पणजी (सां. प्र.)
‘गाथा कर्तृत्ववानांच्या’ या पुस्तकात मोठ्या माणसांचे मोठेपण शंभू बांदेकर यांनी नेमकेपणाने लिहिले आहे. व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचे हे त्यांनी प्रत्येक लेखातून दाखवून दिले आहे. काळाबरोबर राहणे आणि लिहीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध समीक्षक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी येथे केले.
जागर प्रकाशनतर्फे ज्येष्ठ साहित्यिक शंभू भाऊ बांदेकर यांच्या ‘गाथा कर्तृत्वानांच्या’ या व्यक्ती परिचयात्मक बोधपर पुस्तकाचे प्रकाशन शनिवार गोमंतक साहित्य सेवक मंडळात प्रमुख पाहुणे विरोधी पक्ष नेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ तथा विचारवंत प्राचार्य माधवराव कामत व प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने कुलकर्णी बोलत होते. व्यासपीठावर शंभू बांदेकर व ‘जागर प्रकाशन’ चे सुदेश आर्लेकर उपस्थित होते.
सुरुवातीला सौ. मनाली चव्हाण, सौ. दिप्ती कुडाळकर, सौ. नेहा कुडाळकर, ध्रुव कुडाळकर व महेश चव्हाण यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. संगम भोसले यांनी सूत्रसंचालन केले. बांदेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.