- डॉ. मनाली महेश पवार
गर्भधारणेचे निश्चित निदान डॉक्टरांनी केल्यावर गर्भिणीने तपासणीसाठी नियमित जावे. गर्भधारणा होण्यापूर्वी काही विकार असल्यास माहिती घेतली जाते. म्हणजे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी. याचे कारण, हे सर्व विकार गरोदरपणात अधिक बळावतात व त्रासदायक होतात आणि गरोदरपणात या विकारांमुळे आई व बाळ यांना धोका उद्भवतो.
सध्या अकाली प्रसवचे (झीशींशीा वशश्रर्ळींशूी) प्रमाण खूपच वाढलेले दिसते. नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण तर कमी झालेलेच आहे. त्याबरोबर 7-8 व्या महिन्यावर प्रसूती किंवा कमी वजन असलेल्या गर्भाची प्रसूती किंवा मूढगर्भ (पोटातच गर्भाची वाढ खुंटते) बालक जगू शकत नाही, अशा अनेक उपद्रवांतून गर्भिणी जात आहे व याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रक्तदाब वाढणे. त्याचप्रमाणे रक्तदाब कमी झाल्यानेही गर्भिणीला अतिकष्ट सहन करावे लागतात. यात बालकाला व मातेला दोघांनाही धोका असतो.
प्रसूतिशास्त्रात गेल्या शतकात खूप प्रगती झाली आणि गरोदरपणातील आणि बाळंतपणातील महत्त्वाचे धोके लक्षात यायला लागले. मग त्यावर उपाय शोधायला सुरुवात झाली. अठराव्या-एकोणिसाव्या शतकापर्यंत बाळंतपणात मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण खूप जास्त होते. त्यात जंतुसंसर्ग आणि रक्तस्राव ही महत्त्वाची कारणे होती. विसाव्या शतकात या दोन्ही कारणांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले, पण गरोदरपणातील उच्च रक्तदाबामुळे उद्भवणाऱ्या धोक्याची व्याप्ती लक्षात यायला लागली. प्रगत देशांमध्येही गरोदरपणातील उक्त रक्तदाब व त्यामुळे बाळाला आणि आईला होणारे धोक्याचे प्रमाण वाढले. मग त्यावर उपाय शोधायला, प्रतिबंधासाठी काही करता येईल का याचा विचार झाला. विविध तपासण्यांच्या आधारे आता योग्य वेळेला निदान होऊ लागले आहे. आधुनिक उपचारपद्धती, गर्भिणी परिचर्यासारख्या उपक्रमांद्वारे गरोदरपणाशी संबंधित धोके खूप प्रमाणात कमी झाले आहेत.
गर्भधारणेचे निश्चित निदान डॉक्टरांनी केल्यावर गर्भिणीने तपासणीसाठी नियमित जावे. गर्भधारणा होण्यापूर्वी काही विकार असल्यास माहिती घेतली जाते. म्हणजे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी. याचे कारण, हे सर्व विकार गरोदरपणात अधिक बळावतात व त्रासदायक होतात आणि गरोदरपणात या विकारांमुळे आई व बाळ यांना धोका उद्भवतो.
गरोदरपणापूर्वी उच्च रक्तदाब असल्याच्या घटना काही प्रमाणात असतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर रक्तदाब वाढून त्यामुळे दुर्घटना होण्याचे प्रमाण खूप आहे.
- प्रत्येकवेळी वजन पाहिले जाते. अचानक वाढलेले वजन रक्तदाब वाढल्याचे सूचित करते.
- पायावर किंवा इतरत्र येणारी सूजदेखील रक्तदाब वाढल्याचे द्योतक आहे.
- लघवीतून जाणारे अल्ब्युमिन नामक प्रोटिनदेखील रक्तदाब वाढल्याचे सुचवते.
जेव्हा गरोदरपणात रक्तदाब वाढल्याचे आढळते तेव्हा हा रक्तदाब आधीचा आहे का, बरोबर लघवीतून अल्ब्युमिन जात आहे का, हे सगळे बघितले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या या उच्च रक्तदाब विकारावर वेगवेगळी उपाययोजना करावी लागते.
सर्वसाधारणपणे रक्तदाब हा तरुण वयात 120/80 अधिकवजा 10 मिलिमीटर ऑफ मर्क्युरी असा असतो. गरोदरपणात हा रक्तदाब कमीच होतो. 110/70 अधिकवजा 10 मिलिमीटर ऑफ मक्युरी इतका होतो आणि तसाच संपूर्ण गरोदरपणात राहतो.
जर हा रक्तदाब 140/90 मिलिमीटर मर्क्युरी किंवा जास्त पातळीवर गेला तर त्याला गरोदरपणातील उच्च रक्तदाब असे म्हणतात. यात खूप वेगवेगळे प्रकार व बारकावे आहेत.
नुसताच रक्तदाब वाढला, का त्याच्याबरोबर सूज येऊन लघवीमध्ये अल्ब्युमिन जायला सुरुवात झाली आहे यावर गरोदर स्त्रीला व बाळाला होणारे धोके अवलंबून असतात.
बऱ्याच वेळा गर्भिणीला व इतर घरातील सदस्यांना कितीही समजावून सांगितले तरी ‘बीपी’ वाढला हे मुळी त्यांना मान्यच नसते. त्यामुळे गरोदरपणात त्या गोळ्या घेणे, पथ्य पाळणे टाळतात. त्यामुळे स्वतःच्या व बाळाच्या रक्षणासाठी हा रक्तदाब वाढल्याने होणाऱ्या परिणामांचे, लक्षणांचे व उपाययोजनाचे महत्त्व जाणून घ्या.
- पहिलटकरणीमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. अठरा वर्षे वयापेक्षा कमी वय असेल किंवा तीसपेक्षा जास्त वय असेल आणि पहिली खेप असेल तर हे प्रमाण अधिकतर असते. विशेषतः पस्तीसपेक्षा जास्त वयाच्या गरोदर स्त्रीमध्ये हे प्रमाण अधिक असते.
- पोटात जुळी मुले असतील तर गरोदपणात उच्च रक्तदाब आणि टॉक्सिमिया होण्याची शक्यता जास्त असते.
- द्राक्षगर्भ या विचित्र विकृत गरोदरपणात उच्च रक्तदाबाचे प्रमाण खूप जास्त असते.
- आर्थिक व सामाजिक स्तरामुळे होणारे कुपोषण यामध्येही उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाचा त्रास उद्भवतो किंवा अतिशय उच्च आर्थिक व सामाजिक स्तरामुळे अधिक पोषणयुक्त आहार, अतिशय आहार, अतिशय वजनवाढ या सगळ्यांचा परिणाम म्हणूनही रक्तदाबाचे प्रमाण गरोदरपणात वाढू शकते.
- मधुमेही स्त्रियांनाही हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वंशपरंपरेने यांच्यातील गुणसूत्रातील काही घटकांमुळे उच्च रक्तदाब गरोदर स्त्रीला होऊ शकतो.
उच्च रक्तदाबाने आईला काय काय त्रास होतो?
- प्रचंड डोकेदुखी.
- दृष्टीसमोर अंधुकता.
- डोळ्यांतील पटलांमध्ये रक्तस्राव.
- पायांवर व सर्व अंगावर सूज.
- पोटात पाणी
- गर्भाशयात वारेच्या मागच्या बाजूला रक्तस्राव.
- रक्ताच्या गाठी, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठीच कमतरता, यामुळे न थांबविता रक्तस्राव, झटके, बेशुद्धावस्था.
- मूत्रपिंड व यकृत याच्यावर विपरित परिणाम व त्यामुळे त्याच्या कार्यात बिघाड व या सगळ्या कारणांपैकी कशात तरी मृत्यू.
गर्भावर काय काय परिणाम होतात?
- अपुरी वाढ, वजन न वाढणे, अपुऱ्या दिवसाचा जन्म, त्यामुळे कधी गर्भपात तर कधी पोटातच मृत्यू किंवा जन्मानंतर लवकरच मृत्यू.
- प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत सगळीच लक्षणे दिसतात असे नाही.
- उच्च रक्तदाब हा सौम्य, मध्यम किंवा तीव्र स्वरूपाच असेल तसे त्याचे आई व बाळावरील परिणाम सौम्य, मध्यम किंवा तीव्र असतात.
उपचारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेळेवर निदान.
- गरोदर स्त्रीची नियमित तपासणी आवश्यक आहे.
- प्रत्येक तपासणीमध्ये रक्तदाब, वजन, लघवी तपासणी व बाळाची वाढ महत्त्वाची.
- अचानक दृष्टीसमोर अंधारी, चक्कर, डोकेदुखी, अचानक वजनात वाढ, सूज, रक्तस्राव, झटके यासाठी जाबडतोब हॉस्पिटलमध्ये जाणे अत्यावश्यक आहे. घरगुती उपाय उपयोगी पडत नाहीत व धोका वाढत राहतो.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण विश्रांती हवी.
- मीठ खाण्यावर नियंत्रण हवे. योग्य आरोग्यकारक आहार खा.
- उच्च रक्तदाबावर आवश्यक ती औषधे नियमित घ्या.
- बाळाच्या वाढीच्या तपासणीसाठी सोनोग्राफी, डॉपलरस्टडी इ. तपासण्या आवश्यक तितक्या वेळा कराव्या लागतात.
- पुन्हा पुन्हा रक्तदाबतपासणी व आवश्यक तर हॉस्पिटलमध्ये विश्रांती व तपासणीसाठी भरती होणे जरूरीचे ठरते.
- बऱ्याच वेळा दिवस पूर्ण करण्याआधी प्रसूती करणे आवश्यक ठरते. त्यामुळे जरूर पडल्यास 34 आठवड्यानंतर बाळंतपणही करावे लागते.
- आयुर्वेदशास्त्रानुसार सर्पगंधा, जटामांसी, शंखपुष्पी, वचा, शतावरी, मुस्ता इत्यादी द्रव्यांचा वापर करतात. वाळा, चंदन, निळे कमळ, गोखरू, आवळकाठी, सुंठ यांनी सिद्ध जल करून द्यावे.
- रक्तदाब कमी म्हणजे 100/60, 95/65 असा झाल्यास गर्भिणीला बृहण, मधुर, वृष्ण व द्रवप्राय आहार द्यावा.
- सुवर्णसूतशेखर, सुवर्णभस्म, महालक्ष्मीविलास गुटी, शतावरी, अश्वगंधा, रसायन चूर्ण यांचा योग्य तो वापर करावा. मोसंबीचा रस, लाह्याचे पाणी, ताजे गोड ताक, सिद्धधृत यांचाही वापर करावा. आवश्यकतेनुसार वसंतकल्प वापरावे.