खोळीला नव्हे! वरवर विविधता असलेल्या मानवसमाजाच्या तळाशी असलेली एकात्मता महत्त्वाची आहे.
“आजी, तुला मी बाबांची गाडी चालवावी असं म्हणायचंय का?” दिनूनं विचारलं. यावर आजी म्हणाली, “नाही रे वेड्या, मी म्हणतेय, बाबांची गादी चालव. गा-दी!” “म्हणजे काय?” दिनूचा उतावळा प्रश्न. “अरे, तुझे बाबा डॉक्टर आहेत. रोग्यांची सेवा करणारे. म्हणून लोक त्यांना देवमाणूस म्हणतात. तूही डॉक्टर बनून सेवाभावात बाबांसारखा देवमाणूस बन. त्याहीवरचा देवदूत बनलास तर जास्त चांगलं. याला म्हणतात गादी चालवणं म्हणजे परंपरा चालवणं.” या आजीच्या स्पष्टीकरणानं दिनूचं समाधान झालं.
गादी म्हणजे परंपरा. वंशपरंपरा तशी कर्तृत्वपरंपरा. असं असलं तरी ‘नारदाची गादी’ हा काय प्रकार आहे? नारद कधी बसतही नाहीत. सतत भ्रमण करत असतात. त्यांना विश्रांतीच नाही मग गादी हवी कशाला? ‘व्यासपीठ’ एकवेळ पटू शकतं. पीठ म्हणजे आसन. व्यासांनी आसनस्थ होऊन आपल्या शिष्यांकडून वेदाचे भाग करून घेतले म्हणून व्यास या शब्दाचा अर्थ ‘विव्यास (विस्तार) वेदान्’ असा आहे. पण नारदाची गादी म्हणजे निजण्याचे साधन नव्हे तर त्यांची अखंड नामाची, निरंतर नामसंकीर्तनाची परंपरा. आज कीर्तनकार ही परंपरा जपत नि जागवत आहेत. नारदाच्या गादीवर उभे राहून नारदीय कीर्तन परंपरा जपत नि जागवत आहेत. नारदाच्या गादीवर उभे राहून नारदीय कीर्तनपरंपरा चालू राहिली आहे.
खरी गादी ऐतिहासिक संदर्भात येते. राजघराण्याची परंपरा, वारसांचा अनुक्रम या गादी शब्दातून सुचवला जातो. त्या दानशूर राजानंतर गादीवर आला दुसरा राजा, जो अत्यंत अनुदार नि कंजूस होता म्हणून गुणांच्या दृष्टीनं गादी चालवली गेली नाही.
कधीकधी अस्सल क्षत्रिय परंपरा असलेल्या राजघराण्यात एखादा राजा निपुत्रिक राहतो. त्यामुळे दत्तक पुत्र घेऊन त्याला गादीवर बसवले जाते. अशा संदर्भात एका जबाबदार व्यक्तीनं एका राजघराण्याबद्दल उद्गार काढले होते- ‘ही कसली गादी? ही फाटकी गादी आहे.’ त्यांना सुचवायचं होतं की आता मूळचं रक्त (अनुवंशिकता) म्हणजे शौर्याची परंपरा (गादी) उरलेली नाही. पण त्याकाळी या वादग्रस्त उद्गारांवरून प्रचंड गदारोळ उठला होता. असो.
आपण जर नैमिषारण्यासारख्या तीर्थक्षेत्रात गेलो तर तेथील इतर स्थानांबरोबर आपल्याला ‘व्यासगद्दी’ दाखवली जाते. भागवत ग्रंथाची रचना जरी व्यासांच्या बदरिका आश्रमात झाली असली तरी भागवतातील आचारविचारांची भूमी म्हणून उल्लेख केला जातो या नैमिषारण्याचाच, जिथं शौनक सहस्रावधी ऋषींसह सूतांना प्रश्न विचारतात नि भागवताचा प्रवाह सुरू होतो. अशा पवित्र स्थानी चिरंजीव व्यास महर्षींचं चिरंतन स्मरण म्हणून व्यासांची गादी- व्यासगद्दी- हवीच. व्यास हे आपल्या गुरुशिष्यपरंपरेतील महत्त्वाचा दुवा आहेत, म्हणून व्यासांची गादी म्हणजेच व्यासपीठ पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी हवेच. गुरुपौर्णिमेला व्यासपूजन केलं जातं ते याच भावनेनं.
शेषशय्येवर आनंदात विराजमान झालेले ‘शांताकारं भुजगशयनं’ असे आपले विष्णुभगवान शेषशायी किंवा शेषशयनी नारायण म्हणूनच ओळखले जातात. शेष ही त्यांची गादीच आहे. म्हणून ज्यावेळी अखंड नारायणनामाचा जप करणाऱ्या आपल्या पुत्राला- प्रल्हादाला- सर्पदंशाने मारण्यासाठी पिता हिरण्यकश्यपूने काळसर्पाला पाठवले तेव्हा प्रल्हादाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती- ‘शेषनागा, तू इथे आला आहेस तर माझे नारायणभगवान कोणत्या गादीवर झोपले आहेत?’ -आपल्याला ‘शेषनाग’ म्हटल्यामुळे आनंदित होऊन त्या काळसर्पाने प्रल्हादाला दंश केलाच नाही.
ज्यावेळी गादीला ‘बिछाना’ म्हटले जाते तेव्हा त्याला शरीरसुखाचा संदर्भ असतो. हल्ली अधिकाधिक सुख देणारे असे अनेक बिछाने (मॅट्रेसेस्) बाजारात उपलब्ध आहेत. काही इंचांपासून काही फुटांपर्यंत जाडी असलेल्या या बिछान्यांच्या कल्पक जाहिराती केल्या जातात. बिछान्यावर झोपलेल्या स्वप्नसुंदरीची चित्रं या जाहिरातीत वापरली जातात. पण साऱ्यांचा केंद्रबिंदू देह नि त्याला मिळणारा आराम हाच असतो.
‘राम हमारा जप करे, हम बैठे आराम’ म्हणणाऱ्या कबीराला मनाचा आराम रामनामातून मिळतो. शरीरासाठी बिछाना आवश्यक असतो.
काही वर्षांपूर्वी चुंबकीय गाद्यांचा (मॅग्नेटिक मॅट्रेसेस) खूप बोलबाला होता. त्यांची जाहिरात (प्रमोशन) करणाऱ्यांना प्रशिक्षण देताना जी वेशभूषा नि इतर गोष्टींची आचारसंहिता अपेक्षित होती ती पाहता ही चुंबकीय गादी यापूर्वी यक्षगंधर्व अप्सराच वापरत असाव्यात असे चित्र उभे केले गेले होते. सारे रोग बरे करून मनःशांती देण्याची क्षमता या गाद्यांत होती असे आभासी चित्र उभे केले. सर्वत्र कोट्यवधी रुपयांची देवघेव झाली. पण लवकरच मनःशांती सोडाच, व्याधिमुक्तीही या गाद्यांनी साधत नाही हे अनुभवाला आल्यावर ही जादूच्या गादीची लाट ओसरली.
खरी गरज आहे ती सध्याच्या ताणतणावग्रस्त जीवनात मनाला शांत करणाऱ्या गादीची. अशी गादी फक्त संतांकडे असते. मानसोपचारतज्ज्ञांकडेसुद्धा अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी शरीराला देण्याच्या गोळ्या किंवा विजेचे धक्के (इलेक्ट्रिक शॉक्स) असतात. श्रवण-चिंतन-नामस्मरण यातून साध्या संतांनाही मनःशांतीचा निरंतर लाभ होत राहतो. हीच ती मनाची गादी!
शेवटी रामकृष्ण परमहंसांनी गादीचा दृष्टांत देऊन जो संदेश दिलाय तो अतिशय मोलाचा आहे- गादी म्हणजे आतला कापूस नि बाहेरची खोळ (कव्हर). वरच्या खोळी निरनिराळ्या प्रकारच्या, रंगांच्या असल्या तरी साऱ्या गाद्यांचा आतला कापूस एकसारखाच असतो. महत्त्व असतं कापसाला; खोळीला नव्हे! वरवर विविधता असलेल्या मानवसमाजाच्या तळाशी असलेली एकात्मता महत्त्वाची आहे. ती म्हणजे माणुसकी. त्याचप्रमाणे अनंत विविधतेने नटलेल्या सृष्टीच्या मुळात असलेली जिवंत एकात्मता मोलाची आहे. ती म्हणजे चैतन्य, जिवंतपणा. याच्या प्रत्यक्ष अनुभूतीतूनच लाभते मनःशांतीची, मनःप्रसादाची गादी.