- डॉ. मनाली महेश पवार
गर्भधारणा झाल्यावर उलट्या होणे हे नैसर्गिक व साहजिक आहे. पण एखादीला उलट्या होत नसतील तर इतरांना शंका येते. या उलट्या त्रासदायक जरी असल्या तरी गोड बातमी देणाऱ्या असतात. गर्भधारणा झाल्यापासून स्त्रीला ही लक्षणे जाणवू लागतात.
गर्भधारणा झाल्यावर उलट्या होणे हे नैसर्गिक व साहजिक आहे. पण एखादीला उलट्या होत नसतील तर इतरांना शंका येते. या उलट्या त्रासदायक जरी असल्या तरी गोड बातमी देणाऱ्या असतात. गर्भधारणा झाल्यापासून स्त्रीला लक्षणे जाणवू लागतात. काहींना ही लक्षणे अगदी पहिल्या आठवड्यातच जाणवतात.
प्रायः स्त्रीला पाळी चुकल्याशिवाय गर्भधारणा झाली आहे हे कळत नाही. परंतु गर्भधारणा झाल्याबरोबर बीजग्रहण झाल्यामुळे आलेली तृप्ती स्त्रीला जाणवते.
- मळमळ व तन्द्रा जाणवते. तोंडाला पाणी सुटते.
- अंग शिथील झाल्याप्रमाणे वाटते.
- ग्लानी (चक्कर) येते.
- तहान लागते.
- स्त्री थोडीशी सुकलेली दिसते व तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारचे तेज आलेले दिसते.
- अन्न खावेसे वाटत नाही.
- आंबट खाण्याची इच्छा होते.
- डोळ्यांवर झापड असते.
- स्वर क्षीण होतो.
- कुठलाही वास तिला सहन होत नाही.
- सामान्यतः सकाळच्या वेळी अकारण उलट्या होतात.
ही लक्षणे काहींना अगदी गर्भधारणा झाल्यापासून आठवड्याभरातच दिसू लागतात. यातील अकारण उलट्या (मॉनिंग सिकनेस) होण्याला नाजूकपणे हाताळावे लागते.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे सामान्यतः उलटीपेक्षा गर्भिणीला होणारे वमन गर्भावस्थेच्या कारणामुळे होत असल्यामुळे याची संप्राप्ती थोडी वेगळी असते. गर्भधारणा झाल्यापासून व्यक्त गर्भावस्थेत होणाऱ्या उलट्या या गर्भावस्थेमुळे होत असतात. आयुर्वेदशास्त्रात याचे दोन प्रकार सांगितले आहेत.
- गर्भपीडनामुळे वायू विकृत होऊन होणारी दौद्धजन्य छर्दी (उलटी).
- दौद्धविमानन म्हणजे गर्भाला काही इच्छा झाल्यास त्याला ते न दिल्यास (डोहाळे न पुरवल्यास) दौद्धविमाननामुळे म्हणजे अपमानामुळे उलट्या होतात.
- यामध्ये गर्भनिमित्त असूनही गर्भाचा अवमान झाल्यामुळे उलट्या होतात.
- कधी न आवडणारे पदार्थ पाहिले, दुर्गंधीत अशा पदार्थांच्या बघण्यामुळे मन दुःखी होते व छर्दी निर्माण होते.
- कधी वातदोष बिघडून विपरित परिवर्तनामुळे छर्दी होते. वात हा सर्व वाहिन्या आणि संज्ञावह स्रोतसांचा उद्योजक असल्यामुळे या वातवाहिन्यांमध्ये विगुणता आल्यास मानसिक स्थिती बिघडून विपरित परिवर्तनामुळे छर्दी होते.
- कधीकधी अत्यंत किळसवाण्या गोष्टींच्या दर्शनाने व कृमी पाहण्याने उलटी होते.
गर्भनिमित्त ज्या उलट्या होतात त्यात काहीवेळा मुखप्रसेक (तोंडाला पाणी सुटणे) तर काहीवेळा स्रोतसांमुळे फेकल्या जाणाऱ्या स्रवणांमुळे त्याची प्रतिक्रिया म्हणून छर्दी निर्माण होते. म्हणून गर्भिणीला होणाऱ्या उलट्यांचा विचार करताना सद्योगृहित गर्भिणीचे लक्षण म्हणून मुखप्रसेक, व्यक्तगर्भेचे लक्षण म्हणून गर्भनिमित्तज छर्दी आणि दोषप्रकोपामुळे होणारी छर्दी अशा तीन प्रकाराने याचा विचार करावा. म्हणून या तीन गोष्टींचा विचार करून दोहाळे म्हणून तिला जे फळ, पेय, भक्ष्य खावेसे वाटते ते दिल्यास उलट्या कमी होतात.
गर्भिणीला होणाऱ्या उलट्यांमध्ये उपाय व काळजी
- काडेचिराईत आणि साखर मिसळून ते थोडे थोडे चाटवावे.
- लाजाजल (साळीच्या लाह्यांचे पाणी) हे उलट्यांवरील उत्तम औषध आहे.
- तांदळाचे धुवण धण्याची पूड टाकून द्यावे.
- सुंठ आणि बेलफळ यांचे चूर्ण थोडे थोडे चाटवावे.
- डाळिंबाचा रस थोडा थोडा द्यावा.
- आंबट डाळिंबाचा रस घातलेले लाजाजल थोडे थोडे पाजावे.
- कोलमज्जा, दाडिम साल, महाळुंगाचा रस यामुळे उलट्या कमी होतात.
- वातज उलट्यांमध्ये आम्लरसाचा उपयोग होतो.
- पित्तज उलट्यांमध्ये साखर घातलेले पाणी किंवा मांसरस उपयोगात येतो.
- लाह्यांना मध लावून त्याची पूड थोडी थोडी जिभेवर टाकावी किंवा लाह्यांची पूड करून त्यात खडीसाखर मिसळून ती जिभेवर टाकावी.
- जेवणामध्ये मुगाचे सूप, कढण करून, त्यात अनारदाणा टाकून तो थोडा-थोडा प्यावा.
- मयूरपिच्छामणी, वेलदोडा जाळून केलेली पूड, शंखभस्म, पिंपळी, मनुका यांचे चाटण मधातून करावे.
- आहार घेण्यापूर्वी पाच मिनिटे औषधे घ्यावीत व आहार थोडा-थोडा घ्यावा.
- आवळा, डाळिंबाचे सरबत, कोकम सरबत, मोसंबीचा रस, धन्याजिऱ्याचे पाणी अशा द्रवाधारावर गर्भिणीला ठेवावे.
- कित्येक स्त्रियांना नऊ महिन्यांपर्यंत वमन होते, त्यामुळे दौर्बल्य येऊन सलाईन लावण्याची वेळ येते. अशावेळी लाह्यांचे पाणी मीठ-साखर घालून सकाळ-संध्याकाळ एकेक ग्लास घ्यावे.
- वाताचा अनुबंध असल्यास थोडा आंबट डाळिंबाचा रस घालावा.
- पित्ताचा अनुबंध असल्यास थोडा गोड डाळिंबाचा रस घालावा किंवा डाळिंबपाक द्यावा.
- शतावरी कल्पाचे पाणी द्यावे.
- कफज असल्यास थोडे पिंपळी मारिच चूर्ण लाजाजलात घालून द्यावे.
अशाप्रकारे द्रवप्राय आहार ठेवल्यास आणि खाण्यापूर्वी शंखभस्म किंवा मयूरपिच्छामणी चाटवल्यास गर्भिणी वमनावर नियंत्रण ठेवता येते.
आधुनिक शास्त्रानुसार गर्भिणी अवस्थेत उलट्या, मळमळ ही हार्मोन्सच्या बदलांमुळे होते. गर्भधारणेपूर्वी जीवसत्त्वे घेतल्यास हा धोका कमी होतो. सौम्य केसेसमध्ये सौम्य आहाराव्यतिरिक्त विशिष्ट उपचारांची आवश्यकता असते. उपचारांसाठी डॉक्सिलामाइन आणि पायरिडॉक्सिनच्या गोळ्या दिल्या जातात, पण त्या गोळ्या घेतल्यावरही उलट्या बऱ्याच वेळा होतात किंवा एक दिवस नाही घेतल्या तर पुढच्या दिवशी अजून जास्त उलट्या होतात.
काही महिलांना अगदी काहीही खाल्लं किंवा नाही खाल्लं तरी पूर्ण दिवस उलट्या होतात किंवा उलट्या, ओकारी आल्यासारखे वाटते, वजन घटते, डोळ्यांकडे अंधारी येते, काहीच खावेसे वाटत नाही, उभे राहायलासुद्धा त्राण नसतो याला ‘हायपरमेसिस ग्रेविडेरम’ असे म्हणतात. अशा अवस्थेत पेशंटला हॉस्पिटमध्ये ॲडमिट केले जाते. सलाईन लावले जातात. इंजेक्शनद्वारे उलट्या बंद करण्याचा प्रयत्न केला जातो.
पण आपण योग्य काळजी घेतली, घरातल्या इतर सदस्यांनाही जर या काळात योग्य साथ व मार्गदर्शन केले तर या गर्भिणीअवस्थेतील उलट्या कमी होऊ शकतात. योग्य फलाहार, द्रावाहार, मनाला व रसधातूला प्रीणन, प्रसन्न करणारा आहार सेवन केल्यास या गर्भिणीअवस्थेतील उलट्या थांबू शकतात.
- दोन-दोन तासांनी थोडे-थोडे खावे, प्यावे.
- पाणी भरपूर प्यावे.
- दुधामध्ये सुंठीचा वापर करावा.
- रोज रात्री चार-पाच काळ्या मनुका पाण्यात भिजत ठेवाव्या व सकाळी कुस्करून त्या पाण्यासकट सेवन कराव्यात.
- पहिले तीन महिने जास्तीत जास्त द्रवाहार असावा. मांसाहारी खाणाऱ्यांनी मांसरस सेवन करावा.
- शांत पुरेशी झोप घ्यावी. रात्री झोपावे, दिवसा झोपू नये.
- ताणतणाव दूर करण्यासाठी हळुवार संगीत ऐकावे.
- ध्यानधारणा करावी.
- नामस्मरण करावे (इष्टदेवतेचे).
- छान छान पुस्तके वाचावीत. आपल्याला आवडणारी कला जोपासावी व आनंदी राहावे.