आराडी – कांदोळी येथे गांजाची शेती (कॅनाबीस प्लांट) करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. घर मालक लॅनी फिल्हो यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे,
गांजीच्या शेतीच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. कांदोळी येथे गांजाच्या रोपट्यांची लागवड करण्यात आल्याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा घालून १० किलो कॅनाबिस जप्त केली आहे. पोलिसांनी सुसांत साहू आणि प्रवेश सलाम या दोघांना अटक केली आहे. कांदोळी येथे बेकायदा पध्दतीने अमली पदार्थाच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. ज्या खोलीमध्ये गांजाच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली ‘ती’ खोली सील करण्यात आली आहे. लॅनी फिल्हो यांच्या जागेत ड्रग्सच्या रोपट्याची लागवड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या १० किलो कॅनाबीसची किंमत अंदाजे १० लाख रूपये एवढी आहे.
पोलीस यंत्रणेकडून अमलीपदार्थाच्या विरोधात सातत्याने कारवाई केली जाते. तरीही अमलीपदार्थ व्यवसायात घट होताना दिसून येत नाही. उलट अमली पदार्थ व्यवसायातील नवनवीन प्रकार उजेडात येत आहे. गांजाची शेती हा असाच प्रकार आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.